शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी
बाजार समित्यांनी पुढाकार
घ्यावा
-
सहकार मंत्री सुभाष देशमुख
नांदेड
दि. 8 :- नांदेड जिल्ह्यातील 19 पैकी 6 कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शासनाच्या शेतमाल
तारण कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी सुविधा दिली आहे. शेतमाल तारण
कर्जाच्या या महत्वाच्या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी इतर कृषी
उत्पन्न बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व
वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
नांदेड
येथील शासकीय विश्रामगृहात सहकार मंत्री ना. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शेतमाल
तारण कर्ज योजना व किमान आधारभुत किंमत योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत
होते. या बैठकीस आ. सुभाष साबणे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे,
जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, राम
पाटील रातोळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या
फायद्याच्या शेतमाल तारण कर्ज योजनेची जिल्ह्यातील अंमलबजावणीबद्दल बोलतांना ना.
देशमुख पुढे म्हणाले की, बाजार समितीच्या बैठकीमध्ये सहकार विभागाच्या सहाय्यक
निबंधक यांनी उपस्थित राहून बाजार समित्याच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. शेतमाल
तारण कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी बाजार समित्यांशी चर्चा करुन
प्राधान्याने योजना राबविण्यात यावी. गोदाम नसलेल्या बाजार समित्यांचे प्रस्ताव
पाठविण्यात आल्यास गोदम मंजूर करण्यात येतील. शेजारी असलेल्या वखार महामंडळाच्या व
इतर गोदामाचा वापर करुन ही योजना राबविण्याचा विचार करण्यात यावा. यासाठी
जिल्हाधिकारी यांनी संबंधितांची बैठक घेऊन स्थानिकरित्या निर्णय घ्यावा अशी सुचना
सहकारी मंत्री देशमुख यांनी केली. शेतमाल तारण कर्ज योजनेची शेतकऱ्यांना जास्तीत
जास्त माहिती व्हावी यासाठी विविध प्रसार माध्यमांचा वापर सहकार विभागाने करावा,
असेही श्री. देशमुख म्हणाले.
चालु
हंगामामध्ये नांदेड जिल्ह्यात किमान आधारभूत किमतींने झालेल्या मूग, उडीद आणि
सोयाबिन खरेदीचा आढावा घेऊन ना. देशमुख म्हणाले की, तूरीची नोंदणी सुरु केली असेल
त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी
शेतकऱ्यांना सहकार्य करावे. खरेदी केंद्र सुरु राहतील याची दक्षता घेण्यात यावी व
विहित वेळेत रक्कमा अदा होतील यासाठी प्राधान्य दयावे, असेही ते म्हणाले.
शेतमालाची चाळणी जागेवरच व्हावी यासाठी प्रमुख गावांमध्ये बाजार समित्यांच्यावतीने
चाळणी यंत्र स्थापित करण्यात येतील, असे सांगून त्यांनी स्वस्त धान्य दुकानातून 55
रुपये किलो दराने तूर विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी लोकप्रतिनिधी आणि बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अडीअडचणी सांगितल्या.
प्रारंभी
मान्यवरांचे स्वागत करुन सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी
सविस्तर माहिती सादर केली. यावेळी सहकार व पणन विभागाचे अधिकारी व पदाधिकारी
उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment