Sunday, December 17, 2017

दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रमात
ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगाराची संधी
- खा. अशोकराव चव्हाण
       पशु, अश्व, श्वान व कुक्कूट प्रदर्शनाचे माळेगाव यात्रेत आयोजन    

नांदेड दि. 17 :- मराठवाडा व विदर्भात दुग्धव्यवसाय विकासाला चालना मिळण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, अर्धापूर, मुदखेड व नांदेड तालुक्यातील 309 गावांत दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार मिळण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. जि. प. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य पशु, अश्व, शेळी, श्वान व कुक्कूट प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार श्रीनिवास गोरठेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आ. अमर  राजूरकर, आ. डी. पी. सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधव मिसाळे, कृषि व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, समाज कलयाण सभापती सौ. शिलाताई निखाते, नांदेड मनपाचे उपमहापौर विनय गिरडे पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, माळेगावचे सरपंच गोविंद राठोड, माजी आमदार माधवराव पाटील, रोहिदास चव्हाण, हणमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजी धुळगुंडे, दिलीप पाटील बेटमोगरेकर, लातूरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. एस. एन. सुर्यवंशी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.  
श्री. चव्हाण म्हणाले, दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली श्री खंडोबारायाची यात्रा परंपरेनुसार दरवर्षी उत्साहात साजरी केली जात आहे. महाराष्ट्रासाठी ही यात्रा वैभव संपन्न असून विविध प्रदर्शनाचे आयोजन हे यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे.      
श्री. गोरठेकर यांनी माळेगाव यात्रेतील पुशप्रदर्शन हे सर्वात मोठे पशुप्रदर्शन म्हणुन नावलौकीक असून यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने विविध ठिकाणाहून आलेल्या पशु व पशुपालकांसाठी चांगली सुविधा दिली जात असल्याचे सांगितले.  
प्रास्ताविकात जिल्हा पशुसंवर्धन श्री. पवार म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने दुग्ध उत्पादनात वाढ करण्यासाठी वैरण विकासावर भर दिला जात आहे. पशु आरोग्यासाठी खनीज मिश्रन, नियमीत तपासणी शिबीर व मार्गदर्शन करण्यात येत आहे. आधार कार्डच्या धर्तीवर जनावरास बिल्ला मारुन पशुसंजवनी कार्ड दिले जाणार आहे असे सांगून राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेची माहिती दिली.
सुत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले तर आभार सहायक पशुधन विकास अधिकारी उत्तम सोनकांबळे यांनी मानले.  
या प्रदर्शनात उत्कृष्ट देखणी पशु, अश्व, श्वान, व कुक्कूट सहभागी झाले आहेत. यामध्ये लाल कंधारी नर गट त्यामध्ये नर वासरे, अदान वळू (दोन दात, चार दात, सहा दात)  लाल कंधारी मादी गटामध्ये मादी वासरे, कालवड व गायी असे तीन गट, संक्रीत एचएफ गटात कालवड, वासरे व गाई तसेच संक्रीत जर्सी गटात वासरे, कालवडी व गाई त्याचप्रमाणे शेळी गट, श्वान गट, कुक्कूट गट व दुग्ध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सर्व गटात प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनपर बक्षीसासाठी पशुंची निवड वेगवेगळ्या विद्यापीठातील प्राध्यापकाकडून करण्यात येत आहे. यासाठी शासनाकडून 17 लाख 50 हजार रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. त्याचप्रमाणे यात्रेत पशुसंवर्धन विभागाचा प्रदर्शनी स्टॉल लावण्यात आला असून त्याद्वारे अद्यावत पशुपालकांना माहिती देण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे 20 डिसेंबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पशुप्रदर्शनात महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात पशुसह पशुपालक आले आहेत. या प्रदर्शनात यात्रेकरु माहितीसह पशु, अश्व, श्वान, व कुक्कूटाची खरेदी करत आहेत.   

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...