Monday, February 28, 2022

 जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत सर्व शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी येथे तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखूपासून होणाऱ्या वाईट परिणामाची माहिती देण्यात आली. यात खाजगी शिकवणी वर्गात मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होता. यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, खाजगी शिकवणी असोसिएशन आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष यांनी एकत्रित काम केले आहे. 

किशोरवयीन आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाच्या प्रमाणाबाबत मागील आठवड्यात राज्यासाठीचा अहवाल प्रसिध्द झाला. त्यामध्ये लहान वयोगटात तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त असल्याने सर्व शाळा, महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी वर्ग येथे तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले होते. 

शैक्षणिक संस्थेमध्ये आणि शैक्षणिक संस्थेच्या 300 फूट अंतरामध्ये कोणत्याही प्रकारे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ, पानमसाला, गुटखा इत्यादीचे सेवन अथवा विक्री किंवा धुम्रपान करण्यास बंदी आहे. यांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी सर्व विभाग आणि सर्व स्तरातून पुढे यावे, असे आवाहन जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...