Thursday, November 28, 2019


स्‍मार्ट गर्ल प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुली आत्‍मनिर्भय बनतील
                                                          --- जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे  
         नांदेड,दि.28:- शाळा-महाविद्यालयातील किशोरवयीन मुलींच्‍या व्‍यक्तिगत, शारीरिक, कौटुंबिक समस्‍यांसह बदनामीच्‍या धास्‍तीत दबून वावरणाऱ्या मुलींना आत्‍मनिर्भय बनविण्‍यासाठी स्‍मार्ट गर्ल प्रशिक्षण महत्‍वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
जिल्‍हयातील 1 लाख 18 हजार विद्यार्थ्‍यांनी घेणार प्रशिक्षणस्‍मार्ट गर्ल प्रशिक्षणात जिल्ह्यातील 378 जिल्‍हा परिषद शाळा 496 खाजगी कनिष्‍ठ महाविद्यालयातून सुमारे 1 लाख 18 हजार विद्यार्थीनींना महिला शिक्षिकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्‍व-संरक्षण, स्‍व-जाणीव, संवाद-संबंध तसेच मुलींचे आरोग्‍य, पर्याय-निर्णय, मैत्रि-मोह आदी विषयावर या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे.
       भारतीय जैन संघटना, जिल्‍हा परिषद शिक्षण विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गुरुवार दिनांक 28 नोव्‍हेंबर रोजी नांदेड तालुक्‍यातील वाघी येथील जिल्‍हा परिषद हायस्‍कुल येथे जिल्‍हास्‍तरीय स्‍मार्ट गर्ल प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्‍हा पोलिस अधिक्षक विजय मगर, सहाय्यक सरकारी वकील संतोष पुलकुंडवार, माध्‍यमिक शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, माधव सलगर, जिल्‍हा परिषद सदस्‍य साहेबराव धनगे, सरपंच महानंदाबाई पंडीतराव जानकर, पंचायत समिती सदस्‍या शुभलक्ष्‍मी सूर्यवंशी, स्‍मार्ट गर्ल प्रशिक्षक कल्‍पना कांबळे आदींची उपस्थिती होती.

        जिल्हाधिकारी अरुण डोंगरे पुढे म्हणाले की, मुलींच्‍या मनातील न्‍युनगंड काढून त्‍यांच्‍यात आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी स्‍मार्ट गर्ल उपक्रम महत्‍वाचा ठरणार आहे. आत्‍मनिर्भयतेसह मुलींना आस्मिता उपक्रमात सहभागी करुन त्‍यांना मासिकपाळी व्‍यवस्‍थापन, आरोग्‍य विषयक शिक्षण देणे आवश्‍यक आहे.मुली खुप शिकल्‍या पाहिजे. त्‍या शिकल्‍या तरच माहेर आणि सासरच्‍या घराचा उध्‍दार करतील. टिव्‍ही विविध चॅनल वरील कार्यक्रम पाहतांना आपल्‍या ज्ञानात भर पडेल असे कार्यक्रम पाहण्‍यास पसंती दिल्‍यास नव-नवे ज्ञान मिळेल असेही ते म्‍हणाले.
    
प्रारंभी महात्‍मा ज्‍योतिबा फुले क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या प्रतिमांचे पुजन करुन दीप प्रज्‍वलन करुन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍याहस्‍ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले. त्‍यानंतर उपस्थित पाहुण्‍यांचा गुलाब पुष्‍प ग्रंथ देवून सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी शालेय विद्यार्थींनींनी औक्षण पुष्‍पवृष्‍टीने मान्‍यवरांचे प्रवेशव्‍दाराजवळ स्‍वागत केले.
      जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले ते म्‍हणाले की , मोह, मैत्री प्रलोभन म्‍हणजे काय याचा अर्थ मुलींनी समजून घेतला पाहिजे. शाळेत मुलींनी समुहाने रहावे. तर आपणास कोणत्‍याही गोष्‍टीचा त्रास होणार नाही. एकिच्‍या बळाचा वापर मुलींनी करावा असा सल्‍ला                          श्री. काकडे यांनी यावेळी दिला.
जिल्‍हा पोलीस अधिक्षक विजय मगर म्‍हणाले की, स्‍मार्ट गर्ल हा कार्यक्रम प्रत्येक शाळेत इयत्‍ता पाचवी पासून घेतला पाहिजे. सध्‍या मोठ्या प्रमाणात अत्‍याचाराचे प्रकरणे येत आहेत. ही बाब गंभीर आहे. आपल्‍याकडून काही चूक होणार नाही, याची काळजी मुलींनी घेतली पाहिजे. आमच्‍याकडे पोलीस दिदी उपक्रम असून प्रत्‍येक शाळेत मुलींना माहिती देण्‍यासाठी महिला पोलीस कर्मचारी शाळांमधून संवाद साधणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगीतले.
सरकारी सहाय्यक वकील संतोष पुलकुंडवार यांनी कायदेविषक माहिती दिली. पुढे म्‍हणाले की, इयत्‍ता आठवी ते दहावीच्‍या वयात शारीरिक बदल होत असतात. या वयात विशिष्‍ट गोष्‍टींचे आकर्षण वाटत असते. परंतू आपण आकर्षणाच्‍या बळी पडता चांगल्‍या वाईट गोष्‍टींची जाण असणे आवश्‍यक आहे. आई सारखी चांगली दुसरी मैत्रीण नाही. त्‍यामुळे मुलींनी प्रत्‍येक गोष्‍ट आईला सांगितली पाहिजे. महिलांसाठी चांगले कायदे आहेत त्याबाबतची माहिती आपण ठेवावी. शाळा-महाविद्यालयस्‍तरावर छेडछाडीचा अथवा अत्‍याचार झाल्‍यास प्रथमत: पोलीसा प्रशासनाला तक्रार देणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य साहेबराव धनगे यांचे भाषण झाले.प्रशिक्षक कल्‍पना कांबळे, विद्यार्थींनी कु. श्‍यामल शिंदे यांनी याप्रसंगी मनोगत व्‍यक्‍त केले.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले. यावेळी स्‍मार्ट गर्ल्‍स उपक्रमासाठी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांनी पाठविलेल्‍या शुभेच्‍छा संदेशाचे वाचन करण्‍यात आले. सुत्रसंचालन डॉ. हेमंत कार्ले तर उपस्थितांचे आभार सुरेश बिंगेवार यांनी मानले.  
या कार्यक्रमाला पत्रकार गोविंद करवा, रघुनाथ पोतरे, अम्रत देशमुख, माधव गोधणे, जिल्‍हा माहिती कार्यालयाचे विवेक डावरे, जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे, गट शिक्षणाधिकारी रुस्‍तूम आडे, शिक्षण विस्‍तार अधिकारी शंकर इंगळे, शाळा व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष बाळूभाऊ भोसले, मुख्‍याध्‍यापक सुरेश बादशहा, डॉ. हेमंत कार्ले, प्रलोभ कुलकर्णी, माणिकराव मेकाले, गुलाबराव भोसले, वैजनाथ तोरे, रमेश मदे, शिवानंद जानकर, आर.यू. कऱ्हाळे, विजय भोसले यांच्‍यासह ग्रामपंचायतीचे सदस्‍य, शाळा व्‍यवस्‍थापन समिती सदस्‍य, शिक्षक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी, विद्यार्थींनी, पालक, गावकरी, महिला, प्रतिष्ठित व्‍यक्‍ती आदींची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...