Sunday, December 31, 2017

कर्जमाफी योजनेचा राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना लाभ
लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांनी
लोकसेवक म्हणून काम करावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदेड, दि. 31 :- तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध तहसील कार्यालयाशी या-ना-त्या कारणाने येत असतो, तेव्हा कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या दिसण्यावर ते कार्यालय चांगले की वाईट हे ठरत नसून ते कार्यालय लोकांना कशा प्रकारे सेवा देते, न्याय देते यावर ठरते. हे सरकार गरिबांसाठी काम करणारे आहे, तेव्हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील सर्वच घटकांचे जनतेचे सेवक म्हणूनच काम करावे. राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा 50 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कंधार तालुका तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज येथे झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार सर्वश्री प्रतापराव पाटील चिखलीकर, डॉ. तुषार राठोड, विनायकराव जाधव-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, माजी राज्यमंत्री डी. बी. पाटील, कंधारचे नगराध्यक्ष जमरोद्दीन, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना आदिंची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणाले की, सरकारने जनतेसाठी सेवा हक्क हमी विधेयक मंजूर केले. या माध्यमातून जनतेला सरकारकडून आणि शासनाकडून निश्चितच चांगली सेवा मिळण्याचा हक्क मिळाला आहे. पंतप्रधानांपासून आपण सर्वांनीच स्वत:ला लोकसेवक मानले आहे. आम्ही सर्वच जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहोत. विहित मुदतीत जनतेची कामे न झाल्यास संबंधीत अधिकाऱ्यास पहिल्या तक्रारीवर पाचशे रुपये, दुसऱ्या तक्रारीवर पाच हजार तर ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबद्दल काम न करण्याबाबत तक्रार झाल्यास त्यास निलंबितही करण्यात येईल. त्यामुळे आपआपल्या जबाबदाऱ्या ओळखून आपल्या कामाचे उत्तरदायित्व स्विकारणे आवश्यक आहे. त्यासाठी कामच केले पाहिजे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रत्येक शासकीय कार्यालयात सेवा हमी कायद्याची माहिती लावण्यात यावी. आतापर्यंत महाराजस्व अभियान, मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या माध्यमातून जवळपास 14 लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. जवळपास 400 सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. जनतेला त्यांच्या कामांसाठी शासकीय कार्यालयात जावेच लागू नये यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच निर्माण करीत आहोत. त्यापैकी राज्यातील सर्व पोलीस स्टेशन एकमेकांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेविषयी माहिती देतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, या शासनाने आत्तापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यातील 94 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, शेवटच्या पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरुच राहील. एकही गरजू व पात्र शेतकरी यातून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांच्या अनंत अडचणी आहेत, मात्र या अडचणीतून शेतकऱ्याला कायमस्वरुपी बाहेर काढण्यासाठी हे शासन शाश्वत दृष्टीने उपाययोजना करीत आहे. त्या दिशेनेच या शासनाचे काम सुरु आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 11 हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत. नांदेड जिल्ह्यातील जवळपास 53 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहेत. राज्याचा शेतीचा अर्थसंकल्प 63 हजार कोटींचा आहे. सध्या बोंडअळीच्या संकटातून शेतकरी बांधव जात आहेत मात्र त्यांनी स्वत:ला पोरके समजू नये. शासनाने या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्याला प्रती हेक्टरी सहा हजार 800 रुपये पीक विम्यातून आठ हजार तर बियाणे कंपन्याकडून 16 हजार रुपये देण्याचे नियोजन केले आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कंधार तालुक्यातील हाजीसया दर्गाह व मौ. बोरी बु. येथील महादेव मंदिराच्‍या विकासासाठी पाच कोटीचा निधी तातडीने मंजूर करण्यात येईल, किवळा साठवन तलाव आणि लिंबोटी धरणाचे अपूर्ण राहिलेले काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहासाठी निधी मंजूर करु, पाणी फेरनियोजनाच्‍या आराखडयाचा प्रस्‍ताव सादर केल्‍यानंतर त्यालाही मंजुरी देण्‍यात येईल, अशीही घोषणा त्यांनी यावेळी केली.  
यावेळी राज्‍याचे पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपल्या मनोगतात चार हजार 702 गावातील पाणीपुरवठ्यासंदर्भात अपूर्ण असलेल्‍या योजना मुख्‍यमंत्री पेयजल अंतर्गत दोन हजार 500 कोटी रुपयाचा निधी मंजूर करुन पूर्ण करण्‍यास सुरुवात झाली आहे. त्‍याचप्रमाणे मराठवाडयाचा वॉटरग्रीड माध्‍यमातून पाण्‍याचा प्रश्‍न मिटणार आहे. संपूर्ण राज्‍याने प्रत्येक गाव शहर हागणदारीमुक्‍त करण्‍याचा निर्धार केला आहे. आतापर्यंत 15 जिल्हे, 204 तालुके , 22 हजार गावे हागणदारीमुक्त झाले आहेत. 32 हजार गावांमधून 52 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत, असे सांगितले.  
यावेळी निवृत्त सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी, कार्यकारी अभियंता विवेक बडे, जयकर थोरात, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जितेंद्र भेंडे, उपअधीक्षक सुरेश वेताळ, उपअभियंता अमित उबाळे, सय्यद इक्बाल, शाखा अभियंता बी. एन. पवार, कंधारच्या तहसीलदार श्रीमती अरुणा संगेवार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, यांच्‍यासह महसूल विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी व महिला, शेतकरी उपस्थित  होते.
या  कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन विक्रम कदम आणि गंगाप्रसाद यन्‍नावार यांनी केले तर उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी आभार मानले.
000000
गुरु गोविंद सिंघ म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम
                                   --- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
§  गुरुद्वाराचे 61 कोटीचे कर्ज माफ करण्यात येईल
§  गुरुद्वाराच्या जागेवरील आरक्षण रद्द केले जाईल
§  गुरुद्वाराच्या परिसरात मद्यविक्रीचे दुकाने बंद करण्यात येतील .
नांदेड, दि. 31:- गुरु गोविंद सिंघाचे संपूर्ण जीवन हे संघर्षमय असून आपल्या समाजाचे गुलामीपासून व संस्कृतीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी आपल्यासह संपूर्ण परिवाराचे बलिदान करुन एक लढवय्या पंथाची स्थापना केली. त्यामुळे गुरु गोविंद सिंघ म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  
नांदेड येथील गुरुद्वाऱ्यामध्ये श्री. गुरु गोविंद सिंघ यांच्या 350 व्या प्रकाशपर्व कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार सर्वश्री सरदार तारा सिंघ , हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, सचखंड गुरुद्वाराचे संतबाबा कुलविंतसिंगजी, गुरुद्वारा लंगरसाहिबचे संतबाबा बलवंसिंगजी, नांदेड परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद , जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संतुक हबर्डे उपाध्यक्ष स. भुपिंदर सिंघ मिनहास, सचिव स. भागिंदर सिंघ घडीसाज, चेअरमन-शिक्षण समिती स. अमरीक सिंघ वासरीकर, चेअरमन-स्टाफ कमेटी स. सरजीत सिंघ गिल, चेअरम-ईस्टेट कमेटी स. राजिंदर सिंघ पुजारी, सदस्य स. शेर सिंघ फौजी, स. गुरमित सिंघ महाजन, स. दलजीत सिंघ हैद्राबाद, स. गुरदीप सिंघ भाटिया, स. अवतार सिंघ मक्कड, स. गुरिन्दर सिंघ बाबा, स. इकबाल सिंघ सबलोक, स. रघुजीत सिंघ विर्क, स. सुरिन्दर सिंघ, स. परमजोत सिंघ चाहेल, स. रणजीत सिंघ कामठेकर, उपजिल्हाधिकारी तथा चेअरम व्यवस्थापन समिती श्रीमती अनुराधा ढालकरी, सदस्य व्यवस्थापन समिती स. गुलाब सिंघ कंधारवाले, स. नौनिहाल सिंघ जागीरदार, स. रविंदर सिंघ बुंगई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नांदेड येथील गुरुद्वारा येवून गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतल्यानंतर नवीन उर्जा मिळते. गुरु गोविंद सिंघ यांनी या पंथास बलिदानाचे विशेष परंपरा प्राप्त करुन दिली असून त्यांनी स्वाभिमानी समाजाची निर्मिती केली. भक्ती व शक्तीच्या रुपाने गुरु गोविद सिंघ यांनी भारताला नवीन मार्ग दाखविल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.   
राज्य शासनाने गुरुत्तागद्दीच्या वेळेस गुरुद्वारा बोर्डास कर्जस्वरुपात दिलेले 61 कोटी रुपयांचा निधी माफ करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले. तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या निवासाकरिताच्या भुखंडावर असलेले आरक्षण रद्द करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.   
गुरु गोविंद सिंघ यांचा जयंती दिन म्हणजे 22 डिसेंबर रोजी राज्यात राज्य शासनामार्फत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय घेण्यात येईल, असे मख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगून गुरुद्वारा परिसरातील सर्व प्रकारची मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याची कारवाई लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले .   
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. त्यावेळी पंचप्यारे साहिबांच्यावतीने गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी श्री. फडणवीस यांचा पारंपरिक पध्दतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा बोर्डामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव विशेषांकाचे विमोचन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.    
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार तारा सिंघ यांनी केले. तर सरदार सरजीतसिंघ गिल यांनी आभार मानले.     
****


Saturday, December 30, 2017

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
                     नांदेड विमानतळावर स्वागत        
नांदेड, दि. 31 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथील गुरु गोबिंद सिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर श्रीमती शिलाताई भवरे, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष तथा आमदार सर्वश्री सरदार तारा सिंघ, प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. तुषार राठोड, सुभाष साबणे, नागेश पाटील आष्टीकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, विभागीय अप्पर आयुक्त विजयकुमार फड, नांदेड मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.    
तसेच याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक डी. पी. सिंघ, सरदार ठाणसींघ बुंगई, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.

0000000



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा कार्यक्रम  
नांदेड दि. 30 :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार 31 डिसेंबर 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 31 डिसेंबर 2017 रोजी छ. शि. म. आं. विमानतळ सांताक्रुझ मुंबई येथुन विमानाने सकाळी 9.55 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10 वा. विमानतळ येथुन मोटारीने कंधार जि. नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. तहसिल कार्यालय कंधार येथे आगमन. सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय व उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय कंधारच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12 वा. जिल्हा परिषद शाळा कंधार येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1.35 वा. मोटारीने गुरुद्वारा सचखंड साहिब परिक्रमा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.40 वा. गुरुद्वारा सचखंड साहिब परिक्रमा नांदेड येथे आगमन. दुपारी 1.45 वा. श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज के 350 वे प्रकाश पर्व को समर्पित, विशेष गुरमत समागम कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. गुरुद्वारा सचखंड साहिब परिक्रमा येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.50 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

000000
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांचा दौरा
नांदेड दि. 30 :- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
रविवार 31 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह लातूर येथुन कंधारकडे प्रयाण. सकाळी 11 वा. कंधार येथे आगमन व मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत तहसिल कार्यालय कंधार व उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय कंधारच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जिल्हा परिषद हायस्कुल मैदान कंधार. दुपारी 1 वा. कंधार येथुन मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील.  

000000
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
साजरा करण्याचे आवाहन
नांदेड दि. 30 :-  मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 1 ते 15 जानेवारी 2018 या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" साजरा करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांनी 1 ते 15 जानेवारी 2018 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करावा. मराठी भाषा विभागाचे शासन परिपत्रक 23 नोव्हेंबर 2017 मध्ये नमूद केल्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश संबंधीत विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत. 

00000

Thursday, December 28, 2017

लोकशाही दिनाचे 1 जानेवारीला आयोजन
नांदेड, दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 1 जानेवारी 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
0000
वंचित घटकांना सोई-सवलती
देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 28 :- वंचित घटकांना विविध प्रकारच्‍या सोई-सवलती देऊन त्‍यांचे जीवनमान उंचवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. "वंचित घटकांना दिलासा" याबाबत करावयाच्‍या उपाययोजनेची बैठक जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात आज संपन्न झाली.  
यावेळी अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, जिल्‍हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, सहाय्यक जिल्‍हा पुरवठा अधिकारी संतोषी देवकुळे, सहाय्यक प्रकल्‍प अधिकारी, सहाय्यक नियोजन अधिकारी, महिला  बाल विकास अधिकारी, डीईओ, महिला आर्थिक विकास महामंडळ, समाज कल्‍याण अधिकारी, मॅनेजर, एनडब्‍ल्‍युसीएमसी आदी विभागाचे प्रमुख उपस्थित होते.  
वंचित घटाकांसाठी नांदेड तालुक्यातील सांगवी बु. व लोहा येथील दोन गावांचे सर्वेक्षण करुन वंचितांची यादी तयार करण्‍यात आली आहे. त्यानुसार वंचित घटकातील मुलांना शिक्षणासाठी अंगणवाडीत पाठविणे, आरोग्‍य सुविधा, रोजगार विषयक प्रशिक्षण, ज्‍या कुटुंबाना घर नाही त्‍यांना घरकुल देणे, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, अन्नधान्य आदी सुविधांबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना यावेळी सुचना देण्यात आल्या. जिल्‍हा पुरवठा अधिकारी यांनी अन्‍नधान्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. बाल विकास प्रकल्‍प अधिकारी यांना अंगणवाडीसाठी प्रस्‍ताव सादर करण्याबाबत सुचना देण्यात आली.  

000000
महिला मेळाव्याचे बुधवारी आयोजन ;
बचतगटातील उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री 
नांदेड दि. 28 :- सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन बुधवार 3 जानेवारी 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे दुपारी 12.30 ते 3.30 यावेळेत करण्यात आले आहे, असे माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी कळविले आहे.
 बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावे तसेच बाजारपेठेतील आर्थिक व्यवहाराची माहिती मिळावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजना, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 181 गावात 2 हजार 246 महिला बचतगटाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये 25 हजार 935 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. स्थापन बचत गटातील महिलांना विविध पायाभुत प्रशिक्षण देऊन बँकेमार्फत कर्ज मिळवून देण्यात येते. या मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून महिला शेतीवर व बिगर शेतीवर उद्योग करीत आहेत. या कार्यक्रमास ग्रामीण व नागरी भागातून महिला उपस्थित राहणार आहेत, असे माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000
तुर, कापुस, हरभरा
पिकाचा कृषि संदेश
नांदेड दि. 28 :- तूर, कापूस, हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत नांदेड कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या पाच  तालुक्यात काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश दिला आहे.
डिसेंबरमध्ये कपाशीची वेचणी करुन समुळ उच्चाटन करावे. काढणी नंतर पऱ्हाटीची साठवण शेताच्या शेजारी करु नये. शेतातील पिकांचे अवशेष वेचुन जाळुन टाकावेत. तूर- शेंग माशी आणि पिसारी पतंगच्या नियंत्रणासाठी क्युनॉलफॉस 25 इसी 30 मिली किंवा क्लोरॅनट्रनिलप्रोल 20 एस.सी. 3 मिली प्रती 10 लिटर पाणी फवारणी करावी. हरभरा- घाटेअळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रनिलप्रोल 18.5 एस. सी. 2.5 मिली प्रती 10 लिटर पाणी, फवारणी करावी किंवा एनएसई 5 टक्के फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
000000
केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड दि. 28 :- मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील केळी पिक संरक्षणासाठी कृषि संदेश पुढील प्रमाणे देण्यात आला आहे. केळी पिकांवर कार्बेन्डॅझिमची दुसरी फवारणी केल्यानंतर पानावरील पिवळ्या ठिपक्यांचा रंग तपकिरी होतो. नंतर प्रोपीकोनेझॉल या किटकनाशकाची 0.1 टक्के 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात 1 मिली स्टीकर टाकून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000

Wednesday, December 27, 2017

वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 27 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे जानेवारी 2018 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 9 जानेवारी 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 10 ते शुक्रवार 12 जानेवारी 2018 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे पथक या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.

0000000
आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची
माहिती सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 27 :- मासिक वेतन डिसेंबर 2017 चे देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आवाहन असे सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
माहिती बाबतचे डिसेंबर 2017 अखेरचे इ-आर-1 त्रैमासिक विवरणपत्र बुधवार 31 जानेवारी 2018 पर्यंत भरावयाची मुदत आहे. www.mahaswayam.gov.in ऑनलाईन इ.आर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापुर्वीच कळविण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी व फोन नंबर, पत्ता टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही आवाहन सहायक संचालक यांनी केले आहे.

000000

Tuesday, December 26, 2017

सामाजिक न्याय राज्यमंत्री
दिलीप कांबळे यांचा दौरा
नांदेड, दि. 26 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 27 डिसेंबर 2017 रोजी मुंबई विमानतळ येथुन टु जेट एअर लाईन्सच्या विमानाने दुपारी 2.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.30  वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने अर्धापूर-कळमनुरी मार्गे हिंगोलीकडे प्रयाण करतील. जवळा बुद्रुक ता. सेनगाव जि. हिंगोली येथून वाहनाने रात्री 11.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
गुरुवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.30   वा. नांदेड विमानतळ येथून टु जेट एअर लाईन्सच्या विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

000000
होमगार्डच्या 268 पदांसाठी
4 जानेवारी पासून नाव नोंदणी
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड व देगलूर पथकातील 87 पुरुष व 181 महिला होमगार्ड पदांच्या एकुण 268 रिक्त जागांसाठी 4 ते 6 जानेवारी या कालावधीत पोलीस मुख्यालय वजिराबाद नांदेड येथे नाव नोंदणी मोफत करण्यात येणार आहे. जास्तीतजास्त नागरीकांनी या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.  
नांदेड पथकात- 23 पुरुष व 56 महिला, बिलोली- 12 पुरुष व 27 महिला, हदगाव- 28 पुरुष 25 महिला, मुखेड- 7 पुरुष 11 महिला, देगलूर-17 पुरुष 7 महिला, कंधार- 23 महिला, किनवट-21 महिला, भोकर- 11 महिला होमगार्डच्या रिक्त पदांसाठी ही नाव नोंदणी करण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी वयोमर्यादा 20 ते 50 वर्षे असून किमान दहावी उत्तीर्ण असावा. पुरुष उमेदवारासांठी उंची 162 सें.मी किमान, छाती न फुगवता 76 सेंमी, आणि फुगवून 81 सेमी असवी. 1 हजार 600 मीटर धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणी अनिवार्य आहे.
  महिला उमेदवारांसाठी उंची किमान 150 सेमी असावी. आठशे मीटर धावणे व गोळाफेक ही मैदानी चाचणी घेण्यात येईल. उमेदवारास या चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रकारात कमीतकमी 40 टक्के गुण आवश्यक राहतील. या व्यतीरिक्त आटीआय प्रमाणपत्र, खेळाचे कमीत कमी जिल्हास्तरीय प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, एनसीसीचे बी. किंवा सी प्रमाणपत्र नागरी स्वरक्षण सेवेत असल्याचे प्रमाणपत्र जडवाहन चालविण्याचा परवाना या प्रमाणपत्रधारकांना तांत्रीक अर्हता गुण दिल्या जातील.
पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे 4 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेपासून नाव नोंदणी करण्यात येईल. सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत कागदपत्रांची तपासणी व शारिरीक चाचणी घेण्यात येईल. नाव नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असल्याचे मुळ प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे तीन कलर फोटो, रहिवाशी असल्याचा सक्षम पुरावा, इतर शैक्षणिक कागदपत्रे झेरॉक्स प्रतीसह सोबत आणावीत. शारिरीक चाचणीत पात्र ठरलेल्या पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी 5 जानेवारी रोजी सकाळी 6 वा. शहीद भगतसिंघ चौक असर्जन नाका विष्णुपुरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल. शारिरीक चाचणीत पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची मैदानी चाचणी 6 जोनवारी रोजी सकाळी 6 वा. शहीद भगतसिंघ चौक असर्जननाका विष्णुपुरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल.
होमगार्ड ही निष्काम सेवा असलेले संघटन आहे. होमगार्ड स्वयंसेवकांना कुठलाही नियमीत पगार किंवा मानधन दिल्या जात नाही. कर्तव्य बजावल्यानंतरच कर्तव्य भत्ता दिला जातो. नाव नोंदणीसाठी आलेल्या कोणत्याही उमेदवाराला कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. शारिरीक किंवा मैदानी चाचणीच्यावेळी कोणताही अपघात घडल्यास किंवा शारिरीक दुखापत घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही संबंधीत उमेदवारांची राहील. या नाव नोंदणी प्रक्रियेच्या अधीक माहितीसाठी होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्र भाग्यनगर जवळ नांदेड येथे प्रत्यक्ष किंवा 02462-254261 या क्रमांकावर संपर्क साधावा.
काही तांत्रिक अथवा अपरिहार्य कारणास्तव नाव नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक यांना राहील. नाव नोंदणीसाठी पैशाची मागणी केल्यास लाचलूचपत प्रतिबंधक शाखा नांदेड यांचेकडे 02462-253312 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा‍ किंवा 02462-232961 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.

000000
यशवंतराव चव्हाण वा:य पुरस्कारसाठी
प्रवेशिका पाठवण्‍याचे आवाहन
नांदेड, दि. 26 - मराठी भाषेतील उत्‍कृष्‍ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2017 करिता राज्‍य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठीच्‍या प्रवेशिका जिल्‍हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या कार्यालयात 1 ते 31 जानेवारी 2018 पर्यंत सादर कराव्‍यात, असे आवाहन राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या सचिव मिनाक्षी पाटील यांनी केले आहे.  
दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित झालेली  प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.  या स्‍पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी  रोड, प्रभादेवी, मुंबई - 400025 यांच्या कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया (सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. 
लेखक/ प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2017 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 31 जानेवारी 2018 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य 1 ते 31 जानेवारी 2018 पर्यंत पाठवावे. मंडळाकडे प्रवेशिक व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर / पाकीटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वामय पुरस्कार 2017 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. विहीत कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत, असेही मंडळाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

00000000

Sunday, December 24, 2017

राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा
नांदेड,दि.24 :- येथील जिल्‍हा पुरवठा कार्यालय व नांदेड तहसिल कार्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय ग्राहक दिन तहसिल कार्यालयात उत्साहात आज साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी ग्राहक पंचायतचे जिल्‍हाध्‍यक्ष पुरुषोत्तम अमिलकंठवार, श्रीमती जोशी, श्रीमती दयाळ, डॉ. भोसकर, बी. आर. लांडगे, पुरुषोत्तम जकाते, लक्ष्‍मीकांत मुळे, श्री. पांचाळ, काशीनाथ येजगे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी  अ.भा.ग्राहक पंचायत विभागाचे विभागीय संघटक आर. एस. कमटलवार यांनी ग्राहकांचे प्रबोधन केले. प्रांत उपाक्ष बा. दा. जोशी, डॉ. बालाजी कोमपलवार, विभागीय संघटक आर. एस. कमटलीवार यांनी मनोगत व्यक्त केले. अन्‍न व औषधी प्रशासन, प्रा‍देशिक परीवहन अधिकारी, वजने व मापे विभाग, निवडणूक, पुरवठा विभाग आणि गॅस व पेट्रोलपंप आदी विभागाचे स्टॉल्सचे उद्घाटन ग्राहक कल्‍याण सल्‍लागार समिती व राज्‍य अन्‍न आयोगाचे सदस्य संपत झळके यांचे हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक तहसिलदार किरण आंबेकर यांनी केली. सुत्रसंचालन श्रीमती एस. के. शाहाणे केले तर आभार नायब तहसिलदार विजय चव्‍हाण यांनी मानले. सुरुवातीला स्‍वामी विवेकानंद व बिंदू माधव जोशी यांचे प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्‍वलन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती एम. डी. वागीकर, लाठकर प्रेमानंद, सावते रामेश्‍वर, अंकुश हिवाळे, रविंद्र दोंतेवार आदींने केले. यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार व ग्राहक बहुसंख्‍येने उपस्थित होते. 
000000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...