Saturday, February 16, 2019


सहस्त्रकुंडच्या एकलव्य निवासी मॉडेल पब्लिक स्कुलच्या
नवीन इमारत संकुलाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-उद्घाटन
नांदेड दि. 16 :-  किनवट  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड ता. किनवट येथील एकलव्य निवासी मॉडेल पब्लिक स्कुलच्या  नवीन इमारत संकुलाचे ई-उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून करण्यात आले. या समारंभास राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री हंसराज अहिर, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार आदि मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम एकलव्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी सहस्त्रकुंड ता. किनवट येथे शाळेच्या नवीन इमारतीत ऑनलाईन पाहिला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल, कार्यकारी अभियंता पवार, सहायक प्रकल्प अधिकारी केशव शेगोकार, मुख्याध्यापक, सरपंच दिलीप तम्मडवार, पदाधिकारी व मुले-मुली उपस्थित होते.
एकलव्य निवासी मॉडेल पब्लिक स्कूलच्या या इमारतीचे बांधकाम सन 2016-17 मध्ये सुरु करण्यात आले. या इमारतीसाठी 15 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम 10 हजार 862 चौ.मी. इतके करण्यात आले आहे. शाळा इमारत बांधकाम अंतर्गत शाळा इमारत, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह, भोजनगृह, प्राचार्य निवासस्थान, शिक्षक निवासस्थान, खेळांचे मैदान, अभ्यागतासाठी शौचालय, विद्युतघर, खेळाडुसाठी मैदानावर चैजिंग रुम (शौचालयासह), वाहनतळ, अंतर्गत पक्के रस्ते, संरक्षक भिंत, स्ट्रिट लाईट, पाणी साठवण अंडरग्राउट टाकी आदि सुविधांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या शाळा बांधकामासाठी 15 एकर जमिन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जमिनीवर 24 कोटी 16 लाख रुपये खर्चून इमारत संकुल बांधण्यात आले आहे.
एकलव्य निवासी पब्लिक स्कुल ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या शाळेत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत वर्ग मान्यता आहे. या शाळेची एकुण प्रवेश क्षमता 420 असून 210 मुले व 210 मुलींना प्रवेश देण्यात येतो. अमरावती विभागातील एकुण 13 जिल्ह्यासाठी चिखलदरा व सहस्त्रकुंड या दोन शाळामध्ये विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षा घेऊन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येतो. या शाळेचा आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लाभ होणार आहे. 
यावेळी पुणे येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळविलेल्या एकलव्यच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देवून गौरविण्यात आले. आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी यांनी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटूंबियांना देण्यासाठी संकलित केलेल्या 21 हजार रुपयांच्या निधीचा धनादेश श्री गोयल यांना सुपूर्द केला.
00000


No comments:

Post a Comment

  लक्षवेध सादर निमंत्रण भारताच्या ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभ २६ जानेवारीला पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे संपन्न हो...