Thursday, July 16, 2020


वृत्त क्र. 655   
शेतकऱ्यांनी उपकर योजनेत
कृषि साहित्यासाठी प्रस्ताव सादर करावेत
               कृषि पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर
नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्हा परिषदेच्या उपकर  योजनेंतर्गत अनुदानावर कृषि  साहित्याचा लाभ  घेण्यासाठी गरजू शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे.   
शेतकऱ्यांना जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत अनुदानावर डी.बी.टी. व कॅशलेस पध्दतीचा अवलंब करुन बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3 एचपी / 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर), दोन ते चार फाळी पल्टी नांगर व पॉवर टिलर इत्यादी कृषि साहित्य, यंत्राचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
औजार निहाय देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे आहे. बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअरसाठी देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रति औजार 2  हजार रुपये तर एकूण लाभ दयावयाची लाभार्थी संख्या 250 एवढी आहे. ताडपत्रीसाठी अनुदान 2  हजार रुपये, एकुण 400 लाभार्थी.  3 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संचासाठी अनुदान 10 हजार रुपये, एकुण 53 लाभार्थी. 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच अनुदान 15 हजार रुपये एकूण 53 लाभार्थी. पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर) साठी अनुदान 15 हजार रुपये एकूण 136 लाभार्थी. दोन ते चार फाळी पल्टी नांगरासाठी किंमतीच्या 50 टक्के जास्तीत जास्त 40 हजार रुपयाच्या मर्यादेत अनुदान, एकूण 12 लाभार्थी तर पॉवर टिलरसाठी अनुदान 50 हजार रुपये प्रति औजार याप्रमाणे असून एकूण 8 लाभार्थ्यांची संख्या आहे.
या योजनेंतर्गत औजाराचा, कृषि साहित्याचा लाभ घेणेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत.   शेतकऱ्यांचा अर्ज, स्वत:चे नावे जमीन असल्याबाबत चालू आर्थिक वर्षाचा सात/बारा 8- (होल्डींग) चा उतारा, आधार सलग्न बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत, आधार कार्डची छायांकीत प्रत, शेतकऱ्याकडे जनावरे असल्याबाबत पशुसंवर्धन विभागाचे प्रमाणपत्र (कडबा कटरचा लाभ घेणेसाठी) ओलीताची सोय (विहीर/शेततळे/नाला) असल्याबाबत तलाठी यांचे प्रमाणपत्र (विद्युत पंप संचचा लाभ घेणेसाठी). अधिकृत विद्युत कनेक्शन असल्याबाबत लाईट बिलची छायांकि प्रत अथवा कोटेशन भरलेल्या पावतीची छायांकि प्रत. (विद्युत पंप संचचा लाभ घेणेसाठी) ट्रॅक्टरच्या आर.सी. बुकची छायांकीत प्रत. (दोन ते चार फाळी पल्टी नांगराचा लाभ घेणेसाठी) जातीच्या प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकि छायांकि प्रत. (लाभार्थी शेतकरी मागास वर्गीय असल्यास), दिव्यांग असल्यास प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र, अर्जदार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील असल्यास तहसिलदार यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...