Friday, August 31, 2018


महसूल दिन उत्साहात संपन्न

शासनाच्या विविध योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करुन
नागरिकांपर्यंत योजना पोहचवाव्यात
--- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  


नांदेड दि. 31 :-   महसूल विभाग हा महत्वाचा भाग असून सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करुन नागरिकांपर्यंत योजना पोहचवाव्यात. तसेच समन्वय ठेवून कामे करावीत, असेही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.
  विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील म्हणाले की, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोकांच्या कल्याणाकरिता प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात यावी. या महत्वपूर्ण योजना तळागाळापर्यंत पोहचाव्यात व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.  
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्यावतीने महसूल दिन डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आज उत्साहात संपन्न झाला. महसूल दिन कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे उपस्थित होते. मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
       
  यावेळी जिल्ह्यातील 27 सेवानिवृत्‍त अधिकारी, कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्‍या एकुण 12 गुणवंत पाल्‍यांना डिक्शनरी व प्रशिस्‍तीपत्र देऊन सन्‍मान करण्‍यात आला. तसेच जिल्‍हयातील एकूण 55 उत्‍कृष्‍ट अधिकारी कर्मचारी यांचा प्रशिस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक निवासी उपजिल्‍हाधिकारी संतोष वेणीकर यांनी  केले.
           सुत्रसंचलन नायब तहसिलदार मुगाजी काकडे स्‍वामी यांनी केले. कार्यक्रमास जिल्‍हयातील महसूल अधिकारी, कर्मचारी बहुसंख्‍येने उपस्थित होते. शेवटी तहसिलदार अरविंद नर्सीकर यांनी आभार मानले.
            याप्रसंगी महसूल दर्पण या त्रैमासिकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.  
****


वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 31 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे सप्टेंबर 2018 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक बुधवार 26 सप्टेंबर 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे गुरुवार 27 सप्टेंबर ते शनिवार 29 सप्टेंबर 2018 काळात जिल्हा व तालुकास्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी हे पथक या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात बुधवार 29 ऑगस्ट 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 12 सप्टेंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 3 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.         
00000

Thursday, August 30, 2018


लोकशाही दिन 3 सप्टेंबर रोजी

नांदेड दि. 30 :-  जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याचा पहिला सोमवार म्हणून लोकशाही दिन दिनांक 3 सप्टेंबर, 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे लोकशाही दिन आयोजित केलेला आहे.
या दिवशी महसूल, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन, सहकार, कृषी  विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाकडे लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड बचत भवन येथे हजर राहतील निवेदनाच्या नोंदणीला सुरुवात सकाळी 12-00 वा. पासून होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर / निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.  लोकशाही दिनामध्ये अर्ज स्वीकारण्याचे व न स्वीकारण्याचे निकष खालील प्रमाणे आहेत.
अर्ज स्विकृतीचे निकष
अर्ज न स्विकृतीचे निकष
अर्ज विहीत नमुन्यात असावा
(नमुना प्रपत्र 1 ते 1 ड ) 
न्यायप्रविष्ठ प्रकरणे
तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी
राजस्व / अपिल्स
अर्जदाराचे विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतिमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पाठविणे आवश्यक आहे.
सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी.
तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर 1 महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे अर्ज करता येईल.
विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

 या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी / अडचणी एकत्रितरित्या समजून घेवून त्या शक्य तितक्या लवकरात लवकर सोडण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे. अशा प्रकरणाची पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी , नांदेड यांनी कळविले आहे.
00000



 वनहक्क कायदा अंमलबजावणी कार्यशाळा
प्रलंबित वैयक्‍तीक, सामुहिक वनहक्‍काचे तसेच सामुहिक सुविधाचे दावे निकाली काढावेत
   --- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 30 :- पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्‍था आयुक्‍त यांच्या सूचनेनुसार वनमित्र मोहिम राबविण्‍यात येत असून जिल्ह्यातील प्रलंबित वैयक्‍तीक, सामुहिक वनहक्‍काचे तसेच सामुहिक सुविधाचे दावे निकाली काढण्‍यासाठी कार्यशाळा आयोजीत करण्‍यात आली असून ग्रामस्‍तरीय, उपविभागस्‍तरीय व जिल्‍हास्‍तरीय समितीच्‍या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी विशेष मोहिम राबवून प्रलंबित दावे तातडीने निकाली काढावीत असे जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आवाहन केले.
पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्‍था आयुक्‍त यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्‍हयातील किनवट, माहूर, हदगांव, हिमायतनगर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, अर्धापूर व मुदखेड तालुक्‍यात वनजमीन असलेल्‍या (401) गावातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्‍कांची मान्‍यता) अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारणा नियम 2012 अंतर्गत प्रलंबित दावे, अपिले व नाकारलेली दावे निकाली काढण्यासाठी वनमित्र मोहिम अंतर्गत जिल्‍हा व उपविभागस्‍तरावरील समिती सदस्‍य तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, प्रकल्‍प अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, विस्‍तार अधिकारी, सरपंच, ग्राम वनहक्‍क समितीचे अध्‍यक्ष, तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकारी यांना कायदयाची माहिती होण्‍यासाठी व वनहक्‍कांचे दावे जलद गतीने निकाली काढण्‍यासाठी कुसूम सभागृह नांदेड येथे दोन सत्रात कार्यशाळा आयोजीत करण्‍यात आली होती. या कार्यशाळेस मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी, सरपंच आणि समिती सदस्‍य उपस्थित होते. 
जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा वनहक्‍क समिती अरुण डोंगरे यांच्या हस्ते दिप प्रज्‍वलन करुन या कार्यशाळेचे उद्घाटन करण्‍यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणून उप वनसंरक्षक आशिष ठाकरे उपस्थित होते. प्रास्‍ताविकात जिल्‍हाधिकारी यांनी सदर कार्यशाळेचा प्रमुख उद्देश उपस्थितांना सांगितला.
उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी वनहक्‍काचे दावे निकाली काढणेसाठी वनविभागाचे पूर्ण सहकार्य मिळेल असे सांगितले.  व्दितीय सत्रात अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांनी वनहक्‍क दावे निकाली काढण्याची कार्यपध्‍दती सांगितली. दोन्‍हीही सत्रात उप वनसंरक्षक सेवानिवृत्‍त एस.आर.वाघ यशदा पुणे यांनी वनहक्‍क कायदयाची पार्श्‍वभुमी विषद करुन वनहक्‍कांचे दावे निकाली काढण्‍यासाठी पंचायत विभाग, महसूल विभाग, वनविभाग व आदिवासी विभाग या चार विभागाने समन्‍वयाने वनहक्‍काचे दावे निकाली काढण्यासाठी कार्यपध्‍दती सांगितली. त्‍यात प्रामुख्‍याने ग्रामस्‍तरीय समितीने परिपूर्ण दावे उपविभागस्‍तरीय समितीकडे सादर केल्‍यास उपविभाग व जिल्‍हास्‍तर समितीकडून कमी कालावधीत दावे निकाली काढल्‍या जातील. वनहक्‍क कायदा व नियमाची टप्‍पानिहाय सविस्‍तर माहिती सादरीकरणातून सादर केली आणि उपस्थितांच्‍या प्रश्‍नाचे निरसन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब तहसिलदार सौ. स्‍नेहलता स्‍वामी यांनी केले व उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) सौ. अनुराधा ढालकरी, यांनी आभार प्रदर्शन केले.    
****



Tuesday, August 28, 2018


धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणूक
प्रारूप मतदार यादी आज प्रसिध्‍द होणार
लेखी आक्षेप नोंदविण्याचे आवाहन  
नांदेड दि. 28 :- धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणुकीसाठी मा. उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रात मौ. माष्‍टी, मौ. पाटोदा थडी व मौ. शेळगाव थडी या तीन गावांचा नव्‍याने समावेश करण्‍यात आला आहे. या तीन गावांकरीता सुधारीत प्रारूप मतदार यादी 29 ऑगस्ट रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद निवडणूकीच्या अनुषंगाने प्रारूप शेतकरी मतदारसंघाची यादी 29 ऑगस्ट 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व संबंधीत कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या नोटीस बोर्डावर तीन गावाची यादी प्रसिध्‍द करण्‍यात येत असून त्‍याचा सुधारीत कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
तपशील
दिनांक
वेळ
स्‍थळ
प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करणे
29.08.2018
स. 11.00 वाजता      
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांचे सुचना फलकावर. 
प्रारुप मतदार यादीवर हरकती स्विकारणे 
29.08.2018 ते 7.09.2018
कार्यालयीन वेळेमध्‍ये (पुराव्‍यांसह)
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय,   सामान्‍य शाखा - 1 .
प्राप्‍त हरकतीवर सुनावणी
11.09.2018
स.11.00  
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय
आलेल्‍या हरकतीवर निर्णय देणे
17.09.2018
दु. 4.00 वा.             
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय
अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करणे
22.09.2018
स. 11.00 वा.
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था नांदेड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांचे सुचना फलकावर. 
            या मतदार यादीवर आक्षेप असल्‍यास मतदार यादी प्रसिध्‍दी कार्यक्रमात नमुद दिनांकानुसार जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी (कृउबास) यांचे कार्यालय सामान्‍य    शाखा-1 येथे ‘’लेखी स्‍वरूपात पुराव्‍यासह’’ कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) नोंदविता येतील. तसेच प्रसिध्‍दी कार्यक्रमातील आक्षेप कालावधी संपल्‍यानंतर प्राप्‍त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घेण्‍यात यावी. तरी आक्षेप विहीत कालावधीमध्‍ये ‘’लेखी स्‍वरूपात पुराव्‍यासह’’ देण्‍याचे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांचे आदेशान्‍वये दिनांक 31 डिसेंबर 2017 अखेर मुदत संपणा-या नांदेड जिल्‍ह्यातील धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया सुरू करण्‍यात आली आहे. त्‍यानुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालय बचत भवन नांदेड येथे जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली व संबंधीत कृउबास च्‍या बाजार क्षेत्रातील विविध राजकीय पदाधिकारी यांचे उपस्थितीत दि.19 मे2018 रोजी आरक्षण जाहीर करण्‍यात आले, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


रोजगार मेळाव्यात 71
उमेदवाराची प्राथमिक निवड
नांदेड दि. 28 :- जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेडमार्फत आज महात्मा फूले मंगल कार्यालय, फुले मार्केट, शासकीय आयटीआयजवळ नांदेड येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 71 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.  
मेळाव्यास अध्यक्षस्थानी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान हे होते. तर प्रमूख पाहूणे म्हणून श्री हुजूर साहेब  आयटीआयचे प्राचार्य श्री गुरुबच्चणसिंह  होते.
सहायक संचालक श्री. सकवान म्हणाले, सध्या शासकीय नोकरीचे प्रमाण कमी झाल्यामुळे खाजगी क्षेत्रात नोकरीस मोठया  प्रमाणात वाव आहे. बेरोजगारांनी आलेल्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. सध्याच्या स्पर्धेत टिकून राहिले पाहिजे, बेरोजगार उमेदवारानी स्वत:चा उद्योग सुरु करावा. सध्या खुप बदल झाला आहे. काळाप्रमाणे आपण स्वत: बदल करुन घेतला पाहिजे. काम केल्याशिवाय आपणाला कोणीही पैसा देणार नाही हे लक्षात ठेवावे.
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना खाजगी कंपनीव्दारे भविष्याला ळण देणारा ठरणार आहे. आय.टी.आय पास असलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यास ओळखले पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वत:चा विकास करून घेतला पाहिजे, असे आवाहन श्री. गुरुबच्चणसिंह यांनी केले.
त्याचप्रमाणे उपस्थित कंपनीचे अधिकारी यांनी आप-आपल्या कंपनीतील भरावयाच्या पदासंबधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. ट्रेनी ऑपरेटर, एटीएम ऑपरेटर, सीटी बॉयकर, ऑफिसर रिपोटर्स, ऑफिसर कॉल सेंटर, ड्रॉयव्हर, फार्मासिस्ट,फिल्ड ऑफिसर या पदाची भरती करण्यात आली. सुत्रसंचालन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी  भूजंग रिठे यांनी केले.
000000


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब
मंडळ निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
आक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन  
नांदेड दि. 28 :- नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे. या मतदार यादीवर आक्षेप/ दुरुस्‍ती / नाव समाविष्‍ट इत्‍यादी बाबत आक्षेप असल्‍यास मतदारांनी 28 ऑगस्‍ट ते 26 सप्‍टेंबर 2018 या कालावधीत विहीत नमुन्‍यातील फॉर्म–2 भरुन संबंधीत तहसिल कार्यालयात दाखल करावेत. तसेच www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. विहीत मुदतीनंतर प्राप्‍त आक्षेप अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.  
प्राप्‍त दावे व हरकती / आक्षेप सक्षम अधिकारी जिल्‍हाधिकारी, नांदेड यांच्‍या कार्यालयात 4 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत निकाली काढण्‍यात येणार आहेत. जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी दिलेल्‍या निकालाविरुध्‍द अपिल करण्‍यासाठी सक्षम अधिकारी विभागीय आयुक्‍त औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचेकडे 5 ते 19 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत व्दितीय अपील दाखल करता येईल. विभागीय आयुक्‍त औरंगाबाद यांचेकडे 20 ते दिनांक 26 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत प्राप्‍त अपील निकाली काढण्‍यात येतील. त्‍यानंतर 3 नोव्‍हेंबर 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द होईल. ज्‍या मतदारांना प्रारुप मतदार यादीवर आक्षेप असल्यास मुदतीत विहित नमुन्‍यातील फॉर्म भरुन त्‍यांचे आक्षेप् लेखी स्‍वरुपात संबंधीत तहसिल कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी, नांदेड यांच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.                                    
प्रारुप मतदार यादी मतदार क्षेत्रातील सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये व गुरुव्‍दारा तख्‍त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्ड नांदेडच्‍या सुचना फलकावर प्रारुप मतदार यादी व अधिसूचना प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. तसेच  संबंधित जिल्‍ह्यातील तहसिल कार्यालयांच्‍या सुचना फलकांवर त्‍या-त्‍या तालुक्‍याची प्रारुप मतदार यादी व अधिसूचना डकवून प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे.  
नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी अधिसूचना दिनांक 27 ऑगस्‍ट 2018 अन्‍वये मतदार क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे संपुर्ण जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्‍कालीन हैद्राबाद निजाम संस्‍थानाचा मराठवाड्यातील भाग) येथील महाराष्‍ट्र विधानसभेसाठी दि. 1 जुलै 2018 या अर्हता दिनांकास अस्तित्‍वात असलेली विधानसभा मतदार यादीतील समाविष्‍ट शिख धर्मीय मतदारांची मतदार नोंदणी कार्यक्रम दिनांक 20 जुलै 2018 ते दिनांक 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत फॉर्म-1 (FORM-I) नुसार तयार केलेली
ही प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, नायब तहसिलदार डी. एन. पोटे, नायब तहसिलदार श्रीमती संजीवनी मुपडे यांनी ही मतदार यादी वेळेत प्रसिध्‍द करण्‍यासाठी परिश्रम घेतले.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...