Thursday, April 18, 2019


सखी मतदान केंद्रावर मतदारांचे स्‍वागत
नांदेड, दि. १८ः- भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. तसेच इतरांपेक्षा वेगळे आणि सुविधायुक्त मतदान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असेही निर्देश होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात सहा सखी मतदान केंद्र स्‍थापना करण्‍यात आली होती. 
केवळ महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती असलेले सखी मतदान केंद्र आणि सर्व प्रकारच्या सुविधा तसेच मतदारांना हवेहवेसे वाटणारे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते.
मतदारसंघात ८५-भोकरमध्‍ये मौलाना आझाद विद्यालय (मुदखेड), ८६-नांदेड-उत्तरमध्ये महिला कामगार कल्याण मंडळ (लेबर कॉलनी, नांदेड), ८७- नांदेड दक्षिण गुजराती हायस्‍कूल वजीराबाद, नांदेड, ८९-नायगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव, ९०-देगलूरमध्ये सावित्रीबाई फुले विद्यालय देगलूर, ९१-मुखेडमध्ये गुरुदेव प्राथमिक शाळा, मुखेड अशा सहा ठिकाणी राबविण्‍यात आलेल्‍या मतदान केंद्रात येणा-या महिलांना हळदी-कुंकू औक्षण करुन स्‍वागत करण्‍यात आले. अनेक मतदान केंद्रात सजावट करण्‍यात आली होती. मतदारांसाठी बैठक व्‍यवस्‍था तर मतदारांचे गुलाब पुष्‍प देवून सत्‍कार करण्‍यात आला. अचानक एखाद्या मतदारांस आरोग्‍य विषयक त्रास झाला तर त्‍वरीत उपचार मिळावा यासाठी आरोग्‍य कक्षाचीही स्‍थापना करण्‍यात आली होती. 

०००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...