Saturday, January 13, 2024

 वृत्त क्र. 41   

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना

सर्वसामान्यांना आरोग्याच्या दृष्टीने अधिक मोलाची

- डॉ. ओमप्रकाश शेटे

 

·         प्रत्येक लाभार्थ्यांना प्रधामंत्री जनआरोग्य कार्ड मिळण्यासाठी जिल्हापातळीवर समिती 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्यातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्यादृष्टिने अतिशय महत्त्वपूर्ण योजना म्हणून जनआरोग्य योजनेकडे पाहिल्या जाते. कोट्यावधी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या योजनेबाबत अतिशय दक्ष आहेत. या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये यादृष्टिने आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र ही समिती शासनाने नियुक्त केली आहे. प्रत्येकाला जनआरोग्य कार्ड मिळावे यासाठी या समितीमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येकाला कार्ड मिळावे यासाठी पर्यटन, तीर्थक्षेत्र याठिकाणी जनजागृती केली जाईल. याच्या सुयोग्य नियोजनासाठी जिल्हा पातळीवर लवकरच स्वतंत्र समिती नियुक्त करू, असे प्रतिपादन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली चौगुले व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. 

जनआरोग्य कार्ड सर्वसामान्यांना उपलब्ध होण्यासाठी काही जिल्ह्यात तांत्रिक अडचणी आढळून आल्या आहेत. त्यावर योग्य विचार विमर्ष करून जिल्हा पातळीवर एक समिती स्थापन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी हे सचिव म्हणून काम पाहतील. यात महानगर पालिका, नगरपंचायत अधिकारी, सीएससी सेंटरचे प्रमुख यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. नगरपंचायत अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सहभागातील ही समिती जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय सुविधेच्या दृष्टीने जनआरोग्य कार्ड कसे उपलब्ध होतील याची काळजी घेईल, असे डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यात या मोहिमेला गती देण्यासाठी प्राथमिक टप्प्यावर नायगाव मतदारसंघात विशेष कार्यक्रम हाती घेतल्याचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले. लोकांचा सहभाग यात वाढावा यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच यांनी आयुष्यमान भारत काढून देण्यासाठी गावपातळीवर पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

नांदेड जिल्ह्यात विविध पर्यटन व धार्मिक स्थळे मोठ्याप्रमाणात आहेत. या मंदिरांच्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड तयार करून ते प्रसाद रूपाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक विश्वस्त, आरोग्य विभागाची टीम, प्रशासन याचे योग्य ते नियोजन करेल असे त्यांनी स्पष्ट केले. 

नांदेड येथून हैद्राबाद येथे अनेक रूग्ण उपचारासाठी जातात. या रूग्णांना जनआरोग्य योजनांचा लाभ मिळावा यादृष्टीने तेथील मान्यताप्राप्त संलग्न असलेल्या रूग्णालयाची माहिती येथील आरोग्य विभागाचे समन्वयक लवकरच उपलब्ध करून देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

00000

छायाचित्र:- पुरुषोत्तम जोशी





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...