Wednesday, January 31, 2024

 वृत्त क्र.  93 

जिल्ह्यात स्वस्त दरात वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी वाळू डेपो तयार

 

 ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करुन लाभ घेण्याचे

  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 19 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्‍हयात टप्‍याटप्‍याने वाळू डेपो तयार करण्‍याचे काम सुरु आहे. काही वाळु डेपो कार्यान्‍वीत पण झाले आहेत. या डेपोवरुन नागरिकांना प्रती ब्रास 600 रुपये अधिक इतर कर 77 रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन 1 फेब्रुवारी 2024 नुसार वाळू विक्री करण्यात येणार आहे. ज्‍या नागरिकांना वाळुची आवश्‍यकता आहे अशा नागरिकांना नजिकच्‍या सेतू केंद्रावर जाऊन संपर्क करावा.

 

सदरील सेतु केंद्रावर पुढील प्रक्रियेनुसार वाळु मागणीसंदर्भात नोंदणी करावी. वाळु डेपोतुन वाळु मागणी करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीवर दररोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे. प्रत्‍येक वाळु डेपोवरुन प्रतिदिन किमान 200 ब्रास इतकी रेती बुकींगची मर्यादा निश्‍चीत केली आहे. प्रत्‍येक लाभार्थ्‍याना प्रति महिना 10 ब्रास इतकी वाळु उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. घरकुलाच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू विनामूल्य उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल.

 

त्यासाठी जनतेने वाळू धोरण-2023 च्या अनुषंगाने वाळू बुकींग करण्यासाठी नजिकच्‍या सेतू केंद्राला  भेट द्यावी. सेतू केंद्रधारक यांनी https://mahakhanij.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरील बाजूस SAND BOOKING असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. SAND BOOKING वर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडोमध्ये उघडेल. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर लॉगिन करुन ग्राहकांची आवश्यक ती माहिती भरावी जसे नाव, मोबाईल क्रमांक व स्वत:चा ई-मेल आयडी इत्यादी माहिती भरावी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन मध्ये युजर नेम म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलमध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (ओटीपी) टाकून लॉग इन करावे. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये आपली घर, इमारत, घरकुल इत्यादी माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा STOCKYARD निवडावा. शेवटी ऑनलाईन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी व संबंधित STOCKYARD वर जाऊन पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी.

 

वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायर पर्यत असणारे टिप्पर, टेम्पो व इतर) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोदणी करण्यात यावी. वाहतुकीचा दर शासनाने निश्चित केल्याप्रमाणे राहील याबाबतची सविस्तर माहिती www.nanded.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच ऑनलाईन संदर्भात तक्रार असल्‍यास Helpline No. of Mahakhanij 020-67800800 या दुरध्‍वनीवर संपर्क करावा. याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची  प्रक्रिया पूर्ण करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 92

दिव्यांगांनी सादर केलेल्या नाट्य,

नृत्याविष्कार च्या कलागुणांना रसिकांनी दिली भरभरुन दाद

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धाचे आज कुसुमताई चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते. दिव्यंगत्वावर मात करीत दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यनृत्याविष्काराच्या कलागुणांना उपस्थित रसिकांनी भरभरुन दाद दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देवून त्यांच्या कला गुणांचे कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदेजिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवारनितीन निर्मलपरीक्षक चंद्रकांत अटकळीकर, तारनाथ खरे, दीप्ती उबाळे यांची उपस्थिती होती.

इच्छाशक्तीच्या जोरावर सामान्य माणसापेक्षा उत्कृष्ट करून दाखविण्याचे कौशल्य दिव्यांगात आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. त्यांच्या कडे पाहून मला जगण्याची स्फूर्ती मिळते आळस दूर होवून ऊर्जा मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगाच्या कलागुणांला वाव मिळतो असे प्रतिपादन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले. जिल्ह्यातील अंधमूकबधिर, अस्थीव्यंग तसेच मतिमंद प्रवर्गाच्या 53 विशेष शाळांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी नाट्यनृत्याविष्कार ने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. बाऱ्हाळीच्या गजराबाई वडगावकर मूकबधिर शाळेच्या विदयार्थ्यांनी जलवा-जलवाचे सादरीकरण केले. ये भगवान कहा हो तुमगाडी घुंगराचीललाटी भंडारा ,मेरे राम आये है , शेतकरी गीतये वतन-ये वतनआदिवासी नृत्य तसेच सामाजिक संदेश देणारी बेटी बचाव बेटी पढाओ नाटिका सादर केल्या. तसेच देशभक्तीधार्मिकसामाजिकमनोरंजनात्मक नाट्यनृत्याविष्काराने उपस्थित रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवारप्रभारी वैसाका कुलदीप कलुरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विशेष शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे.

0000





 वृत्त क्र. 92

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत

बोधडी येथे हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव कार्यक्रम

नांदेड (जिमाका) दि. 31 :-

प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024  या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यानुषगाने 30 जानेवारी 2024 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय  किनवट तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालयबोधडी बु. यांच्या संयुक्त विद्यमाने बोधडी बु. येथे हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी उपस्थित गावकरीमहिला  विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना रस्ता सुरक्षा विषयक माहिती पुस्तिका  पॉम्प्लेटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास बोधडी गावचे सरपंच बालाजी भिसेउपसरपंचग्रामसेवकगावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी  सुमारे 150 ते 200 नागरिकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वितेसाठी मोटार वाहन निरीक्षक गणेश तपकीरेसहायक मोटार वाहन निरिक्षक केशव जावळे यांनी परिश्रम घेतले.

0000







 वृत्त क्र. 91

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन    

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या http://www.syn.mahasamajkalyan.in  संकेतस्थळावर 1 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या कालावधीत  कार्यालयीन वेळेत ऑनलाईन भरावा. भरलेला अर्ज 2 दिवसात अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे जमा करावा. प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन महाविद्यालयांच्या प्राचार्यानी सही शिक्क्यासह  7 मार्च 2024 पर्यत  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाहीअशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजननिवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी खर्चाची बाबीत भोजन भत्ता 28 हजार, निवास भत्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम  51 हजार रूपये एवढी आहे.  नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अनुज्ञेय रक्कम  आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.  

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी/ अकरावीबारावीपदवीपदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.  विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. 

विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले / आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्रत्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाहीअसे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Tuesday, January 30, 2024

 वृत्त क्र.  90

दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

 

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी नंबर पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव ए.आर.कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. 8379072565एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं. 9423777789, एस.जी.आरसुलवाड (व.लि) मो.क्र. 7767825495 तर माध्यमिक साठी ए.पी. चवरे (व.अ)  मो.क्र. 9421765683 तर एस.एल.राठोड (क.लि) मो.क्र. 8830298158, ए.एल. सुर्यवंशी (क.लि) मो.क्र. 7620166354 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857,  बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

000000

 वृत्त क्र.  89

दहावी परीक्षेच्या ऑनलाइन प्रवेश पत्राबाबत आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,  शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींसाठी आवाहन करण्यात आले आहे की,  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परिक्षा मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

सर्व माध्यमिक शाळा मार्च 2024 च्या माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार 31 जानेवारी 2024 पासून स्कुल लॉगईन मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. असे आवाहन राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन घेण्यासाठी मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इयत्ता दहावी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र हॉल तिकीट उघडताना काही त्रुटी आल्यास सदर प्रवेशपत्र गुगल क्रोम मध्ये उघडावे.

प्रवेशपत्र हॉल तिकीट ऑनलाईन पध्दतीने प्रिंट करुन देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. प्रवेश पत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र द्यावयाचे आहे. मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक,  सर्व माध्यमिक शाळांनी वरील बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...