Wednesday, May 19, 2021

सन 2020 साठी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  राज्यात दरवर्षी शेती पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. सर्व शेतकरी बंधु भगिनी, शेतकरी गट/संस्था यांनी या पुरस्काराच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहुन कृषि पुरस्कारासाठी आपला परीपुर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात 30 जुन पर्यंत सादर करावा. विविध कृषि पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मा.आयुक्त (कृषी ) यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

 

पुरस्काराचे नाव देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या व रक्कम पुढीलप्रमाणे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- एक (राज्यातून एक) पुरस्काराची रक्कम 75 हजार. वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार- 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 50 हजार. जिजामाता कृषिभुषण पुरस्कार- 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 8) रक्कम 50 हजार. कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 50 हजार. युवा शेतकरी पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 30 हजार. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 30 हजार. उद्यान पंडीत पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 25 हजार. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-40 (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकुण 40) रक्कम 11 हजार. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार-9 (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे एकंदर एकूण 9) याप्रमाणे पुरस्काराचे स्वरुप राहिल.

 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध कृषी पुरस्कार सन 2020 साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यावर्षी नवीन शासन निर्णय क्रमांक कृपु-2020/ प्र.क्र12/4अे, मंत्रालय मुंबई-32, दि.15 फेब्रवारी 2021 अन्वये विविध कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. काही अंशी निकषामध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय नाविन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातुन एक याप्रमाणे एकुण आठ युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार ह्या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे, असे कृषि विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...