विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी
महाडीबीटी पोर्टल
- अनिल आलूरकर
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सन
2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व प्रकारची शिष्यवृत्ती ऑनलाईन मिळण्यासाठी
महाराष्ट्र शासनातर्फे महाडीबीटी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. यासाठी
लाभार्थी विद्यार्थ्यांची महाडीबीटीच्या संकेतस्थळावर नोंदणी केली जात आहे.
यामुळे मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत व पारदर्शकपणे त्यांच्यापर्यंत
थेट बँकेमार्फत पोहोचणार आहे. या योजनेविषयीची ही माहिती.
|
सन 2018-19 पासून
महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित
करण्यात आले आहे. महाडीबीटी हे या संकेतस्थळाचे नाव असून https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांचेमार्फत नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती / शिक्षण फी परिक्षा फी /
विद्यावेतने / निर्वाह भत्ता वितरीत करावयाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती, राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रतीपुर्ती
योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इयत्ता 11 वी, 12 वी) तसेच व्यावसायीक
अभ्यासक्रमामधून शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन या
योजनांचा समावेश या संकेतस्थळामध्ये करण्यात आला आहे.
या महाडीबीटी
पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांना देय होणारे शिष्यवृत्ती, निर्वाह
भत्ता, शिक्षण फी, परीक्षा फी, इतर अनुज्ञेय फी त्यांच्या आधार संलग्न बॅंक
खात्यावर थेट वितरीत केला जाणार आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांना आपले आधार कार्ड
क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्नीत करुन घ्यावे लागणार आहेत.
महाडीबीटीची
वैशिष्ट्ये
लाभार्थी
कोणत्याही वेळी कुठुनही महाडीबीटीच्या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात. लाभार्थी
त्यांच्या स्वत:च्या अर्जाची स्थिती युझर आयडीने पाहू शकतात. सुलभ पडताळणी आणि
पारदर्शकता यासाठी मार्कशीटस, जात प्रमाणपत्र इ. अपलोड करु शकतात. महाडीबीटी
प्रक्रियाच्या विविध स्तरांवर विद्यार्थी आणि संस्थांना एसएमएस आणि ई-मेल अलर्टची
तरतूद. विद्यार्थ्यांच्या बॅंकेच्या खात्यात शिष्यवृत्तीचे प्रत्यक्ष वितरण. सुलभ
शिष्यवृत्ती मंजुरीची प्रक्रिया, भुमिका आधारित युनिक लॉग इन आयडी आणि पासवर्ड
सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. विभाग आणि राज्य प्राधिकरण
यांच्याद्वारे शिष्यवृत्तीच्या देखरेखीची पारदर्शकता ठेवली जात आहे. कोणत्याही
स्वरुपाच्या तांत्रिक बाबींची अडचण उदभवल्यास संकेतस्थळावरील 022-49150800 या टोल
फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यास कळविले आहे. पात्रतेचे निकष विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
अर्जासाठी
मार्गदर्शक तत्वे
वरील योजनांचे
ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर
देण्यात आलेल्या युजर मॅन्युअल / एफ.ए.क्यु.चा वापर करुन ऑनलाईन पद्धतीने व पोर्टलवर
दिलेल्या सुचनांचे पालन करुन अर्ज भरण्याच्या विहित अंतिम तारखेपर्यंत न थांबता
संपूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरुन घ्यावा. अर्जदार शिष्यवृत्तीसाठी निर्धारीत
केलेल्या सर्व अटी लागू आणि पूर्ण करण्यासाठी पात्र आहे, याची खात्री करण्याची संपूर्ण
जबाबदारी अर्जदाराची असते. जर अर्जदाराची पात्रता कोणत्याही टप्प्यावर अवैध आढळली
तर त्याची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येते. अर्जदाराने अंतिमत: अर्ज जमा
करण्यापुर्वी तपासावे की त्याच्या / तिच्याद्वारे प्रदान केलेले सर्व तपशील योग्य
आहेत कारण त्यानंतर माहिती संपादित करण्यासाठी कोणतीही तरतूद प्रणालीमध्ये नसेल.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची पद्धत केवळ ऑनलाईनच असेल. "*" चिन्हासह जे रकाने चिन्हांकित आहेत ते भरणे अनिवार्य असेल. ज्या
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक हा मोबाईल क्रमांकाशी संलग्नीत नाही त्यांनी
त्वरीत जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न
करुन घ्यावेत.
सर्व संस्थांच्या व
महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या योजनांची माहिती संस्थेच्या दर्शनी भागातील
सुचना फलकावर कायमस्वरुपी लावावी व पात्र विद्यार्थ्यांना वरील योजनांचे अर्ज
ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी सहकार्य करावे व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरलेले
अर्जांची पुढील कार्यवाहीसाठी ऑनलाईन पद्धतीने छाननी करावी. अशा सुचना देण्यात
आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या
आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबतची सुचना डीबीटी
पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयाला दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ,
शैक्षणिक संस्था, महाविद्यालय वा तंत्रनिकेतन यांनी कोणत्याही अनुसूचित जातीच्या
विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेवू नये. तसेच
कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची
योग्य ती दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल. सर्व
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती
मिळण्यासाठी 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत
ऑनलाईन अर्ज भरावेत असे जाहीर आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले
आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन घ्यावयाची
जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गतीमानता
व पारदर्शकतेच्या दिशेने शासनाचे एक महत्वकांक्षी पाउल म्हणून याकडे पाहिले जात
आहे.
0000
No comments:
Post a Comment