Wednesday, October 5, 2016

उज्ज्वल नांदेड यशस्वी करण्यासाठी
येणाऱ्या संधीला ध्येय माना - काकाणी
यशस्वी उमेदवारांचाही मार्गदर्शन शिबीरात सत्कार संपन्न

नांदेड, दि. 5 :-  उज्ज्वल नांदेड ही यशस्वी परंपरा ठरविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संधीला ध्येय माना, त्यासाठी एकाग्रता, अभ्यासाचे नवीन तंत्र आत्मसात करा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले. उज्ज्वल नांदेड या संकल्पनेतील जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती व  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्यावतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मार्गदर्शन शिबीर दर महिन्याच्या 5 तारखेला आयोजित करण्यात येत आहे.
डॉ. शंकरराव  चव्हाण  प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे आयोजित शिबीरासाठी महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा सहाय्यक आयुक्त श्रीमती माधवी मारकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती. यावेळी उज्‌जवल नांदेड संकल्पनेमुळे यशस्वी झालेले आणि सहायक सरकारी अभियोक्ता वर्ग-1 पदी निवड झालेले यशस्वी मनोज देशपांडे, विशाल परदेशी आणि व्यंकटेश पोटफोडे यांचाही सत्कार करण्यात आला. सहायक आयुक्त श्रीमती मारकड  यांनी भारतीय राज्यव्यवस्था (UPSC व  MPSC) या विषयावर मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, स्पर्धा आयुष्यातही असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली, तर ती आयुष्याच्या वाटचालीतही उपयुक्त ठरते. त्यामुळे स्पर्धा तयारीचे हे पाऊल नेहमीच पुढचं पाऊल ठरते. त्यासाठी एकाग्रता, जिद्द-चिकाटी आणि नव-नवीन तंत्र आत्मसात करण्याची वृत्तीही वाढते. यातूनच तुमच्यासाठी यशाचे नवे मार्ग खुले होत राहतील. त्यामुळे उज्ज्वल नांदेडच्या उपक्रमाची ही परंपरा यशस्वी ठरविण्यासाठी प्रत्येकाने ध्येय छोटे-मोठे न मानता येणाऱ्या प्रत्येक संधीला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
मनपा आयुक्त श्री. उन्हाळे म्हणाले की, स्पर्धेत टीकण्याची, भाग घेण्याची आणि प्रत्येक क्षेत्रातील क्षमता विकासाची संधी स्पर्धा परीक्षामुळे अंगी येते. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही या वृत्तीचा कस लागतो, कसोटी पाहिली जाते.
यावेळी सहायक सरकारी अभियोक्ता वर्ग-1 पदी निवड झालेले मनोज देशपांडे यांनी स्वतःला ओळखून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करा, असा सल्ला दिला. आपल्या यशात जिल्हा ग्रंथालय तसेच या उपक्रमाचे मोठे योगदान असल्याचेही सांगितले. सुरवातीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय करून दिला. आरती कुकलवार यांनी सुत्रसंचालन केले. शिबीरासाठी सभागृहात विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...