Friday, October 11, 2024

 वृत्त क्र. 932 

नवा मोंढा मैदानावर आता 13 ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा 

नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती 

नांदेड दि. 11 ऑक्टोबर : महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा महिला आनंद मेळावा आता रविवार 13 ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज यासंदर्भात आढावा बैठक घेऊन सर्व जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क केले. यापूर्वी ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होणार असून मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. 

उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबरला निधन झाले त्यामुळे राज्य शासनाने 10 ऑक्टोबरला एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता 13 ऑक्टोबरला रविवारी दुपारी 11 ते सायंकाळी 5 या दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2 नंतर मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित महिला भगिनींशी, नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तयारीला लागले आहे. 

राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाचे हे आयोजन आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. 

जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. जिल्हा प्रशासन या मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 954 राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे -           जिल्हाधिकारी अभिजीत राऊत • राजकीय पक्षांचे प्...