Friday, January 28, 2022

 कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना

सानुग्रह सहाय्य नामंजूर झाल्यास अपील करण्याची संधी 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- ‘कोविड-19’ या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य दिल्या जात आहे. ज्या अर्जदाराच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसे जमा झाले नाहीत अशा अर्जदारांनी त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती बघण्यासाठी https://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगीन करून अर्जाची सद्यस्थिती तपासावी. यात नामंजूर झाल्याचे दिसत असेल तर Click here to appeal या लिंक वर क्लिक करून तक्रार निवारण समितीकडे अपील करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

कोविड-19’ या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय क्र. सीएलएस/२०२१/प्र.क्र.२५४/म-३, दि. 26.11.2021 निर्गमीत केलेला आहे. 

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत 3 हजार 290 लोकांनी अर्ज केले आहेत त्यापैकी 1 हजार 932 लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले आहेत. तर 622 लोकांचे अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे नामंजूर केले आहेत. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. न्यायिक 2021/प्र.क्र. 488/आरोग्य-05 दिनांक 13 ऑक्टोबर 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेवून अंतिम निर्णय देण्याचे अधिकार आहेत.

ज्या अर्जदाराच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत अशा अर्जदारांनी त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती बघण्यासाठी https://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगीन करून अर्जाची सद्यस्थिती तपासावी जर सद्यस्थितीमध्ये अर्ज नामंजूर झाल्याचे दिसत असेल तर Click here to appeal या लिंक वर क्लिक करून तक्रार निवारण समितीकडे अपील करावे. या लिंकवर क्लिक केल्यावर स्क्रीनवर Appealed to GRC असा संदेश दिसेल याचा अर्थ आपण तक्रार निवारण समितीकडे अपील केले आहे.

यानंतर जिल्हास्तर, महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारण समिती मार्फत आपल्याला याविषयाशी निगडीत सर्व मुळ कागदपत्रे घेऊन संबंधित कार्यालयात अर्जदारास फोन करून अथवा मोबाईलवर मेसेजद्वारे बोलावले जाईल. त्याठिकाणी अर्ज कशामुळे नामंजूर झालेला आहे ते तपासले जाईल व अर्ज मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तपासल्यानंतर सर्व बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर आपला अर्ज मंजूर करून सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी पुढे पाठवला जाईल. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. ज्या अर्जदारांनी तक्रार निवारण समितीकडे अपील केले आहे त्यांना लवकरच तक्रार निवारण समिती समोर बोलवले जाईल व त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल याची संबंधितानी नोंद घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...