Saturday, July 18, 2020


जिल्हा रुग्णालयाचे प्रस्तावित संकुल
सर्व सुविधायुक्त करण्यावर भर
 - पालकमंत्री अशोक चव्हाण 
नांदेड (जिमाका) दि. 18 :- कोरोनाची परिस्थिती आजच्या घडिला पूर्ण नियंत्रणात जरी असली तरी भविष्यातील स्थितीचा विचार करुन नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जनतेला कशा उपलब्ध करुन देता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यादृष्टिने जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती ऐवजी उभारले जाणारे नवीन जिल्हा रुग्णालय हे अधिकाधिक चांगल्या सुविधांसह लवकर उपलब्ध करुन देण्यावर आमचा भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत बैठक झाली. या बैठकीत जिल्हा रुग्णालयाची नवीन संकुल अधिकाधिक चांगले कसे करता येईल याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली. आजच्या घडिला यातील बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या इतर इमारतीची अत्यंत दयनिय आवस्था झाली आहे. वैद्यकिय सुविधेच्यादृष्टिने त्याऐवजी नव्याने उभारले जाणारे रुग्णालय हे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अधिकाधिक चांगल्या दर्जाचे कसे होईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार थांबावा, त्याची साखळी तुटावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाला संचारबंदीचा निर्णय अत्यावश्यक वाटल्याने त्यांना तसा निर्णय घेतलेला आहे. सर्वांचे यात हित असल्याने जनतेने ही संचारबंदी अधिकाधिक कडक शिस्तीत पाळून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आजवर अतिशय चांगले सहकार्य केले असून यापुढेही कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सर्वजण आपआपली व्यवस्थीत काळजी घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...