Friday, September 29, 2023

 वृत्त 

दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या

विद्यार्थ्यांना विलंब व अतिविलंब शुल्काने अर्ज करण्याची सुविधा 

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. जे विद्यार्थी दिलेल्या या मुदतीत नावनोंदणी करु शकले नाही अशा विद्यार्थ्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने विलंब व अतिविलंब शुल्काने सादर करावयाची सुविधा राज्य मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.   

 

अर्ज विलंब व अतिविलंब निर्धारित मुदतीत स्विकारण्याच्या कालावधी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी प्रति विद्यार्थी 100 रुपये तर इयत्ता बारावीसाठी प्रती विद्यार्थी 25 रुपये स्विकारुन नाव नोंदणी अर्ज मंगळवार 3 ऑक्टोंबर ते रविवार 25 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत भरावयाचा आहे. तसेच अतिविलंब शुल्क इयत्ता दहावी व बारावीसाठी प्रती विद्यार्थी प्रतीदिन 20 रुपये स्विकारुन नावनोंदणी अर्ज सोमवार 16 ऑक्टोंबर ते मंगळवार 31 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत भरावयाचा आहे.   

 

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे. 

 

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.

 

संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्का जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या मध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे.  

 

खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + 100 रुपये प्रक्रिया शुल्क विलंब शुल्क / अतिविलंब शुल्क. तर इयत्ता बारावीसाठी 600 रुपये नोंदणी शुल्क + 100 रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क / अतिविलंब शुल्क राहिल. (विलंब /अतिविलंब शुल्क वर नमूद केल्याप्रमाणे भरण्यात यावे.) 

 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी विद्यार्थ्यांची पूर्वीची शाळा किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळची माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे. याबाबत सर्व माध्यमिक शाळांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. या वर्षापासून संपर्क केंद्र पद्धत बंद करण्यात आली असल्याने मान्यताप्राप्त सर्व शाळांमधून खाजगी  विद्यार्थी अर्ज स्विकारणे अनिवार्य आहे. याची सर्व मान्यताप्राप्त शाळांनी नोंद घ्यावी व उचित कार्यवाही करावी.

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील विद्यार्थ्यांची शाळा/कनिष्ठ महाविद्यालय किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळच्या शाळेची/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.  

 

इयत्ता दहावी व बारावी फेब्रुवारी-मार्च 2024 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:कडे ठेवून त्याच्या दोन छायाप्रती माध्यमिक शाळेस/कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

 

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा.

 

विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेन जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. खाजगी विद्यार्थी विलंब/अतिविलंब शुल्काने नाव नोंदणी करण्याकरीता अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2023 असणार आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही  यांवी सर्व संबंधितानी नोंद  घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

Thursday, September 28, 2023

 गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ

  • नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात आज 28 सप्टेंबर 2023 रोजी 100 टक्के पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी चालू आहे. त्यामुळे बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे आज सायं. 5 वा. बंधाऱ्याचे एक द्वार उघडून 471 क्युमेक्स (16 हजार 632 cuscc) या वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पाण्याचा वेग सुध्दा वाढणार आहे. आज गणेश विसर्जन असल्यामुळे नदीकाठावरील घाटावर विसर्जनासाठी मोठया प्रमाणात गणेश भक्त आलेले असतात. कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होवू नये यासाठी सतर्कता बाळगावी तसेच विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचेजीविताचीपशुधनाचीवीटभट्टी साहित्य इतर कोणत्याही मालमत्तेची हानी होणार नाही यांची काळजी नागरिकांनी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000 

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत

पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम अदा करावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2023-24 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन ॲडव्हर्सिटी)  अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लागू केली आहे. या अधिसूचनेनुसार सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाईची आगाउ रक्कम अदा करण्याचे निर्देश त्यांनी विमा कंपनीस दिले आहेत.

 नांदेड जिल्ह्यामध्ये माहे जुलै मध्ये अतिवृष्टीमुळे व माहे ऑगस्ट मध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनकापूसतूर व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. अशा वेळी जिल्ह्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानेच्या 25 टक्के आगाउ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनास तात्काळ अधिसूचना काढणे बाबत सूचना होत्या. त्यानुसार जिल्ह्यामध्ये समितीमार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. तरी पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीमध्ये प्रतिकूल परिस्थिती उदा. पूरपावसातील खंडदुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 50 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.

समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने सोयाबीनकापूसतूर व खरीप ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना लागू केली आहेअशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले  आहे.  

00000

आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत 

जिल्‍ह्यातील नागरीकांनी आयुष्‍यमान कार्ड काढून घ्‍यावे


  –  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्‍ह्यात केंद्र शासनाची आयुष्‍यमान भव मोहिम 13 सप्‍टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्‍ये राबविली जात आहे. गावपातळीपर्यंत गुणवत्‍ता पुर्वक आरोग्‍य सेवा सुविधा पुरविणे व जनजागृती करणे हे या मोहिमेचे उदिष्‍ट आहे. या अंतर्गत सर्व आरोग्‍य संस्‍थांमधून आरोग्‍य मेळावे व आरोग्‍य सभांचे आयोजन करण्‍यात येत आहे.  ग्रामीण भागात 377 उपकेंद्र व 69 प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍तरावरील या आरोग्‍य मेळाव्‍यातून नागरीकांनी सहभागी होऊन आरोग्‍य विषयक सोई सुविधांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत व जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. 

जिल्ह्यात 1 ऑक्‍टोंबर 2023 रोजी *स्‍वच्‍छता ही सेवा* अंतर्गत सर्व आरोग्‍य संस्‍था व परिसर स्‍वच्‍छ व सुंदर केला जाणार आहे. 2 ऑक्‍टोंबर 2023 रोजी गाव पातळीवर ग्रामसभेमध्‍ये आयुष्‍यमान सभा आयोजित केली जाणार आहे. 100 टक्‍के आयुष्‍यमान कार्ड, आभा आयडी (ABHA ID) नोंदणी करुन आयुष्‍यमान कार्डचे (गोल्‍डन कार्ड ) वितरीत करण्‍यात येणार आहेत. तसेच असंसर्गजन्‍य आजारांची माहिती जसे की, हाय रिस्क फॅक्‍टर, योग्‍य आहार विहार, मानसिक आरोग्‍य, सिकलसेल आजार, लसीकरण, क्षयरोग, कुष्‍ठरोग इ. संसर्गजन्‍य रोग, टेली कन्‍सलटेशन, इ. माहिती ग्रामस्‍थांना देण्‍यात येणार आहे. 

दर शनिवारी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्‍य केंद्रात आयुष्‍यमान हेल्‍थ मेलाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. निरोगी आरोग्‍य तरुणाईचे,  वैभव महाराष्‍ट्राचे ही योजना राबविली जाणार आहे. आयुष्‍यमान भव मोहिमे अंतर्गत आरोग्‍यवर्धीनी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्‍य केंद्र येथे मेळाव्‍यात 18 वर्षावरील सर्व नागरीकांचे आरोग्‍य तपासणी, बीपी, शुगर, वजन उंची तपासणी करण्‍यात येणार आहे. प्रामुख्‍याने स्‍त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, नाक, कान व घसा, त्‍वचारोग, मानसिक आजार, दंत शल्‍य चिकित्‍सक तपासणी इत्‍यादी तपासण्‍या करण्‍यात येणार असून गंभीर रुग्‍णांना संदर्भित करुन औषधोपचार व शस्‍त्रक्रिया मोफत करण्‍यात येणार आहेत. आजपर्यत जिल्‍ह्यात 85 हजार 263 जणांची तपासणी करण्‍यात आली असून, 9 हजार 54 रुग्‍णांना आयुष योजने अंतर्गत उपचार करण्‍यात येत आहेत. 

आयुष्‍यमान भारत योजने अंतर्गत सर्व नागरीकांना आरोग्‍य संरक्षणाचे कवच प्राप्‍त होणार असून आरोग्‍य संरक्षण प्रती कुटुंब प्रतीवर्ष 5 लाख रुपये आहे. या योजने अंतर्गत अंगीकृत रुग्‍णालंयामधून उपचाराचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान आयुष्यमान भारत विमा योजना यामध्ये प्रत्येकाला स्वतःचे 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा योजना असलेले आयुष्यमान कार्ड स्वतःचे स्वतः काढता येण्याची सोय आयुष्यमान ॲपद्वारे उपलब्ध झाली आहे. हे ॲप प्ले स्टोअर मधून डाऊनलोड केल्यानंतर त्यात बेनिफिशरी हा पर्याय वापरून त्यामध्ये आधार लिंक मोबाईल नंबर टाकून पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. 

0000

 मतदार जागृतीसाठी

अभिव्यक्ती मताची स्पर्धेस 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती मताची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अभिव्यक्ती मताची या विषयांतर्गत जाहिरात निर्मितीभित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये (Art collegs) येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा कालावधी ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 होता. आता या स्पर्धेस सहभाग घेण्यासाठी 5 ऑक्टोंबर 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

तीनही स्पर्धांचे विषय आणि नियमावल्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये भाग घ्यावाअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

 

या स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत. युवा वर्ग आणि मताधिकारीमताधिकार लोकशाहीचा स्तंभएका मताचे सामर्थ्यसक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारीलोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकारतीनही स्पर्धाचे माध्यम मराठीहिंदी आणि इंग्रजी आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक लाख रुपयेदुसरे पारितोषिक 75 हजारतिसरे पारितोषिक 50 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक 10 हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रका (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 50 हजार रुपयेदुसरे पारितोषिक 25 हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार रुपयेदुसरे पारितोषिक 15 हजार रुपयेतिसरे पारितोषिक 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी हजार रुपयांची आहेतअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

Wednesday, September 27, 2023

 प्रादेशिक परिवहन कार्यालय

गुरूवार 28 सप्टेंबर रोजी सुरू राहणार

 

ईद--मिलाद निमित्त शुक्रवारी सुट्टी

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय हे गुरूवार 28 सप्टेंबर 2023 रोजी कामकाजासाठी सुरू राहणार आहे. 29 सप्टेंबर रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीकरीता अपॉईमेंट घेतलेल्या अर्जदारांनी 28 सप्टेंबर 2023 रोजी कार्यालयात चाचणीकरीता उपस्थित रहावे. ज्यांना शक्य नाही अशा अर्जदारांनी पुढील आठवड्यात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

 

ईद-ए-मिलाद निमित्त शासनाने 28 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. परंतू महाराष्ट्र शासनाने 27 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमीत केलेल्या अधिसूचनेनुसार ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. शासनाने त्याऐवजी ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी शुक्रवार 29 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे.   

 

तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी 29 सप्टेंबर रोजी अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी त्यांचे वाहन तपासणीकरीता 28 सप्टेंबर रोजी कार्यालयात सादर करावेत. ज्यांना शक्य नाही अशा अर्जदारांनी पुढील आठवड्यात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्यांचे वाहन योग्यता नुतनीकरण तपासणीकरीता हजर करावेत. या बदलाची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000 

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 29 व 30 सप्टेंबर रोजी आयोजन

 पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन

रोजगार मेळाव्याचे 29 व 30 सप्टेंबर रोजी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 29 व 30 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com किंवा 02462 (251674) व योगेश यडपलवार 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी. उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असेही  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

 

आर्यन असेथिंटीक प्रा.ली या कंपनीत टेलर 10 रिक्त पदासाठी इयत्ता 10 वी पास/नापास स्त्री/पुरुष उमेदवारांची भरती करावयाची आहे. नवकिसान बायो प्लानेटिक लिमिटेड या कंपनीत सेल्स रिप्रझेंटिव्ह या 30 रिक्त पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी 12 वी, पदवीधर असून वय 21 ते 35 वर्षाच्या उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. लाईफ इन्सुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत लाईफ इन्सुरन्स ॲडव्हायझर 42 रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता  इयत्ता 10 वी 12 वी, पदवीधर आहे.  तरी बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

कौशल्य विकास आराखड्यास मान्यता

 कौशल्य विकास आराखड्यास मान्यता

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची मासिक बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने सादर केलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा 2023-24 ला मान्यता देण्यात आली.

 

या बैठकीस मनपाचे उपायुक्त कारभारी दिवेकर, माध्यमिक शिक्षण विभागाचे सहायक शिक्षण उपनिरीक्षक एच.आर.पोकले, सहा. नियोजन अधिकारी निखिल बासटवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे गजानन पातेवार, माविमचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार आदीची उपस्थिती होती.

 

यावेळी ग्रामीण भागात प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक समाजकार्य महाविद्यालयातून 10 विद्यार्थ्यांना घेवून त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा करण्यात आली.  

00000

 

प्रधानमंत्री पिक विम्याचे 472 कोटी 51 लाख रुपये विमाधारक शेतकऱ्यांना वितरित

 प्रधानमंत्री पिक  विम्याचे  472 कोटी 51 लाख रुपये

विमाधारक शेतकऱ्यांना वितरित

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- मागील वर्षी खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान सोसावे लागले. जिल्ह्यातील 10 लाख 57 हजार 508 शेतकऱ्यांनी  6 लाख 51 हजार 422 हे. क्षेत्रावर पिक विमा उतरविला होता.  प्रधानमंत्री पिक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविली जाते. पिक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (मिड सिझन ॲडव्हर्सिटी) घटकातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोयाबीन, ख. ज्वार, कापूस व तूर पिकांसाठी मिड सिझन ॲडव्हर्सिटीची अधिसूचना लागू केली होती. या अधिसूचनेनुसार विमा कंपनीने 366 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले. त्यापैकी 85 टक्के प्रमाणे पहिला हप्ता 310  कोटी रुपये व  व दुसरा हप्ता 15 टक्के नुसार 56 कोटी 50 लाख रुपये विमाधारक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

 

याचबरोबर पिक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या घटकांतर्गत प्राप्त पूर्वसूचनांचे पंचनामे करुन तिसऱ्या हप्त्यात अनुक्रमे 99 कोटी 65 लाख रुपये व 6 कोटी 36 लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आली आहे. सन 2022-2023 मध्ये विविध घटकाअंतर्गत एकूण 472 कोटी 51 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत.

 

पिक कापणी प्रयोगानुसार उंबरठा उत्पादनावर आधारित पिक विमा ज्या महसूल मंडळाना लागू होईल अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना जी रक्कम वाढीव मिळेल ती यानंतर जमा करण्यात येईल असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. या व्यतिरीक्त 75 टक्के  नुकसान भरपाई अशी कुठल्याही प्रकारची वेगळी तरतूद पिक विमा योजनेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी चुकीच्या संदेशाला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले. 00000

लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन

 लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. परंतु या महिन्याच्या पहिल्या सोमवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे सदर लोकशाही दिन मंगळवार 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील,  असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी कळविले आहे.

00000

Tuesday, September 26, 2023

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 2 ऑक्टोंबर रोजी किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 2 ऑक्टोंबर

रोजी किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने 17 सप्टेंबर  ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत महात्मा गांधी यांची 154 व्या जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षा निमित्त स्वच्छता व देखभाल पंधरवड्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत 2 ऑक्टोंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड, माहूर व कंधार येथील जवळपास 100 प्रशिक्षणार्थी मार्फत अनुक्रमे नंदगिरी गड किल्ला, माहूर येथील माहूरगड किल्ला तसेच कंधार येथील कंधार भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानात स्वयंसेवी संस्थेचा वीर सैनिक ग्रुप सहभागी होणार आहे, असे नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी 

भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

 

नांदेड (जिमाका), दि. 26 :- श्री गणेश विसर्जन मार्गात भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मिरवणूक मार्गात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे यादृष्टीकोणातून नांदेड शहर व‍ जिल्ह्यात (अनंत चतुर्थीच्या) दिवशी गुरुवार 28  सप्टेंबर 2023 रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

 

मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) अन्वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत. हे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 29 सप्टेंबर 2023  रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.   

00000

 

Monday, September 25, 2023

 समन्वयातून विकास कामावर भर द्यावा

-  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय महत्वाचा आहे.  एकमेकांच्या समन्वयातून विकास कामांची गती वाढविण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्नशिल असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. 

 

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरउपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळेसहायक आयुक्त शिवानंद मिनगिरेप्रविण साले, सुरेशदादा गायकवाड, साहेबराव गायकवाड, मिलींद देशमुख, प्रतापराव पावडे, बंडू पावडे, श्रावण पाटील भिलवंडे, रंजनाताई व्यंकटराव कदम, विनायकराव शिंदे, बाबुराव देशमुख, सरपंच दिगंबर जगदंबे, सुभाषराव शिंदे, रविंद्र पोतगंटीवार, उपविभागीय अधिकारीतहसिलदारपंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

 

जिल्हा वार्षिक योजनादलितवस्तीतांडावस्ती अशा विविध योजनाच्या माध्यमातून निधी प्राप्त होतो. या निधीच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे जिल्ह्यात सुरु असून काही प्रलंबित स्वरुपात आहेत. विकास कामे प्रलंबित राहील्यास निधी वेळेत खर्च होत नाही. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.  त्यामुळे विभाग प्रमुखांनी एकमेकात समन्वय ठेवून विकास कामांना गती द्यावी व कामे तात्काळ पूर्ण करावेतअसे निर्देश खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले.

 

या बैठकीत जिल्ह्यातील मानसपूरी ते बहादरपूरा रोड - नॅशनल हायवे जोडून राहीलेल्या रस्तासिडको कॉर्नर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकनांदेड उस्माननगर-हाळदा-मुखेड-बिदर रोडकहाळा-गडगा रोड वरील मांजरम गावाजवळ शिल्लक राहिलेल्या रस्त्याचे काममांजरम-बेंद्री रोड वरील पानंद रस्त्यावर नाला काढणेनायगाव तालुक्यातील सांगवी गावातील पिण्याचे पाणी व विविधा नागरी समस्यानांदेड तालुक्यातील वाडी बु. नगरपंचायत आणि धर्माबाद तालुक्यातील कारेगांव फाटा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयासंदर्भातील कामाबाबत या बैठकीत आढावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आढावा घेतला.  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त निधी वेळेत खर्च करुन विकास कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

नांदेड शहरात दोन एकर जागेवर पर्यटन विकासात भगवान गौतम बुध्दाचे स्मारक येत्या काळात उभारण्याचे नियोजन असून याबाबत मनपाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.  

 

नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर झाले. या औचित्याने जिल्हाप्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला. 

00000





  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...