Wednesday, September 30, 2020

 

 माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत

बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना  

-         मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी हे अभियान सुरु असून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांच्या गटव्यवस्थापक यांच्यामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती व लोकसहभागाला चालना द्यावी. ही जनजागृती करताना मास्कचा  वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे या त्रिसुत्रीचा प्रभावीपणे वापर करावा. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा संदेश देतांना प्रत्यक्ष कृतीतून जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.

जिल्हा आरोग्य विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेत कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, महिला आर्थिक विकास महामंडळ विभागाचे तीस प्रभाग व्यवस्थापकांची उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत बचतगटाच्या व्यवस्थापकांनी  ग्रामीण भागात माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत कार्यक्रम घ्यावेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरीकांना सविस्तर माहिती द्यावी. गृहभेटीद्वारे आरोग्य व आहाराबाबत जनजागृती करावी असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी म्हणाले, ग्रामीण भागात माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत जनजागृती करतांना त्यांच्या बोली भाषेत करावी. कोरोना सारख्या या संकटात आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना रुजवून त्रीसुत्रीचा वापर करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले.    

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल उपस्थितांना विस्तृत माहिती दिली. नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत होम आयसोलेशन किट तयार केली आहे असेही सांगितले. यावेळी सर्वांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले. यावेळेस प्रश्नमंजुषा कार्यक्रम झाला. शेवटी जिल्हा समन्वयक श्री. राठोड यांनी आभार मानले.

00000





 

कोरोना पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना

जिल्ह्यात दहा केंद्रावर एम.एच.टी.-सीईटी-2020 प्रवेश परीक्षा होणार 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एम.एच.टी.-सीईटी 2020 चे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखालील नांदेड जिल्हयातील 10 केंद्रावर करण्यात आले आहे. ही परीक्षा येत्या 1 ते 9 ऑक्टोंबर 2020 पर्यंत पीसीबी ग्रुपसाठी तर 12 ते 20 ऑक्टोंबर दरम्यान पीसीएम ग्रुपसाठी होणार आहे. नांदेड जिल्हयात सर्व 10 केंद्रावर 18 हजार 920 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

एमएचटी-सीईटी- 2020 या प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल. पीसीबी गटात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांसाठी दि. 1 ते 9 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत ही परीक्षा सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 पर्यंत प्रथम सत्रात तर दुपारी 12.30 ते सायं. 6.45 वा. पर्यंत द्वितीय सत्रात होईल. तसेच पीसीएम गटात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणीत या विषयांसाठी 12 ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत ही परीक्षा सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 पर्यंत प्रथम सत्रात तर दुपारी 12.30 ते सायं. 6.45 वा. पर्यंत द्वितीय सत्रात ही परीक्षा होणार आहे.   

जर एखादा परीक्षार्थी कोव्हिड-19 पॉझिटिव्ह किंवा संशयित असल्यास त्यांची परीक्षा शेवटच्या सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षार्थींना प्रवेश हा प्रथम सत्रासाठी सकाळी 7.30 वाजता तर द्वितीय सत्रासाठी दुपारी 12.30 वा. दिला जाईल. थर्मल स्कॅनिंग तपासणी जर सामान्य असेल तर प्रवेश अथवा अर्धा तास प्रतिक्षेनंतर पुन्हा तपासणी करुन तापमाण सुरक्षित असेल तरच प्रवेश दिला जाईल. जर तापमाण अधिक असेल तर परीक्षार्थीला घरी पाठवून देण्यात येईल. 9 ऑक्टोंबर रोजी द्वितीय सत्रात पीसीबी गट आणि 20 ऑक्टोंबर रोजी द्वितीय सत्रात पीसीएम गटाच्या परीक्षार्थीची विलिगीकरणासह परीक्षा घेण्यात येईल. 

जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातुन नांदेड शहरात येण्यासाठी विहित वेळेत बस सेवा आगारातून उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत पुरवण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्यामार्फत आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक सत्रानंतर परीक्षा केंद्र सॅनिटाइज करुन घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखणे याबाबींचे पालन सक्तीने करावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेचे डीएलओ पी. डी. पोपळे यांनी केले आहे.  00000

 

एमएचटी-सीईटी-2020 परिक्षेला

जाण्या-येण्यासाठी उमेदवारांसाठी बसेसची सोय 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- एमएचटी-सीईटी 2020 या परीक्षा कालावधीत परिक्षार्थी उमेदवारांच्या मागणी व आवश्यकतेनुसार नांदेड विभागातील प्रत्येक आगारातून अतिरिक्त बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नांदेड बसस्थानकावरुन परिक्षा केंद्राच्या ठिकाणी परिक्षार्थी उमेदवार व पालकांना जाण्या-येण्यासाठी बसेस उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परिक्षार्थी उमेदवारांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत येणार असून सर्व आगार व्यवस्थापकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य परिवहन नांदेडचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे. 

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी शासकिय शासन अनुदानित व खाजगी विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र व कृषी तंत्रज्ञान विभागातील प्रथम वर्षे पदवी अभ्यासक्रमाचे सामाईक प्रवेश परिक्षेद्वारे (एमएचटी-सीईटी-2020) राज्य सामाईक प्रवेश परिक्षा दिनांक 1 ते 20 ऑक्टोंबर 2020 (दिनांक 3,10,11,17 व 18 ऑक्टोंबर 2020 वगळून) या कालावधीत दोन सत्रामध्ये प्रथम सत्र 7.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तर व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते सायं 6.45 पर्यंत नांदेड जिल्हयात 11 विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यातून विद्यार्थी व पालक येणार असून त्यांना या परिक्षा केंद्राच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी कोव्हिड-19 सर्व नियमांचे व सामाजिक अंतराचे पालन करुन राज्य परिवहनच्या बसेस उपलब्ध करुन परिक्षार्थी उमेदवारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले होते.

 विद्यापीठ परिसरातील सहा परिक्षा केंद्रासाठी बसेसची संख्या 6 असून बसेस सोडण्याची वेळ प्रथम सत्रासाठी सकाळी 6 वा. तर द्वितीय सत्रासाठी सकाळी 11 वा. राहील. परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. 1) आयऑन डिजीटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी सहयोग कॅम्पस नांदेड 2) हॉरिझॉन इंटरनॅशनल सीबीएसई स्कुल विष्णुपुरी नांदेड 3) एसएसएस इंदिरा इन्स्टीटयुट ऑफ टेकनॉलॉजी पॉलीटेकनिक विष्णुपुरी नांदेड 4) श्री गुरुगोविंद सिंघजी इन्स्टीटयुट इंजिनिअरींग अॅन्ड टेकनॉलॉजी विष्णुपुरी नांदेड 5) ग्रामिण कॉलेज ऑफ इंजिनिअरींग विष्णुपुरी नांदेड 6) मातोश्री प्रतिष्ठान ग्रूप ऑफ इन्स्टीटयुट जिजाऊनगर खुपसरवाडी नांदेड. तर 7) कलावतीबाई कॉलेज ऑफ इंजि. अॅन्ड टेक.पॉली, लालवाडीरोड नायगाव बाजारसाठी बसेसची संख्या 2 असून प्रथमसत्रासाठी सकाळी 5 वा. व द्वितीय सत्रासाठी वेळ सकाळी 10 वाजता बसेसची वेळ राहील. 8) किड्स किंगडम इन्टरनॅशनल स्कुल, खुरगाव मालेगाव रोड नांदेड बसेसची 9) गोकुळधाम इन्टरनॅशनल स्कुल ऑनलाईन एक्झाम सेन्टर, भालकी व्हिलेज, मालेगाव रोड नांदेड केंद्रासाठी बस संख्या 2 असून प्रथमसत्रासाठी बसची वेळ सकाळी 6 वा. तर द्वितीय सत्रासाठी सकाळी 11 वाजता राहील. 10) महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कॉलेज नांदेड विमानतळाजवळ नांदेड 11) महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अॅन्ड इन्फारमेंशन टेकनॉलॉजी, विमानतळाजवळ हिंगोली रोड नांदेड या परीक्षा केंद्रांसाठी बसेची संख्या 2 असून प्रथम सत्रासाठी सकाळी 6.30 वा. तर द्वितीय सत्रासाठी वेळ सकाळी 10.30 वाजता राहील. उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी या बसेस उपलब्ध राहतील, असे राज्य परिवहन नांदेडचे विभाग नियंत्रण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.                  00000

 

कोरोना पार्श्वभूमीवर

आगामी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा

 जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होणारा यावर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा. त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात साजरा होणाऱ्या या सणांबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत खालीप्रमाणे मार्गदर्शक सूचना एका आदेशाद्वारे दिल्या आहेत.    

मार्गदर्शक सूचना :

·         सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

·         कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

·         या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्याअनुषंगाने करण्यात यावी.

·         देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट व घरगूती देवीच्या मुर्तीची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी.

·         यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शादूची, पर्यावरणपुरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

·         नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

·         गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

·         आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करावे.

·         देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

·         देवीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटाझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

·         देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतील विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

·         महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समिती निहाय मुर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी.

·         मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

·         विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

·         दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनासाठी आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे बघण्याची व्यवस्था करावी.

·         कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुर्नवसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी  निर्गमीत केला आहे.

000000

 

238 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

264 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 30:- बुधवार 30 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 238 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 264 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 81 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 183 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 254 अहवालापैकी 974 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 15 हजार 706 एवढी झाली असून यातील 11 हजार 953 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 255 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 56 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकुण पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मंगळवार 29 सप्टेंबर रोजी नायगाव तालुक्यातील नरसी येथील 72 वर्षाचा एक पुरुष, वडपुरा नांदेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर हडको नांदेड येथील 69 वर्षाचा एक पुरुष, अशोकनगर नांदेड येथील 67 वर्षाची एक महिला यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर बुधवार 30 सप्टेंबर रोजी मुखेड येथील 65 वर्षाची एक महिला मुखेड कोवीड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 403 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 9, बिलोली कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड केअर सेंटर 2, मुखेड कोविड केअर सेंटर 21, लोहा कोविड केअर सेंटर 10, धर्माबाद कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 11, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 1, किनवट कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर 13, मुदखेड कोविड केअर सेंटर 9, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 145, उमरी कोविड केअर सेटर 10 असे 238 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 46, मुदखेड तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 2, हिमायतनगर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 3, हिंगोली 2, उदगीर 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव तालुक्यात 8, धर्माबाद तालुक्यात 6, मुखेड तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 3, उमरखेड 1, परभणी 1 असे एकुण 81 बाधित आढळले.

  

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 115, अर्धापूर तालुक्यात 3, कंधार तालुक्यात 3, बिलोली तालुक्यात 9, हदगाव तालुक्यात 6, धर्माबाद तालुक्यात 5, किनवट तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 4, नांदेड ग्रामीण 6, मुदखेड तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 14, माहूर तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 5, नायगाव तालुक्यात 5, परभणी 1, असे एकूण 183 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 255 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 262, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 834, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 85, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 42, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 21, नायगाव कोविड केअर सेंटर 53, बिलोली कोविड केअर सेंटर 32, मुखेड कोविड केअर सेंटर 143, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 58, लोहा कोविड केअर सेंटर 47, हदगाव कोविड केअर सेंटर 52, भोकर कोविड केअर सेंटर 26, कंधार कोविड केअर सेंटर 20, बारड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 60, मुदखेड कोविड केअर सेटर 39, माहूर कोविड केअर सेंटर येथे 17, किनवट कोविड केअर सेंटर येथे 45, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 60, उमरी कोविड केअर सेंटर 41, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 18, खाजगी रुग्णालयात 277 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद 2, निजामाबाद 1, लातूर 2, अकोला 1, मुंबई 2, आदिलाबाद येथे संदर्भित 2  झाले आहेत.

 जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 83 हजार 322,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 64 हजार 46,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 15 हजार 706,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 11 हजार 953,

एकूण मृत्यू संख्या- 403,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 79 टक्के.

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 80,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 255,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 56. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...