Tuesday, August 30, 2022

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  52 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, उमरी 1 असे एकूण 3 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 418 एवढी झाली असून यातील 1 लाख 708  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 2 तर नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 असे एकूण 4  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 7,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 11 असे एकूण 18 व्यक्ती उपचार घेत आहेत 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 16 हजार 897
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 96 हजार 59
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 418
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 708
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-
 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-18
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती

विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- बुधवार 31 ऑगस्ट रोजी श्री गणेशाची स्थापना होवून गणपती उत्सवास सुरवात होत आहे. 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार पाण्याचे प्रदुषण होवू नये म्हणून पीओपीच्या गणेश मूर्ती नदी पात्रात विसर्जन करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. गणेश भक्तांनी व सार्वजनिक गणेश मंडळानी पीओपीच्या गणेश मूर्ती व निर्माल्य गोदावरी व आसना नदीत विसर्जित न करता मनपाच्या संकलन केंद्राकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त       डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.

 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्यावतीने सांगवी (आसना नदी) आणि पासदगाव या दोन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात घरघुती लहान व मध्यम आकाराच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करावे असे त्यांनी सांगितले आहे. तसेच मोठया गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था नानकसार गुरुद्वारा साहिब झरी (खदान) या तलावात करण्यात आली आहे. श्री गणेश मूर्तीच्या संकलनासाठी मनपाच्यावतीने क्षेत्रिय कार्यालय क्र. 1 व 6 अंतर्गत मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मनपाच्यावतीने नेमण्यात आलेल्या ठिकाणी गणेश भक्तांनी व गणेश मंडळानी कर्मचाऱ्यांकडे आपली गणेश मूर्ती सुपूर्द कराव्यात असे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सांगितले. या कामासाठी महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दोन सत्रात नेमणूक करण्यात आली आहे. पासदगाव, सांगवी येथील कृत्रिम तलावात तसेच नानकसर गुरुद्वारा साहिब झरी (खदान) येथे श्री गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जनासाठी आवश्यक टेम्पो (आयचर), क्रेन, टाटा-एस व इतर आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

0000

 गणेशोत्‍सव देखावा सजावट स्‍पर्धा 2022

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- मतदानाविषयी अधिक जनजागृती निर्माण व्हावी व मतदारांनी आपल्या मतदानाच्या कर्तव्याचे चोख पालन करावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ही गणेशात्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या विषयासंबंधी असून गणेशोत्सव उत्कृष्ट देखावा सजावट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे दिले जाणार आहेत.

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असुन यंदाच्या स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटी सोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानाही या स्‍पर्धेत सहभागी होता येणार आहे.  या स्पर्धेसाठी सहभागी होवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सजावटीचे छायाचित्रे जास्‍तीत जास्‍त 5 एमबी साईजचे व जेपीजी फॉरमॅटमध्‍येच पाठवावेत. ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) साईज जास्‍तीत जास्‍त 100 एमबी असावी. तसेच ध्वनिचित्रफीत एमपी 4 फॉममॅटमध्‍ये असावी आणि ती एक ते दोन मिनिटांची असावी हे साहीत्य पाठवायचे आहे.

मताधिकार हा १८ वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी  प्रत्येक पात्र नागरीकांने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणेमतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणेहे सूत्र केंद्रस्थानी ठेवुन मंडळाना देखाव्यांच्या माध्यमातुन तर घरगुती पातळीवर गणेश - मखराची  सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या  भाविकांमध्ये यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावतानाजात, धर्म, पंथ, निरपेक्ष राहुन आपला  लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणेयासारख्या विषयावर आपल्या देखाव्याच्या सजावटीतून जागृती करता येवु शकते. या स्पर्धेची सविस्तर नियमावली मुख्य निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयाचे https://ceo.maharastra.gov.in/  या  संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमावर देण्यात आलेली आहे.

स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळानी आणि  घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी  31 ऑगस्‍ट  ते 9 सप्टेंबर 2022  या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहीती  भरुन आपल्या देखावा सजावटीचे चांगल्‍या प्रतीचे फोटो पाठवायचे आहेत. या स्‍पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी यांच्‍याकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी प्रथम क्रमांक 51 हजार, व्दितीय क्रमांक 21 हजार, तृतीय क्रमांक 11 हजार व उत्‍तेजनार्थ 5 हजार रूपयाचे एकुण 10 बक्षिसे देण्‍यात येणार आहेत. घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी प्रथम क्रमांक 11 हजार, व्दितीय क्रमांक 7 हजार, तृतीय क्रमांक 5 हजार व उत्‍तेजनार्थ 1 हजार रूपयाचे एकुण 10 बक्षिसे देण्‍यात येणार आहेत. याप्रमाणे बक्षिसांचे स्‍वरूप आहे. या स्‍पर्धेत सहभागी सर्व स्‍पर्धकांना मुख्‍य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्‍यात येणार आहे.

या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डची जोडणीमतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्‍ती, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागु झालेल्या चार अर्हता तारखा (1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्‍टोबर )  यांसाठी प्रसार-प्रचार केला जावा. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांनी केले.

0000

 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडीया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टँडई-2020/प्र.क्र.23/अजाक,9 डिसेंबर 2020 अन्वये निश्चित करण्यात आलेल्या आहेतहा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्हयातील इच्छूक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक पी. जीखानसोळे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  4.50 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 30 :- जिल्ह्यात मंगळवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 4.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 863.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे.


जिल्ह्यात मंगळवार 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.70 (858.70), बिलोली-1.50 (827.70), मुखेड- 0.10 (761.40), कंधार-0.60 (777.70), लोहा-6.70 (799.80), हदगाव-1.70 (801.70), भोकर-0.50 (955.50), देगलूर-00 (714.40), किनवट-11.30 (1002), मुदखेड- 0.50 (1017.70), हिमायतनगर-2 (1108.60), माहूर- 16.90 (868.90), धर्माबाद- 23.90 (1031.80), उमरी- 1.70(1028.60), अर्धापूर- 0.50 (813.60), नायगाव-8.40 (774.50) मिलीमीटर आहे.

0000

सुधारीत वृत्त क्र.  806

राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त विविध उपक्रमांची

प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी 

 नांदेड (जिमाका) दि. 30 :- महिला व बालकाचे आरोग्य सूदृढ करण्यासोबत त्यांच्या  पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवुण आणण्याकरिता त्यांच्यामध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने 1 ते 30 सप्टेंबर 2022 राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी विविध कार्यक्रमांची  प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय पोषण महिना या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, विस्तार अधिकारी सुधीर सोनावणे, प्रकल्प बालविकास अधिकारी विजय बोराटे, मिलिंद वाघमारे तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थिती होते.  नांदेड जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची दृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले. 

राष्ट्रीय पोषण महिना चार प्रमुख संकल्पनेवर आधारित असून यामध्ये महिला व स्वास्थ, बालक आणि शिक्षण- पोषणाबरोबर शिक्षण देखील महत्वाचे असून लिंग संवेदनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन, आदिवासी भागातील महिला व मुलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ वरील संकल्पनेवर राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे. यासाठी पुरक आहाराबाबत जनजागृती निर्माण करणे, खेलो और पढो अंतर्गत खेळण्यांव्दारे शिक्षण देणे खेळण्यांच्या आधारे शिक्षण व खेळण्यातून प्रोत्साहन देण्यासाठी समुदाय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. बालक, गरोदर महिला, स्तनदा माता, व किशोरवयीन मुलींसाठी ॲनिमिया कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.पाणी व्यवस्थापण पावसाचे पाणी साठविणे या विषयांवर गावांतील महिलांना जागृत करणे तसेच अंगणवाडी केंद्रात गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींसाठी योग सत्राचे आयोजन करणे असे या विविध उपक्रम प्रभावीपणे  राबविण्यासाठी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी दिली.

000000   







Monday, August 29, 2022

 राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

सहभागी होणाऱ्या मंडळासाठी 30 ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन   

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाखद्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 ऑगस्ट 2022 हा आहे. याबाबत दिनांक 26 ऑगस्ट 2022 पासून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर दिनांक 30 ऑगस्ट 2022 पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईलअशी माहिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिली.

 

असे आहेत निकष

मूर्ती पर्यावरणपुरक असावी. सजावट पर्यावरणपुरक म्हणजेच यात थर्माकोल, प्लॅस्टीक आदी साहित्य असता कामा नयेत. गणेश मंडळाचे वातावरण ध्वनीप्रदुषण रहित असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट असावी. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट याला अधिक गुण दिले आहेत. रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबिर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत केलेल्या कार्याचे मूल्यमापन होईल. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत मंडळाचे कार्य असावे. पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धा, पारंपारिक / देशी खेळाच्या स्पर्धा याचबरोबर गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यात पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त याबाबी प्राधान्याने गुण देताना विचारात घेतल्या जाणार आहेत. अर्ज करताना कोणतेही शूल्क आकारण्यात येणार नाही.

 

अशी आहे जिल्हास्तरीय समिती

 वर नमूद केलेल्या बाबींची जे गणेश मंडळ पूर्तता करणार आहेत, त्यांना गुणांकन देऊन विजेत्याची निवड करण्याकरीता जिल्हास्तरीय समितीची रचना पुढील प्रमाणे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. शासकीय / शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, संबंधीत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी या समितीचे सदस्य राहतील. सदर समिती गणेशोत्सव उत्सव स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक ती माहिती, व्हिडिओ, कागदपत्र मंडळाकडून प्राप्त करून घेतील व दिनांक 13 सप्टेंबर पर्यंत मंडळांना दिलेले गुणांकन राज्य समितीला सादर करतील.

 

राज्यस्तर समितीची रचना करण्यात आली असून यात सर जे.जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता / वरिष्ठ प्राध्यापक, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातील वरिष्ठ गट अ मधील अधिकारी यांचा समावेश आहे. राज्यस्तर समिती ही जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येकी एक याप्रमाणे 36 शिफारस प्राप्त गणेशोत्सव मंडळामधून गुणांकनाच्या अधारे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करतील.

000000   

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  36 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1 असे एकूण 3 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 415 एवढी झाली असून यातील 1 लाख 704  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 3 तर नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 9 असे एकूण 12  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 8,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 11 असे एकूण 19 व्यक्ती उपचार घेत आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 16 हजार 845
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 96 हजार 11
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 415
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 704
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-19
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 निवडणूक ओळखपत्रांशी

आधार लिंकीगसाठी शिबिराचे आयोजन   

·         11 सप्टेंबर रोजी मासिक विशेष शिबिराचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मतदार यादीच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी, मतदारांचे निवडणूक ओळखपत्रांशी आधार लिंकींग करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने मतदार यादीच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी मतदारांकडून आधार तपशिल गोळा करण्याबाबतच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. जास्तीत जास्त लोकसहभाग व मतदारांचे निवडणूक ओळखपत्रांशी आधार लिंकीग करण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील 344 तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील एकुण 308 मतदान केंद्रावर 10 सप्टेंबर 2022 पर्यंत शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात मतदार ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार तथा सहा. मतदान नोंदणी अधिकारी यांनी केले आहे. 

मतदारांनी पुढीलप्रमाणे मतदार ओळखपत्रास आधार लिंकीग करुन घ्यावे. मतदाराना व्होटर हेल्प लाईन ॲपद्वारे आधार लिंकीग करण्यासाठी निर्देशित करावे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक चालक यांच्याद्वारे मतदार ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करुन घेण्यात यावे. तसेच दंवडीद्वारे याबाबत प्रचार व प्रसार करण्यात यावा. संबंधित बीएलओशी संपर्क करुन मतदान केंद्रावर जावून मतदार ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करुन घेण्यात यावे. तहसिल कार्यालय नांदेड येथील बीएलओ कक्ष (निवडणूक विभाग) येथून मतदार ओळखत्रास आधार लिंकीगचे काम करुन घेण्यात यावे. नांदेड तालुक्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रावर विनामुल्य देखील 100 टक्के मतदार ओळखपत्राशी आधार लिंकीगचे काम पूर्ण करुन घ्यावे. 

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 11 सप्टेंबर 2022 रोजी मासिक शिबिराचे आयोजन मतदार केंद्रावर करण्यात येणार आहे. या शिबिरात उर्वरित असलेले मतदार ओळखपत्राशी आधार लिंकीगचे काम 100 टक्के पूर्ण करुन घ्यावे, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत. याबाबत सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे संबंधित वसुली अधिकारी, सुपरवायझर यांना आदेशित केले आहे, असे तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 नरेगा विभागात तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्हाधिकारी कार्यालयातील नरेगा विभागास तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून बी.पी. घाडगे यांची निवड झाली आहे. 1 ऑगस्ट पासून ते रुजू झाले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता निर्माण होण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण प्राधिकारी तथा स्वायत व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजना कक्षात तक्रार पेटी ठेवण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेसंदर्भात अथवा मनरेगा संदर्भात जर कुणाच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी आता जिल्हाधिकारी कार्यालयात उपरोक्त प्राधिकारी यांच्याकडे नोंदविता येतील असे उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी कळविले आहे. 

 सर्व सामान्य नागरिकांना या योजनेतर्गत काम करणारे, मजूर या योजनेचे लाभार्थी तसेच क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व अंमलबजावणी यंत्रणाना असणे आवश्यक आहे. त्यासाठी या व्यवस्थेची माहिती दर्शविणारे फलक अथवा पोस्टर्स/फ्लेक्स सर्व पंचायत समिती, तहसिल कार्यालय, सर्व अंमलबजावणी यंत्रणाची तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय/मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपवनसंरक्षण वन विभाग/विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग नांदेड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय/जिल्हा रेशीम विभाग, सर्व ग्रामपंचायत स्तरावर व इतर संबंधित कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. याच बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो कक्षात तक्रार पेटी ही ठेवण्यात आली आहे. ज्याना तक्रार सादर करयची आहे त्यांनी बाळासाहेब घाडगे, तक्रार निवारण प्राधिकारी (नरेगा), जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड (रोहयो विभाग), मोबाईल क्रमांक 9405806999/9423135100, ई-मेल- ghadgepatil222@gmail.com  वर संपर्क साधावा असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

0000

 ई-पीक पाहणी ॲपद्वारे

शेतकऱ्यांनी पीक पाहणी करुन घ्यावी

-         जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी-          

नांदेड (जिमाका) दि. 29 :- खरीप हंगाम 2022 ची पीक पाहणी नोंदविण्याची मोहिम 1 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या मोहिमेत 100 टक्के पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अप्लीकेशनद्वारे करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पिक पेरा याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी वेळेत ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे. 

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना उदा.महाडीबीटी, शासकीय धान्य खरेदी , पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत तसेच इतर काही योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्वभवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

00000

 पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी

सर्वाधिक प्राधान्य द्या

- जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी 

·  परस्पर हिताला जपत मोठ्या उत्साहात

गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्धार 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- गत दोन वर्षात इतर उत्सवासह गणेश उत्सव आरोग्याला प्राधान्य देत आपण मर्यादेत साजरा केला. यावर्षी आरोग्याचे आव्हान कमी असले तरी पर्यावरण संतुलनाचे आव्हान मात्र कायम आहे. हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना आपण घरापासून ते गणेश उत्सव मंडळापर्यंत पर्यावरणपुरक हिताला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन येथे आयोजित आज शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.   

या बैठकीस महापौर जयश्रीताई पावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, शांतता समितीची सन्माननीय सदस्य गोविंदप्रसाद बालाप्रसाद बालानी, बाबा बलविंदर सिंघ, भदन्त पंच्चाबोधीजी थेरो, संपादक मुन्‍तजोबोद्यीन मुनिरोद्यीन, मो. शोएब मो. खालेद व इतर मान्यवर उपस्थित होते. 

राज्यातील गणेश उत्सवासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक एक आठवड्यापूर्वी झाली. यात राज्य पातळीवर शासनाकडून पुरस्कार देण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत राज्य पातळीवर उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळासाठी रोख 5 लाख, 2 लाख 50 हजार आणि 1 लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिली. उत्कृष्ट गणेश उत्सव निवडीसाठी शासनाने पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (प्लास्टिक आणि थर्माकोल याचा वापर नाही), ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूल, सामाजिक सलोखा आदी विषयावर देखावा, सजावट या कार्यासाठी विशेष गुण शासनाने दिले आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट आणि गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा याला सर्वाधिक प्रत्येकी 25 गुण देण्यात आलेले आहेत. निवडीच्या या निकषावरुन पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला चालना देण्याचे शासनाचे धोरण स्पष्ट असल्याचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. 

सोशल मिडियाचा गैरवापर झाल्यास कठोर कारवाई

-        जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे 

शांततापूर्ण गणेश उत्सव ही नांदेडची ओळख आहे. येथील विविध धार्मिक स्थळातून संहिष्णुतेला अधिक प्राधान्य दिले गेले आहे. यावर्षीचा गणेश उत्सव सर्व नांदेडकर तेवढ्याच जबाबदारीने व आनंदाने साजरा करतील. कोणीही कायदाचा भंग करणार नाही याची मला खात्री असून सोशल मिडियावर पोलीसांचा कडा पाहरा असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्पष्ट केले. गत एक वर्षाच्या काळात नांदेड जिल्ह्यात किमान एक हजारावर व्यक्तींना आपण सोशल माध्यमाच्या गैर वापराबद्दल कारवाई केली आहे. हे तरुणांनी लक्षात घेऊन अधिक सकारात्मक सामाजिक काम करण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डीजे सारख्या वाद्यांना बंदी आहे. याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीच्या मूर्तींना अटकाव करण्यात आला आहे. लोकांनीच कायदा समवेत स्वयंशिस्त पाळून प्रदूषण मुक्त व पर्यावरणयुक्त गणेश उत्सवाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 विसर्जनाच्यावेळी मोठ्या गणेश मंडळांनी

आपली वेळ विभागून घ्यावी - महापौर जयश्रीताई पावडे 

सर्वच गणेश उत्सव मंडळ एकाचवेळी विसर्जनासाठी बाहेर पडतात. प्रत्येकात उत्साह संचारलेला असतो. तथापि यावेळा जर विभागून वेगवेगळ्या घेता आल्या तर त्याची सर्वाअर्थाने जिल्हा प्रशासनाला मदत होईल व प्रत्येकाला आपला आनंद द्विगुणित करता येईल, असे महापौर जयश्रीताई पावडे यांनी सांगितले. गणतीच्या विसर्जनाच्या पावित्र्यासमवेत आपण श्रद्धेने घेतलेल्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळणाऱ्या आहेत का हेही तपासूण घेतले पाहिजे. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना घेण्याऐवजी शाडू मातीच्या अथवा निसर्गपूरक मूर्ती लोकांनी बसविण्यावर भर दिला पाहिजे. याचबरोबर देवाला अर्पण केलेले निर्माल्य, वस्त्र हे कोणत्याही परिस्थितीत नदीत जाता कामा नयेत, अशा सूचना महापौर जयश्रीताई पावडे यांनी यावेळी केल्या. महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरण गणेश उत्सवाला चालना देण्यासाठी झोननिहाय पुरस्कार देत असल्याची घोषणा त्यांनी या बैठकीत केली. 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी

मनपाकडून स्वतंत्र व्यवस्था

- आयुक्त डॉ. सुनील लहाने   

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार गोदावरी, आसना नदीतील पाण्याचे प्रदुषण होऊ नये म्हणून आपली श्री गणेश मूर्ती (पीओपी) नदीपात्रात विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यासाठी महानगरपालिकेच्यावतीने सांगवी (आसना नदी) आणि पासदगाव या दोन ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात अशा गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. याचबरोबर नानकसर गुरुद्वारा साहिब झरी (खदान) या तलावात मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आल्याचे मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सांगितले. मनपाच्यावतीने क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रत्येक झोनमध्ये मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात येत असून आपण प्रत्येकाने त्या-त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांकडे आपली मूर्ती सुपूर्द करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या सन्मानिय सदस्यांनी अमूल्य सूचना केल्या.

000000





Saturday, August 27, 2022

 प्रसाद योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास

- खासदार प्रताप चिखलीकर

येत्या दहा दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत आढावा बैठक
नांदेड, दि. 27 (जिमाका) :- नांदेड जिल्ह्याला विविध तीर्थक्षेत्राची स्थळे लाभली असून यातील पावित्र्य जपत त्या-त्या तीर्थस्थळांच्या विश्वस्तांसमवेत चर्चा करुन केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत विकास केला जात आहे. जिल्ह्यातील तब्बल 26 तीर्थक्षेत्रांवरील विविध विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन येत्या 10 दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश खासदार प्रताप चिखलीकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांनी टप्पा 1 प्रणालीमध्ये सुचविल्याप्रमाणे सुमारे 26 कामे प्रस्तावित केले आहेत. या कामांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, रोहीत तोंदले, सर्व तालुक्यांचे उपअभियंता याबैठकीस उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात राहेर येथील नृसिंह मंदिरापासून माहूरच्या दत्त शिखर संस्थानापर्यंत प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणे असलेल्या तीर्थस्थळांवर नागरिकांची मोठी श्रध्दा आहे. कंधार तालुक्यातील बोरी (बु.) येथे लोअर मनार प्रकल्पाच्या जलाशयाच्या काठावर असलेले महादेव मंदिर व धरणाच्या पाण्यात साकारलेले बेट हे पर्यटनाच्या मोठ्या प्रमाणात संधी घेऊन उभे असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले. होट्टल येथील सिध्देश्वर मंदिर व परिसर, कोलंबी येथील 108 दत्त संस्थान प्रतिष्ठाण, गोरठा येथील श्री. संत दासगणु महाराज आदि विविध तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रत्येक संस्थानातील तीन कोटी रुपयांपर्यंतच्या विकास कामांचा आराखडा येत्या दहा दिवसात सादर केल्यावर त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल. याचबरोबर जिल्ह्यातील काही तीर्थस्थळांना लागणारा निधी हा अधिक आहे. निधीच्या उपलब्धतेप्रमाणे जे काम अतिशय अत्यावश्यक आहे ती कामे व त्याच्या प्रस्तावावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील अनेक भागातील संस्थानावर भाविकांच्या श्रध्दा आहेत. नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथे साईबाबा संस्थान, कंधार तालुक्यातील गुंडा येथे नागबर्डी (नागदेवता) संस्थान पर्यटनासह पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाखमोलाचे आहे. याठिकाणी कोणत्याही वृक्षाचे साधे पानही तोडल्या जात नाहीत. लिंबाची असंख्य झाडी हे या स्थळांचे वैशिष्ट्य आहे. लोकांच्या श्रध्देसह पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्वाच्या असलेल्या अशा विचारांनाही आपण चालना दिल्या पाहिजेत, असे खासदार चिखलीकर यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी यांनी हे काम अधिक पुर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग प्रमुखांना यावर तात्काळ कार्यवाही करुन वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे सूचना दिल्या.
00000





Friday, August 26, 2022

 जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश चतुर्थी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे 9 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात श्री गणेश विसर्जन मिरवणूका होवून विसर्जनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सार्वजनिक  शांतताकायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत.  

 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश स्थापने निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, सिएलएफएलटीओडी-3 व एफएल/बिआर-2 व टिडी-1 अनुज्ञप्तीधारकांना अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...