Thursday, April 12, 2018


वृ.वि.1081                                                                               22 चैत्र 1940 (सायं.6.55 वा.)
                                    12 एप्रिल 2018
उमरखेड शहरातील पाणी पुरवठ्यासाठी
52 कोटींची योजना
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·        मागणीप्रमाणे घरांसाठी मान्यता
·        वर्धा-नांदेड रेल्वे प्रकल्पाला गती
·        वसंत कारखाना पुन्हा सुरू करू
यवतमाळ, दि. 12 : नागरीकरणामुळे शहरांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. उमरखेड येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून पाणी पुरवठ्यासाठी 52 कोटी रूपयांची योजना मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
उमरखेड नगर पालिकेच्यावतीने येथील सारडा जीन प्रांगणात आयोजित विविध विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण व भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र पाटणी, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, नगराध्यक्ष नामदेव ससाणे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील रोजगाराच्या संधींमुळे शहरांची लोकसंख्या वाढत आहे. राज्यातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. शहरांमधील पायाभूत सुविधांचे नियोजन नसल्यामुळे नागरी प्रश्न उभे राहिले आहेत. यावर उपाय म्हणून स्मार्ट शहरे, पिण्याच्या पाण्यासाठी अमृत योजना, चौदाव्या वित्त आयोगामधून शहरांच्या विकासासाठी सुमारे 21 हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून प्रामुख्याने शहरी गरीबांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. यातूनच उमरखेड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या योजनेसाठी 52 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या पाणीपुरवठा योजनेतून बंद पाईपलाईनने पाणी आणण्यात येणार असल्याने पाण्याचा अपव्यय होणार नाही, तसेच येत्या 30 वर्षांच्या काळात पाणी पुरवठ्याचे नियोजन होईल. शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून खतामध्ये रूपांतर करण्यासाठी हरित सिटी कंपोस्ट ब्रँड निर्माण करण्यात आला आहे. यातून शहरातील कचऱ्यांची समस्या कायमची मिटणार आहे.
आज शहरासाठी घरांची एक योजना मंजूर करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शहराच्या मागणीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वांना घरे मिळण्यासाठी सर्वच घरांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल. त्यासोबतच राज्यातील बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठी एक सर्वसमावेशक योजना तयार करण्यात येत आहे. यात परिसराचा आर्थिक कणा असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासोबतच रस्ते विकास, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग गतीने पूर्ण करण्यात येईल. दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे परिसरात रोजगाराच्या विविध संधी निर्माण होणार आहे.
गावे जल स्वयंपूर्ण होण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून यावर्षी 11 हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली आहेत. शेतीची स्थिती सुधारण्यासाठी‍ सिंचनाची सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 130 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकरी दोन पिके घेण्यास सक्षम होतील. यातून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. राज्यात 15 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे उभारण्यात येत आहे. परिसरातील रस्त्यांच्या जाळ्यांमुळे रोजगारांच्या संधी निर्माण होतील. यासाठी युवकांना स्वयंरोजगारासाठी मुद्रा योजनेतून 10 लाख रूपयांपर्यंत विनातारण कर्ज देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे बँकेतून खाते उघडण्यासाठी जनधन योजना सुरू करण्यात आली आहे. 30 कोटी खाती उघडण्यात आल्यामुळे या खात्यामार्फतच थेट अनुदान देण्यात येत येत असल्यामुळे पहिल्याच वर्षी सुमारे 15 हजार कोटी रूपये वाचले आहेत. महिलांचे आरोग्य राखण्यासाठी उज्ज्वला योजनेतून पाच कोटी गॅस जोडणी करण्यात आली आहे. येत्या काळात आठ कोटी नागरीकांना याचा लाभ देण्यात येणार आहे. गरजूंना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 2 लाख रूपयांपर्यंतचे उपचार करण्यात येत आहे. तसेच मोदी केअरच्या माध्यमातून आता देशातील सुमारे 50 कोटी नागरीकांना 5 लाख रूपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शहराच्या विकासात योगदान देणारे माजी नगराध्यक्ष सुरेशचंद्र जेठमलजी माहेश्वरी, सन्नाउल्ला अमानउल्ला, श्यामसुंदर उत्तरवार, वामनराव उत्तरवार, कृष्णगोपाल उत्तरवार, राधेश्याम जांगीड यांचा सत्कार करण्यात आला. आमदार राजेंद्र नजरधने यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. परिसराच्या विकासासाठी आरोग्य, शहराचा विकास, सिंचन सुविधा, पर्यटन विकास, पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्रात मोठे कार्य झाले आहे. सहकारी तत्वावावरील बंद असलेला वसंत साखर कारखाना सुरू करावा, तसेच इसापूर प्रकल्पातून शहरासाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष नामदेव ससाणे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, नगर पालिका क्रिडा संकुल, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आणि मुख्य मिरवणूक मार्ग सुवर्ण पथ या कामांचे लोकार्पण, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विकास, रा. प्र. उत्तरवार शासकीय उपजिल्हा रूग्णालय आणि विडूळ येथे 33 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
००००



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...