पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद नियमानुसार
समाज कल्याण सहायक आयुक्त यांचा खुलासा
नांदेड, दि. 9 एप्रिल :- अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद आहे. सदरची योजना ही पिडीत नागरिकांसाठी कल्याणकारी योजना असल्याने कोणतीही व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. तसेच प्रसार माध्यमातुन अशा प्रकारच्या पुराव्याची शहानिशा न करता प्रशासनाविरुद्ध खोटी व असत्य माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
शासन निर्णय 23 डिसेंबर 2016 नुसार अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास 1.50 कोटी रुपये तरतुद प्राप्त झाली आहे. एकुण 275 पिडीतांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अद्याप एकाही पिडीताची तक्रार समाज कल्याण कार्यालयास आली नाही.
गुन्हा क्र 105/2023 अॅट्रासिटी अंतर्गत पिडीत फिर्यादी जयराज केरबाजी गायकवाड यांना नियमानुसार अर्थसहाय्य अदा करण्यात आले आहे. परंतु कॉ. गंगाधर गायकवाड यांनी एफआयआरमध्ये नमुद सर्व नावाच्या व्यक्तींना जे अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हयांचे पिडीत नाहीत. सुभाषचंद्र गजभारे, ज्ञानेन्दर खडसे, विश्वजीत गजभारे, गोपीप्रसाद गायकवाड, पंढरी बुरुडे यांना देखील अर्थसहाय्य देण्यात यावा, असे निवेदन समाज कल्याण कार्यालयास सादर करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण धरुन खोटी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती, जे नियमबाहय आहे.
गंगाधर गणपती खुणे यांना अर्थसहाय्य देण्यात आले नाही अशी देखील वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडुन पीएफएमएसद्वारे (ऑनलाईन) दोनवेळेस अर्थसहाय्य त्यांच्या खाती जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. तिसऱ्यांदा त्यांच्या बँकेत जाऊन शहानिशा केल्यानंतर असे निदर्शनास आले गंगाधर गणपती खुणे यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर केले खाते क्रमांक जुने व बंद खाते होते. त्यामुळे त्यांचे खाती अर्थसहाय्य जमा झाले नाही. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडून दुसऱ्या बँकेचे खाते क्रमांक घेऊन 30 डिसेंबर 2024 रोजी 75 हजार रुपये जमा करण्यात आले आहे.
गुन्हा क्र 136/2024 मधील पिडीत लता गंगाधर गायकवाड, सुदरबाई बबन वाहुळकर, फकीरा राजाराम गायकवाड, मालनबाई साहेबराव गजभारे, अनिल रामा गायकवाड यांना अर्थसहाय्य मिळाले नाही अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरहु गुन्हा क्र 136/2024 मधील पिडीतांचे दस्ताऐवज अपुर्ण असल्याने त्यांना अर्थसहाय्य अदा करता आले नाही. याबाबत संबंधितास तोंडी तसेच या कार्यालयाचे पत्र क्र. 4520 दि. 31 डिसेंबर 2024 अन्वये कॉ. गंगाधर गायकवाड यांना दस्ताऐवज (जातीचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधारकार्ड) सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. तरी त्यांनी वेळेत दस्ताऐवज सादर केले नव्हते, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी सांगितले आहे.
000
No comments:
Post a Comment