Saturday, September 24, 2016

जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे आवाहन
माहिती, मदतीसाठी नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा
   नांदेड, दि. 24 :- जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे काही नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही सुरु झाला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क रहावे. सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी.  नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरुन न जाता अडचणींबाबत व मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  सुरेश काकाणी  यांच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केले आहे.
संततधार पावसामुळे  जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होऊन काही  छोट्या-मोठ्या नदी, नाल्यांना पूर आला आहे. सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ता खचून जाणे, पूल वाहून जाणे, दरडी कोसळून अपघात होणे, रस्ता निसरडा झाल्याने वाहनांचे अपघात होणे, धबधबे आदी पाणीसाठ्यांच्या ठिकाणी बुडून अपघात होणे, असे प्रकार संभवतात. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक बाबींसाठीच  प्रवासाची  जोखीम  घ्यावी. त्यामध्येही सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. पूररेषेतील तसेच यापुर्वी सखल भागात पाणी शिरुन किंवा साचून बिकट परिस्थिती उद्भवणाऱ्या परिसरातील जोखीमीबाबत  नारिकांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी संबंधित यंत्रणांच्या सूचना, इशाऱ्यांचे पालन करावे.

अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108. याशिवाय आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल, असेही  निवासी  उपजिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी जयराज कारभारी यांनी कळवले आहे. 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...