Monday, January 30, 2023

वृत्त क्रमांक 49

 उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात

स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष 


 

निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी  उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामशाहीमुळे पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याला मुक्तीसाठी जे आंदोलन करावे लागले त्यात उमरी येथील ऐतिहासिक संदर्भही अधिक महत्त्वाचे आहेत. येथील हैद्राबाद स्टेट बँक, पोलीस स्टेशनवरील हल्ला, रेल्वे रूळ उखडून टाकणे याला आज 30 जानेवारी रोजी बरोबर 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या बँकेवर हल्ला झाला ती बँक खाजगी जागेत असल्याने आज त्या जागेचे स्वरूप बदलले आहे. मात्र निजामाच्या पोलीसाची ज्या पोलीस चौकीवर हल्ला झाला ती इमारत आज त्या काळातील हैद्राबाद मुक्तीच्या आठवणी आपल्या प्रत्येक शिळेवर घेऊन उभी आहे. या उमरी पोलीस स्टेशनच्या भिंती त्या काळातील तिजोरीसह मुक्तीच्या या लढ्याला पुढच्या पिढीसाठी वाहते करण्यास सज्ज आहेत.

 

पोलीस विभागाने हे पोलीस स्टेशन आहे त्या स्थितीत आजवर व्यवस्थीत जपले असून ऐतिहासिक साक्षीसह उमरीतील शांतता व सुव्यवस्थेसाठी येथून कामकाज पाहिले जाते. दि. 30 जानेवारी 1948 ला निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी हा हल्ला व बँकेची लूट करण्यात आली. हल्ल्यापूर्वी एक दिवस अगोदार म्हणजेच 29 जानेवारी रोजी उमरखेडचे स्वातंत्र्य सैनिक देवसरी या गावी जमले. चार गटात विभागालेल्या या स्वातंत्र्य  सैनिकांनी 30 जानेवारी रोजी हल्ला करून निजामाला धास्तावून सोडले. रेल्वेचे रूळ व तारा तोडण्यासाठी बारडचे राजाराम देशमुख, थेरबनचे अमृतराव व 35 सैनिक रवाना झाले. नागनाथ परांजपे यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांच्या तुकडीने पोलीस स्टेशनवर हल्ल्यासाठी धाव घेतली. यात लहानचे भिमराव देशमुख व इतर मंडळी होती. रेल्वे स्टेशनवर हल्ल्यासाठी उमरीचे मोहन शर्मा, जगदीश, बाबुराव कुटूंरकर व इतर मंडळी होती.

 

उमरीच्या मोंढ्यातील हैद्राबाद स्टेट बँकेच्या शाखेवर 21 जणांच्या तुकडीने हल्ला केला. यात अनंत भालेराव, आबासाहेब लहानकर, साहेबराव देशमुख-बारडकर, बन्सीलाल तोष्णीवाल, किशोर शहाणे, दिंगबरराव उत्तरवार, शंकरलाल शर्मा, बन्सीलाल मालाणी, धनराज पुरोहित, रघुनाथ पंडीत, काशिनाथ शेट्टी हे स्थानिक उमरीचे कार्यकर्ते होते. सायंकाळी 4.30 वा. तीनही ठिकाणी हे मुक्तीसाठी हल्ले करण्यात आले.

 

काळ झपाट्याने पुढे जरी गेला असला तरी इतिहासातील अखंड भारताच्या व स्वातंत्र्याच्या लढ्यातील हे ऐतिहासिक संदर्भ नव्या पिढीपर्यंत पोहचणे तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासमवेत मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव आता सुरू असून शासनाने यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

 

मराठवाडा मुक्तीची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यादृष्टिने लवकरच उमरी आणि बारड येथे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांना नव्या पिढीसमवेत आम्ही संवाद घडवून आणत आहोत.

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

उमरी पोलीस स्टेशन आज ज्या वास्तुत आहे त्या वास्तुचा ऐतिहासिक संदर्भ लाखमोलाचा आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने आम्ही ही जागा आहे त्या स्थितीत आजवर त्याच इमारतीतून शांतता व सुव्यवस्थेसाठी सांभाळून ठेवली आहे. या इतिहासाला प्रवाहित करण्यासाठी प्रयत्नरत राहू

-   जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

0000  






वृत्त क्रमांक 48

 जयंती, राष्ट्रीय दिनाबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 30  :- राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले. जिल्ह्यातील संबंधित शासकीय कार्यालयांनी या शासन निर्देशांचे अवलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

सन 2023 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्र. जपुति-2022/प्र.क्र.120/कार्या.29 दि. 18 जानेवारी 2023 अन्वये दिलेल्या सुचनेनुसार सन 2023 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे. अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत. शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखाने याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्देशीत केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 47

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144   

नांदेड (जिमाका) दि. 30 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शुक्रवार 20 जानेवारी 2023 सकाळी 6 वाजेपासून ते रविवार 19 फेब्रुवारी 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पुल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जानेवारी 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

Friday, January 27, 2023

वृत्त क्रमांक 46

 तृणधान्याच्या महत्त्वासाठी जिल्हा परिषदेत भाकरी-ठेचातून बचतगटांच्या महिलांनी दिला संदेश

▪️आहारातील तृणधान्यातून सुदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमार्फत विशेष मोहिम
- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड (जिमाका) दि. 27 :- इथल्या मातीच्या गुणधर्मानुसार व पर्यावरणातील विविधतेनुसार मानवी शरीराला पोषक मूल्य देणारे अनेक तृणधान्य निसर्गाने देऊ केलेले आहेत. अनेक पिढ्यांपासून आपण ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राजगीरा ही तृणधान्य खात आलो आहोत. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी याच आहारावर आपले आरोग्य उत्तम ठेवले. अलिकडच्या काही वर्षात आपला आहार शरीराला न मानवणाऱ्या गहू, तांदूळ, डाळी यांच्या वरेमाप वापरावर केंद्रीत केल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या मूळ सत्वाकडे तृणधान्याच्या आहारातून पोषक सात्विकतेचा संदेश गावोगावी पोहचावा या उद्देशाने तृणधान्य आहार चळवळीला बचतगटाच्या माध्यमातून व्यापक स्वरुप देता आले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद व माविमच्यावतीने जिल्हा परिषद आवारात तृणधान्याचे महत्त्व व्यापक व्हावे यासाठी ज्वारी, नाचणीच्या ताज्या भाकरी व ठेचा, हुरडा स्टॉलच्या माध्यमातून प्रातिनिधीक स्वरुपात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लहान व अर्धापूर येथील बचतगटाच्या महिलांनी जिल्हा परिषदेच्या आवारात नियोजीत ठिकाणी नाचणी व ज्वारीच्या चुलीवरील भाकरी, चटणी, ठेचा, हुरडा याची अपूर्व प्रातिनिधीक स्वरुपात मेजवानी दिली.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तृणधान्याचे आहारातील महत्त्व यावर संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा महोत्सव घेण्यात येऊन फास्टफूडकडे सरकत जाणाऱ्या आपल्या आहाराला आरोग्यवर्धक पोषक आशा स्लोफूड अर्थात तृणधान्याकडे वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
000000






वृत्त क्रमांक 45

 जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने

28 ते 30 जानेवारी पर्यंत बंद 

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणुकीचे मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यंत 28 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

 

नांदेड जिल्ह्याती किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजे शनिवार 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजेपासून ते सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. या आदेशाचा उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.  

Thursday, January 26, 2023

वृत्त क्रमांक 44

 जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते

मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण

 

·  भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

नांदेड (जिमाका), दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या वीरपत्नी श्रीमती सुधा शिंदे यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे यांच्याकडून प्राप्त ताम्रपट व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर सुभेदार पोतगंते दत्ता मारुती यांना ऑपरेशन रक्षकमध्ये कर्तव्य बजावत असतेवेळी अपंगत्व प्राप्त झाले असल्यामुळे त्यांना ताम्रपट देण्यात आला. याचबरोबर ए. आर. पवार, फयाज यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील शिवेंद्रराज पाटील, अरुण लिंगदळे, अजित मुंढे, स्पर्श शिप्परकर, तन्वी कौठेकर, अदित्य मोग्गावार, निनाद बरडे, आर्यन पाटील, आरुष शेरीकर, वेदांत मोतेवार, श्लोक लढ्ढा, संचित बोरगावे, काव्या इंगळे, अश्मित कौशल्ये, मुकुंद भुतडा, प्रत्युशकुमार, महतो सर्वेश वाघमारे, सदाशीव केशराळे, सुघोष काब्दे, ओवी साधून, सार्थक पेठकर, श्रिया टेंभुर्णे, नंदकिशोर बसवदे, अनय पांडे, राजनंदिनी हिवराळे, ओमकार सैदमवार, जय पतंगे, कौस्तुभ देशपांडे, कौस्तुभ जाधव, प्रहर्ष चुंचूवार यांना शिष्यवृत्ती मिळाल्या निमित्त पुरस्कार वितरीत केले. यावेळी जिल्हा परिषद शाळा वडेपुरीच्या विद्यार्थ्यांनी सायबर अवेरनेसवर पथनाट्य सादर केले. सगरोळी येथील सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले.    

 

यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीसबल, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, वाहतुक पोलीस शाखा पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक, राष्ट्रीय छात्रसेना, सैनिकी शाळा, स्काऊट पथक, स्टुडंट पोलीस कॅडेड, पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड,मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, आपदा मित्र, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, कृषि विभाग चित्ररथ, पोलीस विभाग मोटर सायकल पेट्रोलींग या प्लाटूनी पथसंचलनात सहभाग घेतला.  

000000














Wednesday, January 25, 2023

वृत्त क्रमांक 43

 ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी विशेष मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 25  :- जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पीक पेरा नोंदणी करावी. यासाठी 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हाभरात ई-पीक पेरा नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी अशा स्वयंसेवकांच्या सहकार्याने ई-पीक पेरा नोंदवण्याची मोहिम पार पाडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपमध्ये ई-पीक पेरा अचूक नोंद करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी Real time crop data संकलित होण्याच्यादृष्टिने तसेच सदर डाटा / माहिती संकलन करतांना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप चालू करून त्यात पीक पाहणी नोंदवण्याची नवीन पद्धत शासनाने सुरू केली आहे. पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी, पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेचा आहे.  

00000

वृत्त क्रमांक 42

जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधून 

3 लाख 50 हजार  विद्यार्थी बालविवाह विरोधी घेणार  शपथ  

नांदेड (जिमाका) दि. 25  :- मुलींना आपले भावाविश्व निकोप जपून सुदृढ होता यावे यासाठी #बेटी_बचाव_बेटी_पढाव ही चळवळ सुरु आहे. हा संदेश प्रत्येक गावात पोहचावा यासाठी प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील सुमारे तीन लाख पन्नास हजार विद्यार्थी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेणार आहेत.  

नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक / माध्यमिक शाळा तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023 रोजी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे (आम्ही बाल विवाह करणार नाही व इतरांना करूही देणार नाही) आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात शाळेतील ध्वजारोहन संपताच ही शपथ घेतील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. 

दिनांक 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून तसेच बेटी बचाओ-बेटी पढाओ हा कार्यक्रम अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी दिनांक 18 ते 24 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बेटी बचाओ-बेटी पढाओ या योजनेचा मुळ उद्देश लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणाबाबत खात्री देणे व मुलीच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे आहे. .

0000



वृत्त क्रमांक 41

 अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

नांदेड (जिमाका) दि. 25  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.  

 

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

 

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 40

 किनवट येथे अकरा तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही

 

नांदेड (जिमाका) दि. 25  :- किनवट शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 23 जानेवारी रोजी किनवट शहरात अचानक धाडी टाकून 11 तंबाखू विक्रेत्यांकडून 7 हजार 800 रुपये दंड आकारण्यात आला.

 

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, प्रकाश आहेर तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मामीडवार, पो.हे.कॉ. श्री वाडगुरे व ना.पो.कॉ. श्री पाटोदे आदी होते.

 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...