वृत्त क्र. 253
अफवा पसरविणाऱ्या बातम्यांना थारा देऊ नका : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
एमसीएमसी संदर्भात पत्रकारांची कार्यशाळा
नांदेड, दि.१९ : लोकशाही प्रक्रियेमध्ये भारत निवडणूक आयोगाने माध्यमांच्या अनन्यसाधारण महत्वाला कायम अधोरेखित केले आहे. माध्यमांनी प्रतिबंध केल्यास अनेक चुकीच्या बातम्या,अफवा, गैरसमजला पायबंद बसतो. त्यामुळे ही निवडणूक अतिशय सकारात्मक पत्रकारितेचा आदर्श ठरावी. अफवांना थारा मिळू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.
माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची आज महत्त्वपूर्ण कार्यशाळा संपन्न झाली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅबिनेट हॉल बैठकीमध्ये झालेल्या या कार्यशाळेला पत्रकारांची भरगच्च उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची अतिशय महत्त्वाची भूमिका असून या काळामध्ये माध्यमांनी कायदा सुव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, मतदान प्रक्रिया, मतमोजणी संदर्भात सकारात्मक वृत्तलेखन करावे, तसेच या काळात उठणाऱ्या अफवांना गैरसमजांना चुकीच्या वृत्तांना थारा देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रेस कॉन्सिल ऑफ इंडिया तसेच भारत निवडणूक आयोगाने या काळात बातमीदारी, वृत्तप्रसारण,जाहिरात तयार करताना, माध्यमांवर पोस्ट टाकताना, सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, समाजामध्ये तेढ वाढणार नाही, शत्रुत्व तिरस्काराची भावना निर्माण होणार नाही, चारित्र्य हणन होणार नाही, खासगी आयुष्यावरून सभ्यतेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. नांदेड येथील माध्यम प्रतिनिधींनी याबाबत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचे सादरीकरण केले माध्यम कक्षाची उपयुक्तता जाहिरातींचे प्रमाणीकरण पेड न्यूजवर नियंत्रण इलेक्ट्रॉनिक्स व सोशल मीडियावर येणाऱ्या आक्षेपार्यवृत्तांवर निर्बंध समितीचे कार्य प्रमाणिकरणाची पद्धत याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी माध्यम कक्षाच्या कार्यप्रणाली बद्दल संवाद साधला. तर समितीमध्ये सोशल मीडियाचे नोडल अधिकारी असणारे गंगाप्रसाद दळवी यांनी समाज माध्यमांसंदर्भात सुरू असलेल्या सनियंत्रणाची माहिती दिली. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन भवनात बैठक कक्षात माध्यम कक्ष सुरू करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment