Thursday, March 5, 2020


कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड दि. 5 :- कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून या आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी. हा आजार सहज टाळता येण्यासारखा असून कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
हा आजार संसर्गजन्य असून चीनमधील हुबेई या प्रातांतून या आजाराची सुरुवात होऊन तो 72 देशात पसरला आहे. कोरोना या आजाराची लक्षणे सर्दी, खोकला, नाक गळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिसार, निमोनिया ही असून शिंकणे, खोकल्या वाटे हावेतून या आजाराच्या विषाणुंचा प्रसार होतो.
आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय आजार असलेल्या व्यक्तींशी लोकांनी निकटचा सहवास टाळावा. सर्दी, खोकला झाला असल्यास तोंडावर रुमाल ठेऊन खोकलावे अथवा शिंकावे. हाताची नियमित स्वच्छता ठेवावी. न शिजलेले अथवा अपुरे शिजलेले मांस खाऊ नये. फळे व भाज्या न धुता खाऊ नये. जंगली अथवा पाळीव प्राणी यांच्याशी निकटचा सहवास टाळावा. आवश्यक नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. करोना बाधित रुग्णांशी संपर्क आला असल्यास ताबडतोब तपासणी करुन घ्यावी. सार्वजनिक उत्सव, मेळावे, मिरवणुकीत नागरिकांनी सहभागी होऊ नये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे, हस्तांदोलन टाळावे, खोकलतांना अथवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल टिश्यु पेपरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत मुख्य सचिवांकडून आढावा
जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव अजोय महेता यांनी आज मुंबई येथुन सर्व विभागीय आयुक्त्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. कोरोना संदर्भात नागरिकांनी आवश्यक ती घ्यावयाची खबरदारी व त्यासंदर्भात करावयाची कार्यवाही आणि उपाययोजनांबाबतचा आढावा घेण्यात आला. 
सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता चीनसह 12 देशातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांचा 14 दिवसांपर्यंत पाठपुरावा करण्यात येतो. त्यातील एखाद्याला सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल करुन नमूने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले जातात. त्यानंतर नमुना निगेटीव्ह आल्यास त्या प्रवाशाला डिस्चार्ज दिला जातो, असे त्यांनी सांगितले.
राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथील विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी होत असून आवश्कता असल्यास अधिकचे मनुष्यबळ तेथे पुरविण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी महानगरपालिका व संबंधीत विभागांना दिले.  नागरिकांनी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, विशिष्ट अंतरावरुनच इतरांशी संवाद साधावा, खोकतांना अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. अशा सूचना मोठ्या प्रमाणावर प्रसारित कराव्यात, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण न पसरता खबरदारी घेण्यासाठी या सूचना उपयुक्त ठरतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 जिल्हा रुग्णालयांमध्ये विलगीकरणासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले असून त्या ठिकाणी पुरेशा साधन सामग्री उपलब्ध असल्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. ज्या जिल्ह्यांमध्ये बंदरे आहेत तेथे परदेशातून येणाऱ्या जहाजांवरील प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.
राज्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, बस, रेल्वे स्थानके, आठवडी बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याबाबत व कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी दक्ष राहण्याचे श्री.मेहता यांनी सांगितले. सामुहिक समारंभ, जत्रा, यात्रा यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये, असे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात यावे, अशी सूचना मुख्य सचिव यांनी केली. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, विविध धर्माचे प्रमुख प्रतिनिधी इत्यादींचे सहकार्य घेण्याचे सूचित केले.
मंत्रालयात यावेळी झालेल्या आढावा बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे आदी उपस्थित होते.
 नांदेड येथून या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बीसेन यांची उपस्थिती होती.  
कोरोना आजाराचे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी नांदेड जिल्ह्यात दोन संशीयत रुग्ण सापडले असून त्यापैकी एक चीन या देशातून नांदेड येथे आला आहे. त्यांच्यावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र कक्षात उपचार करण्यात आला. एनआयव्ही पुणे यांना पाठविलेले दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सोमवार 2 मार्च रोजी रुग्णालयातून त्यांना डिसचार्ज करण्यात आले. दुसरा रुग्ण बहरीन देशातून आला असून 2 मार्च रोजी त्यांना दाखल केले असून सध्या त्यांच्यावर स्वतंत्र कक्षात उपचार चालू आहेत. त्याचा प्रथम रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. द्वितीय रिपोर्ट प्रतिक्षेत आहे. या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. डिसेंबर 2019 पासून चीन मधील (हुबेई) प्रांतातून या आजाराची सुरवात झाल्यानंतर 72 देशात तो पसराला आहे. या सर्व देशात एकुण 93 हजार 90 रुग्ण असून 3 हजार 198 (3.4 टक्के) रुग्ण मृत्यू पावले तर 51 हजार (94 टक्के) रुग्ण बरे झाले आहे. त्यापैकी 6 हजार 712 (17 टक्के) रुग्ण गंभीर आजारी आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...