Wednesday, October 5, 2016

पाऊस, पुराने बाधित पिकांच्या
विमा संरक्षणाबाबत शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड, दि. 5 :- खरीप हंगाम 2016 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजना आणि पीक विमा संरक्षणाबाबत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिपाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली आहे. पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे व त्यासाठी विमा कंपन्याशी संपर्क साधण्याच्या प्रक्रियेचेही माहिती निवेदनात दिली आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात पिकांचा विमा काढलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाल्यामुळे आपल्या शेताचा पंचनामा करावा व विमा कंपनीस कळवावे म्हणून शेतकरी कृषि विभाग, महसूल विभाग व बँकाकडे अर्ज करत आहेत. परंतू सदर नुकसानीच्या बाबतीत सर्वांनी अर्ज करणे अपेक्षीत नाही. जेथे स्थानिक आपत्ती झालेली आहे म्हणजे नदी, नाल्याचे पुराचे पाणी शेतात घुसून पिकाचे जर नुकसान झाले असेल तरच वैयक्तिक  पंचनाम्यासाठी  शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, विमा हप्ता भरल्याची पावती, सात-बारा इत्यादी  माहिती  तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावयाची आहे. स्थानिक आपत्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भारतीय कृषि विमा कंपनीचा टोल फ्री नंबर 1800 103 0061 वर 48 तासात माहिती दयावयाची आहे. याचबरोबर  तालुका कृषि अधिकारी किंवा बँकाकडे प्राप्त झालेल्या स्थानिक आपत्तीच्या अर्जाची माहिती विमा कंपनीस पाठवून नुकसानीचा अंदाज बांधण्यासाठी विमा कंपनीने आपला प्रतिनिधी पाठविण्याची विनंती करावयाची आहे.
पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी घटकामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे पीक कापणी प्रयोग लक्षात आले आणि उंबरठा उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान असेल तर अशा महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे. यासाठी वैयक्तिक अर्ज करण्याची गरज नाही. पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले उत्पन्न जर उंबरठा उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा कमी असेल तर त्या महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे याबाबीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची गरज नाही.
पीक काढल्यानंतर सुकविण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. परंतू हे नुकसान चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे झाले असेल तर नुकसान भरपाई देय आहे. परंतू आताचा पाऊस अवेळी नसल्यामुळे काढणी पश्चात नुकसानीसाठी वैयक्तिक पंचनाम्याची गरज नाही.
विमा कंपनीचे नाव व पत्ता पुढील प्रमाणे आहे. भारतीय कृषि विमा कंपनी मुंबई दूरध्वनी नंबर 022-61710900 / 901, टोल फ्री क्र. 1800 103 0061, ईमेल आयडी ro.mumbai@aicofindia.com जिल्हा प्रतिनिधी आय. जी. मठपती, लाहोटी कॉम्प्लेक्स प्रभात टॉकीज जवळ वजिराबाद नांदेड दूरध्वनी क्र. 02462-238927 मो. 9403636900. विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक नितीनकुमार स्वर्णकार दूरध्वनी क्र. 022-7307571488 आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1148 राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी...