वृत्त क्र. 483
विविध शासकीय योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
· वृक्ष लागवड, लेक लाडकी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश
नांदेड दि. 14 : जूनमध्ये होणारी वृक्ष लागवड, लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांची वृद्धी, शासनाच्या बांबू मिशनची अंमलबजावणी आणि लोकशाही दिनानिमित्त दाखल झालेल्या प्रलंबित तक्रारींचा तसेच जिल्हा व राज्यस्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील उच्चस्तरीय बैठकीमध्ये घेण्यात आला.
निवडणुका झाल्यानंतर शासन जोमाने कामाला लागले असून खरीपाच्या संदर्भातील कृषी विभागाच्या अनेक बैठका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या आहेत. यासोबतच जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बी -बियाणे, खते कीटकनाशके यांची उपलब्धता व त्या संदर्भातील आढावा तालुका स्तरावर जाऊन घेण्यात आला आहे. त्यानंतर शासन स्तरावरील काही महत्त्वाच्या योजनांचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मनपा अतिरिक्त आयुक्त गिरिश कदम यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
आजच्या बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्र शासन बांबू मिशन आढावा, विद्यापीठ मार्फत चालणाऱ्या इंटर्नशिप योजनेचा आढावा, लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा, लेक लाडकी योजनेच्या प्रचार प्रसिद्धी आढावा याशिवाय अन्य सर्व बाबीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचना करताना राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी मोठया प्रमाणात जिल्ह्यामध्ये बांबू लागवड करण्यात यावी, ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेप्रमाणे उदिष्ठये घेऊन बांबू लागवड करण्यात यावी,खासगी शाळांनी यामध्ये पुढाकार घ्यावा , गायराणावर प्रत्येक गावात ही लागवड व्हावी, कृषी विभागाने यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच सर्व विभागाने यावर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ पूर्ण करावे,असे निर्देश दिले. याशिवाय जिल्ह्यातील जनतेने देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी यासाठी जनजागृती करण्याच्या आवाहनही त्यांनी केले.
लेक लाडकी योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. सध्या जिल्ह्यात 1827 लाभार्थी आहे. मात्र या योजनेतून पात्र असणाऱ्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यासोबतच महिला सबळीकरण धोरणाच्या 16 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
विद्यापीठ मार्फत चालणाऱ्या इंटर्नशिप योजनेचा आढावा घेण्यात आला. इंटर्नशिपसाठी विभागानी विद्यापीठाला आपल्या स्तरावर कळविण्याचे निर्देश या वेळी त्यांनी दिले.
लोकशाही दिनातील प्रलंबित सर्व प्रकरणे तातडीने पूर्ण करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. अनेक विभागाकडे मोठया प्रमाणात प्रकरणे प्रलंबित आहे. निवडणूक काळात प्रलंबित राहिलेल्या प्रकरणाना तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे यानी यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात आढावा घेतला. बैठक केव्हाही लागू शकते त्यामुळे सर्वानी आपले प्रस्ताव तयार ठेवावे, अशी सूचना करण्यात आली. याशिवाय राज्य, जिल्हा स्तरावरील समन्वयाच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली.
प्रत्येक कुटुंबाने लावावे एक झाड
दिवसेंदिवस पर्यावरणाचे असंतुलन वाढत आहे. तापमान वाढत आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड यावर्षी लावावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सुरक्षित जागी या पावसाळ्यात आपले झाड लावले जाईल यासाठी कुटुंबातल्या प्रत्येकाने पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment