Tuesday, August 26, 2025

वृत्त क्रमांक 902

 पर्यावरणपूरक व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नदीच्या पात्रात विसर्जन न करता कृत्रिम तलावात विसर्जन करावे
गणेशोत्सव आनंदाने व उत्साहाने साजरा करा
नांदेड दि. 26 ऑगस्ट :- उद्यापासून गणपती उत्सवास प्रारंभ होत असून, यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व डीजेमुक्त करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, अतिरिक्त मनपा आयुक्त गिरीश कदम, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख तसेच विविध संबधीत विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

मनपा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागांनी यांनी त्यांच्या स्तरावरील कामे दिलेल्या निर्देशानुसार विहित वेळेत पूर्ण करावीत. यावेळेस गणपती विसर्जनाच्या दिवशी जीवरक्षकांची संख्या वाढविण्यात आली असून स्वयंसेवकांचे सहाय्य घेण्यात येणार आहे. तसेच मनपाच्यावतीने तीसऱ्या, पाचव्या दिवशी गणेश मुर्तीचे संकलन करण्यात येणार असून, लहान घरघुती गणपती विसर्जन करण्यासाठी छोटे छोटे पर्यावरणपूरक कुंड तयार करण्यात आले आहेत. नागरिकांनी नदीच्या पात्रात गणपती विसर्जन न करता मनपाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या पर्यावरण पूरक तलाव व कुंडातच गणपती विसर्जन करुन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नदीच्या वाहत्या प्रवाहात श्री गणेश मुर्तीचे विसर्जन न करता मनपाच्यावतीने विसर्जनासाठी तयार केलेल्या सांगवी, पासदगाव, पुयनी, झरी येथे कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्यावतीने केले आहे.
नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखावी
डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा -पोलीस अधिक्षक
उद्यापासून गणेशोत्सवास प्रारंभ होत असून या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने पूर्ण नियोजन केले आहे. उत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. पोलीस प्रशासन नेहमी दक्ष असून नागरिकांनी योग्य माहिती द्यावी. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यांची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले.
गणेशोत्सव काळात डिजेचा आवाजामुळे मोठे ध्वनी प्रदूषण होते. नागरिकांनी डीजे न लावता गणपती उत्सव साजरा करण्यावर भर देवून डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याबाबत गणेश मंडळाकडून तसे बंधपत्र घेतले असून कोणीही नियमांचे उल्लंघन करु नये असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळेस गणपती विसर्जनाच्या ठिकाणी व तालुकास्तरावर योग्य नियोजन करण्याबाबत निर्देश दिले असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.
गणेशोत्सव काळात आरोग्य विभागाने आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिल्या.
00000




00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...