रस्त्यांच्या
कामांसाठी नांदेडला 8 हजार 474 कोटीचे पॅकेज
राज्याला
दुष्काळमुक्त करण्यासाठी 40 टक्के सिंचन निर्माण करणार
- केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी
नांदेड, दि. 23 :- विकास साधण्यासाठी प्रत्येक गावाला रस्ते,
वीज, पाणी, रोजगार आवश्यक असते. त्यामुळे केंद्र सरकार मराठवाड्यात रस्ते आणि
सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात करत आहे. नांदेड जिल्ह्याला रस्ते विकासासाठी 8
हजार 474 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न
सोडविण्यासाठी राज्यात 40 टक्के सिंचन निर्माण करण्याचे शासनाचे नियोजन आहे, असे
प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग, नौकानयन व जलसंपदा, नदी विकास आणि
गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांनी केले. श्रीक्षेत्र माहूर येथे
रस्त्याच्या 4 कामांच्या भुमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हसंराज अहिर, राज्याचे कौशल्य
विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप, पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी
पाटील-निलंगेकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, सार्वजनिक बांधकाम व ऊर्जा
राज्यमंत्री मदन येरावार, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, खासदार राजीव सातव, आदिलाबादचे
खा. नागेश गौडा, आमदार प्रदीप नाईक, आ. सुभाष साबणे, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. नागेश
पाटील आष्टीकर, आ. राजीव नजरधने, आ. तानाजी मुटकुले, माजी केंद्रीय मंत्री
सुर्यकांता पाटील, माजी खासदार डी. बी. पाटील, सुभाष वानखेडे, शिवाजी माने, जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, किनवटचे
सहायक जिल्हाधिकारी अजितकुमार, राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता अंशुमाली
श्रीवास्तव, अधीक्षक अभियंता एल. एस. जोशी, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी
अभियंता व्ही. एन. मिठ्ठेवाड, माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर
दोसाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी प्रधानमंत्री
होते आणि मी राज्यात बांधकाम मंत्री होतो, तेंव्हा त्यांनी मला देशातील गावांना
जोडणाऱ्या रस्त्यांची योजना तयार करण्याचे सांगितले त्यामुळे गावाला जोडणाऱ्या
रस्त्याची लोकप्रिय "प्रधानमंत्री ग्राम सडक योजना" तयार करण्यात आली. यामध्ये
6 लाख 50 हजार गावांपैकी 1 लाख 70 हजार गावांना मजबुत रस्त्यांनी जोडण्याचे काम
केले आहे. महाराष्ट्रात 5 हजार 200 कि.मी.चे राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते होते तर
आज 22 हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते आहेत. महाराष्ट्र ही संतांची भुमी
असून येथे पायी दिंडी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. रस्त्यात वारकऱ्यांना अधिक
सुविधा देण्याच्या उद्देशाने रस्ते दुरुस्तीसाठी केंद्र सरकार अनेक पावले उचलत
आहे. त्यामध्ये शेगाव ते पंढरपुर या दिंडी मार्गावर 2 हजार कोटी रुपयांचे रस्ते
सुधारण्याचे काम सुरु आहे. तसेच देवू-आळंदी ते पंढरपुर हा पालखी मार्ग करण्यासाठी
12 हजार कोटी रुपयाची तरतुद करण्यात येत आहे. त्यामध्ये वारकऱ्यांसाठी रस्त्याच्या
बाजुने गवताचे पादचारीपथ नियोजित आहे. यावेळी त्यांनी माहूर ते चंद्रपुर या 200
कि.मी. रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात येईल, अशी घोषणा केली.
शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात 40 टक्के
सिंचन निर्माण करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी नदीजोड प्रकल्पांतर्गत
गंगेचे पाणी कावेरी पर्यंत नेण्यात येणार असल्याचे व या प्रकल्पामध्ये 30 नद्यांना
जोडण्यात येणार असून यासाठी 8 लाख कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार
ठाणे जिल्ह्यातून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून हे गोदावरी नदीत वळविण्यात येईल.
त्यामुळे मराठवाड्यातील सर्व धरणे पुर्ण क्षमतेने भरतील व या भागातील पाण्याचा
प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत राज्यात जे
प्रकल्प पुर्ण झाले आहेत परंतू सिंचनाला कॅनाल बांधलेले नाहीत अशा 26 प्रकल्पांना
मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांना जवळपास 60 हजार कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे.
याशिवाय आणखी 85 नवीन प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
तत्पुर्वी मंत्री
महोदयांच्या हस्ते माहूर येथे रस्त्यांच्या चार कामांचे भुमिपुजन संपन्न झाले.
यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वारंगाफाटा ते महागांव 66.88 कि.मी.
रस्त्याचे चौपदरीकरण, भोकर-किनवट-माहूर-धनोडा जंक्शन 147 कि.मी. रस्त्याची
पुर्नबांधणी व दर्जोन्नती करणे, माहूर बायबापास ते जोडरस्ता सारखणी- माहूर- धनोडा
4.5 कि.मी. रस्त्याची सुधारणा करणे आणि माहूर-रेणुकादेवी-दत्तशिखर-दत्त
मांजरी-पानोळा 7.75 कि.मी. रस्त्याची सुधारणा करणे या कामांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हा नियोजन
मंडळाच्या नाविन्यपुर्ण योजनेतून संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी टप्प्याटप्याने
निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणा केली.
यावेळी मंत्री सर्वश्री संभाजी पाटील- निलंगेकर, बबनराव लोणीकर,
राज्यमंत्री मदन येरावार, खासदार राजीव सातव, आमदार प्रदीप नाईक यांनी मनोगत
व्यक्त केले. यावेळी माहूर, किनवट, महागाव, यवतमाळ परिसरातील नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment