Saturday, October 14, 2017

विष्णुपुरी काळेश्वर मंदिर पर्यटनस्थळांतर्गत
झालेल्या कामांची हस्तांतरण प्रक्रिया त्वरीत करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
       

नांदेड, दि. 14 :- विष्णुपुरी काळेश्वर मंदिर परिसर पर्यटनस्थळांतर्गत पुर्ण झालेली विविध विकास कामे वापरात राहण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी हस्तांतरण प्रक्रिया त्वरीत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
            केंद्र पुरस्कृत मेगा टुरिझम मार्केट योजनेंतर्गत नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी काळेश्वर मंदिर परिसर विकासाच्या कामांची पहाणी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी आज केली. त्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी काळेश्वर मंदिर समितीचे सर्वश्री उत्तमराव हंबर्डे, धारुजीराव हंबर्डे, बालाजीराव हंबर्डे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख व एन. व्ही. पत्तेवार उपकार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे, जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी एस. एस. राठोड आदी उपस्थित होते.
            विष्णुपुरी काळेश्वर मंदिर परिसर हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत मेगा टुरिजम योजनेंतर्गत 23 कोटी 40 लाख 97 हजार रुपयाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कृषि माहिती केंद्र, ग्रामीण उत्पादन दालन, ॲम्फीथिएटर, घाट विकास आणि पिचींग कुपण, भिंत, वाहनतळ याची कामे पुर्ण झाली आहेत. प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत विष्णुपुरी गोदावरी बँक वॉटर परिसर विकासांतर्गत गार्डन व लॅड स्कैपींग व वॉटर स्पोर्टस फॅसिलिटीज ही 1 कोटी 62 लाख 40 हजार रुपयाची कामे पुर्ण झाली आहेत. ही सर्व विकास कामे वापरात राहिल्यास त्याचा लाभ पर्यटकांना घेता येईल व देखभाल ही चांगली राहील म्हणून संबंधीत यंत्रणांनी हस्तांतराची प्रक्रिया लवकर करावी तसेच बँक वॉटर स्ट्रीम वरील पुलाचे ही काम लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने यंत्रणांने प्रयत्न करावेत अशा सूचनाही श्री. डोंगरे यांनी यावेळी दिल्या.
            विष्णुपुरी काळेश्वर पर्यटनस्थळाचा सुनियोजित विकास केला, पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर पर्यटक व भाविकांची संख्या वाढेल, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. त्याचा लाभ या परिसरातील नागरिकांना मिळेल म्हणून या पर्यटनस्थळाच्या विकासाची कामे वेळेत व गुणवत्तापुर्ण होण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.
            यावेळी पाटबंधारे विभागाच्यावतीने झालेल्या कामांची माहिती अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी तर पर्यटन विकास आराखडा अंतर्गत कामांची माहिती जिल्हा नियोन अधिकारी श्री. थोरात यांनी दिली.
            या बैठकीनंतर श्री. डोंगरे यांनी या पर्यटनस्थळ अंतर्गत झालेल्या विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन पहाणी केली. तसेच विष्णुपुरी प्रकल्पासही भेट देऊन त्याची पाहणी केली.
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...