विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कार्यवाही करा
- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई, दि. 15 :- मौजे अर्सजन-कौठा येथे प्रस्तावित नांदेड जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिल्या.
नांदेड येथील विभागीय क्रीडा संकुलासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. आमदार अमर राजूरकर, क्रीडा आयुक्त डॉ. ओमप्रकाश बकोरिया (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार आदी उपस्थित होते.
नांदेड-लातूर मार्गावर मौजे अर्सजन-कौठा हद्दीत नांदेड जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. 24 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या क्रीडा संकुलांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केल्या. नांदेड येथे विभागीय क्रीडा संकुल विशेष बाब म्हणून उभारण्यात येत असून या संकुलामुळे जलतरण, बॉक्सिंग, धनुष्यविद्या आदी क्रीडा प्रकारांच्या सुविधा खेळाडूंना उपलब्ध होणार आहेत. या संकुलासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच संकुलाच्या आराखड्यात किरकोळ सुधारणा करण्याचे निर्देशही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर आणि मुखेड येथील क्रीडा संकुलाच्या
आराखड्याच्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या
संदर्भाने या बैठकीत पालकमंत्री चव्हाण यांनी आढावा घेतला.
००००००
No comments:
Post a Comment