Friday, June 30, 2017

सौर ऊर्जेच्या माध्यमातुन सुरळीत, सुरक्षीत व शाश्वत
वीज पुरवठा करण्यात येईल - ऊर्जा मंत्री बावनकुळे
वीज ग्राहकांशी जनता दरबारात साधला मुक्त संवाद 
नांदेड दि. 30 :- राज्यातील जनतेला सौर ऊर्जेच्या माध्यमातुन सुरळीत, सुरक्षीत आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली.
नांदेड येथील कुसुम सभागृहात महावितरणच्यावतीने वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरणासाठी आयोजित जनता दरबारात ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे हे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार सुभाष साबणे, आमदार डॉ. तुषार राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रीमती शोभाताई वाघमारे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता रामदास कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.  
यावेळी ग्राहकांनी रोहित्र दुरुस्ती, वाकलेले खांब, लोंबकाळणाऱ्या तारा, प्रलंबित शेतीपंप जोडण्या, घरगुती व वाणिज्य वर्गवारीतील प्रलंबित जोडण्या, चुकीची देयके, वीज मिटर वाचक एजन्सी विरुद्ध तक्रारीसह शेतकऱ्यांना नियम बाह्य रोहित्र वाहतुकीसाठी दयावा लागणारा खर्च, मोबाईल बंद ठेवणे आदींबाबत 96 तक्रारी मांडण्यात आल्या.
या सर्व तक्रारींची दखल घेऊन ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, सन 2030 पर्यंत सर्वांना शाश्वत वीज देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. त्याचा आराखडा आणि नियोजन करण्यात आले असुन सौर ऊर्जा विकास आणि वापर वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारीचा अधिकाऱ्यांनी तात्काळ निपटारा करावा. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ने-आण करण्यासाठी पैसे देऊ नयेत. शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असतील तर संबंधीत अभियंतावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश त्यांनी दिले. वीज बिलासंबंधी आलेल्या तक्रारीवर बोलतांना श्री. बानवकुळे म्हणाले की, महावितरणकडून लवकरच नवीन मोबाईल ॲप सुरु करण्यात येत आहे. त्याद्वारे वीज देयके नागरिकांना भरता येतील. तसेच यामाध्यमातुन वीज देयकेही दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 3 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये विद्युत व्यवस्थापक नेमण्याच्या सुचना त्यांनी केल्या. रोहित्रे दुरुस्ती क्षेत्रातील मक्तेदारी संपविण्यासाठी अभियांत्रिकी पदवी असणाऱ्या बेरोजगार अभियंत्यांना 15 लाखापर्यंत तर अभियांत्रिका पदविका असणाऱ्यांना साडेसात लाखापर्यंतची कामे देण्यात येतील. त्यासाठी मेळावे आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. ट्रान्सफार्मरला मीटर बसविल्याने वीज चोरीला आळा बसू शकेल, त्यादृष्टिनेही प्रयत्न केले जात आहेत. शाखा अभियंता, उपअभियंता यांनी मुख्यालय ठिकाणी राहिले पाहिजे व ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली पाहिजे. सेवा बजावण्यास दिरंगाई केल्याचे आढळल्यास दोषीवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.  
प्रारंभी मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी मागील एक महिन्यात 34 ठिकाणी ग्राहक तक्रार मेळावे घेण्यात आले. 433 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 320 तक्रारीचा निपटारा करण्यात आल्या. उर्वरीत तक्रारी निवारण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
0000000

( छाया : विजय होकर्णे, नांदेड )
वीज ग्राहकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन
त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे  
- ऊर्जा मंत्री बावनकुळे
नांदेड दि. 30 :- वीज ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी समजावून घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांनी त्यांचे तात्काळ निराकरण केले पाहिजे , असे निर्देश राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिले.   
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या समवेत महावितरण व महापारेषणचे अधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार सुभाष साबणे, आमदार डॉ. तुषार राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रीमती शोभाताई वाघमारे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता रामदास कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.  
वीज ग्राहकांशी सातत्याने संवाद साधला तर तक्रारी कमी होवून त्यांचे प्रश्न सुटले जातात. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या परिक्षेत्रात संवाद मेळावे घ्यावेत. त्यांच्या अडीअडचणी प्रश्न समजून घेवून ते तात्काळ सोडवावीत. शाखा अभियंता यांनी प्रत्येक घराशी मुक्त संवाद साधला पाहिजे, असेही ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
नांदेड शहरासाठी 41 कोटीचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून विजेची भुमीगत केबल टाकली जाणार आहे. त्याचबरोबर वीज अपघाताचे ठिकाणे शोधुन तेथील लोबंकाळणाऱ्या तारा, रोहित्रे हटवुन ग्राहकांना सुरक्षीत व सुरळीत वीज सेवा देण्यासंदर्भातही अधिकाऱ्यांना त्यांनी सुचित केले.
यावेळी आमदार सुभाष साबणे व डॉ. तुषार राठोड यांनी आपल्या भागातील विजेचे प्रश्न मांडून त्याबाबत त्वरीत कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली.

0000000
नांदेड, उस्मानाबाद, लातूरच्या सर्व शाळा-पाणीपुरवठा योजना
सौर ऊर्जेवर आणणार - ऊर्जा मंत्री बावनकुळे
 16 उपकेंद्रांचे भुमिपुजन संपन्न
नांदेड दि. 30 :-  उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि नळ पाणी पुरवठा योजनांना सौर ऊर्जाने जोडण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.  
नांदेड परिमंडळांतर्गत जिल्हयातील पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत मंजूर असलेल्या 12 व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या चार 33 / 11 केव्ही विद्युत उपकेंद्राचे भुमिपुजन ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते नांदेड येथील कुसुम सभागृहात आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार सर्वश्री प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, सुभाष साबणे, डॉ. तुषार राठोड, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रीमती शोभाताई वाघमारे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता रामदास कांबळे आदी अधिकारी मान्यवर उपस्थित होते.
ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, सन 2030 पर्यंत राज्याला शाश्वत वीज देण्याची राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची सूचना लक्षात घेता 4 हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कामे सुरु आहेत. वीज विकासात मागे पडलेल्या नांदेड जिल्ह्यासाठी 360 कोटीची पारेषणची कामे केली. जिल्हयासाठी 165 कोटीच्या योजनेचे भुमिपूजन  केवळ झाले नाही तर त्यासाठी निधीही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या वीज बील थकबाकीमुळे त्यांची वीज खंडीत करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी आपल्याकडील थकबाकीची मुळ रक्कम भरावी. तो पैसा त्यांच्या भागात वीज विकासासाठीच वापरला जाईल. आगामी काळात वाहनेही विजेवर चालणार आहेत. त्यावेळी विजेचे दरही कमी राहतील. वर्षाच्या 328 दिवस सुर्याची ऊर्जा उपलब्ध आहे. ही ऊर्जा वापरुन सौर ऊर्जेच्या माध्यमातून नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्हा परिषदेच्या शाळा व नळ पाणीपुरवठा योजनांना सौर ऊर्जावर आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात सौर ऊर्जेची वीज देणार. त्यासाठी 500 ते 1 हजार शेतकऱ्यांचा गट तयार करुन त्यांच्याच शेतात वीज निर्माण करुन तेथेच वीज देणार.  नांदेडसाठी 87 कोटी व ग्रामीणसाठी 77 कोटी खर्च केले जात आहेत. या निधीतून होणारी कामे ही चांगल्या दर्जाची व्हावी , असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार सर्वश्री सुभाष साबणे, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील यांचीही समोयोचित भाषणे झाली.
यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत हाळदा ता.कंधार, कासारखेडा, ता.अर्धापूर, आमराबाद, ता.मुखेड, पांडूरणा, ता.भोकर, पोटा, ता.हिमायतनगर, माळबोरगाव, ता.किनवट, घोगरी, ता.हदगाव, ढोल उमरी, ता.उमरी, चांडोळा, ता. धर्माबाद, जांब, ता.मुखेड, येताळा, ता.धर्माबाद, लोहगाव, ता.बिलोली. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत तरोडा नाका, नांदेड, लोहा, कंधार, बिलोली. या 16 कामांचे भुमिपूजन एकाचवेळी ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते सभागृहात करण्यात आले.
प्रारंभी नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास कांबळे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, नागरीक, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
00000
  
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दिपक केसरकर यांचा दौरा
नांदेड दि. 30 :- राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 2 जुलै 2017 रोजी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. हुजुर साहिब रेल्वे स्टेशन नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह येथुन मोटारीने पोलीस महानिरीक्षक कार्यालय नांदेड परिक्षेत्रकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. पोलीस महानिरीक्षक कार्यालय येथे आगमन व नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. सोईनुसार श्री हुजुर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे दर्शन त्यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सायंकाळी 5 वा. आमदार हेमंत पाटील यांनी आयोजित केलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सवाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड. सोईनुसार नांदेड येथुन मोटारीने हैद्राबादकडे प्रयाण करतील.

0000000
वस्तू व सेवाकर कायदा आजपासून लागू
 अडचणी सोडविण्यासाठी सुविधा केंद्राची उभारणी
नांदेड दि. 30 :- देशात वस्तू व सेवाकर कायदा आज 1 जुलै 2017 पासून लागू होत आहे. उद्योजक व व्यापाऱ्यांसाठी ही कर पद्धत सोपी असून त्यातील तरतुदींमुळे वस्तू व सेवांच्या किंमतीत घट होऊन ग्राहकांना त्याचा फायदा होईल. व्यापाऱ्यांनी नोंदणी विवरणपत्र दाखल करणे आदी बाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वस्तू व सेवाकर विभागाच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत.  1 जुलैपासून  "विक्रीकर भवन" या कार्यालयाचे नाव वस्तू व सेवाकर भवन असे बदलण्यात येत आहे. नवीन वस्तू व सेवाकर कायदाची व्यापारी, नागरिक व इतर सर्वांनी स्वागत करावे, असे आवाहन विक्रीकर सहआयुक्त (व्हॅटप्रशा ) एम. एम. कोकणे, विक्रीकर उपायुक्त सौ. रंजना देशमुख यांनी केले आहे.
देशातील अप्रत्यक्ष करप्रणालीमध्ये अमुलाग्र बदल करणारी ही वस्तू व सेवा कर प्रणाली आहे. ही करप्रणाली राष्ट्रीय सकल उत्पन्नात वृद्धी करणारी आहे. संपूर्ण देशात अप्रत्यक्ष कराची एकच पारदर्शक पद्धत, हा वस्तू व सेवाकर प्रणालीचा मुळ गाभा आहे. करदात्यांनी या करप्रणालीबाबत दडपण घेऊ नये. ही करप्रणाली लागू करताना काही कायदेशीर तरतुदी, प्रक्रिया यामध्ये अडचणी असतील तर त्या सोडविल्या जातील. कापड उद्योगातील व्यापाऱ्याप्रमाणे जे करदाते नव्यानेच कर भरण्यास पात्र होत आहेत त्यांना 30 जुलै 2017 पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ आहे. शासनाने सर्व करदात्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. व्यापारी, उद्योग संघटना आदीनी सभासदाच्या अडचणी एकत्रित करून वस्तू व सेवाकर विभागाकडे अथवा शासनाकडे सादर कराव्यात. त्याबाबत विचार विनिमय करुन कार्यवाही केली जाईल. ज्या करदात्यांना नव्याने नोंदणीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांनी वस्तू व सेवाकर विभागातील जीएसटी सुविधा केंद्र तसेच शासनमान्य ई-सेवा केंद्रातून मदत घेऊन सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येईल. वस्तू व सेवाकर कायद्याखाली सुरुवातीचे दोन महिने GSTR 3 B या नमुन्यात विवरणपत्र तयार करण्यासाठीची युटीलीटी वस्तू व सेवाकर विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अप्रत्यक्ष करप्रणाली मधील हा सर्वात मोठा व सर्व समावेशक बदल आहे. जगभरात अंदाजे 165 देशात ही कर प्रणाली राबवली जाते.  या कर पद्धतीबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्याबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वस्तू व सेवाकर विभागातील ( पुर्वीचा विक्रीकर विभाग ) अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात जवळपास 425 ठिकाणी कार्यशाळा घेतल्या आहेत.  

000000
शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना
बँकांनी अर्थसहाय्य करावे - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 30 :- स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना बँकांनी पुढे येवून प्राधान्यक्रमांने अर्थसहाय्य दिले पाहिजे, असा सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या. बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात काल (ता. 29) बैठक संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक विजय उशीर, नाबार्डचे व्यवस्थापक राजेश धुर्वे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. पी. घुले, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक एम. जी. केसराळीकर, आरबीआयचे सहायक व्यवस्थापक संजय बुऱ्हाडे, तसेच विविध बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की,  बेरोजगारी दुर करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी बँकांनी सहकार्य करावे. महिला बचतगटाच्या व्यवसायातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. महिला बचतगटाच्या व्यवसायांना कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांनी सकारात्मक भुमिका घेवून अर्थ सहाय्य मंजूर करावे. पशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी बँकांनी पुढे आले पाहिजे. चांगल्या सेवेमुळे बँकांनाही मोठा लाभ मिळतो. बचतगटांना सन्मानपुर्वक वागणुक देऊन बँकांनी त्यांचे बचत खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले.  
यावेळी विविध बँकेतील कर्ज प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. बँकांनी त्यांच्या सेवा व ग्रामीण भागातील अडचणींबाबत माहिती दिली.

000000
"न्याय आपल्या दारी" योजनेतर्गत
जिल्ह्यात फिरते लोकन्यायालयाचे आयोजन
नांदेड दि. 30 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे यांच्या मार्गदर्शनानुसार "न्याय आपल्या दारी" या योजनेतर्गत नांदेड जिल्हयात 5 ते 30 जुलै 2017 या दरम्यान फिरते लोकन्यायालय  फिरते कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या न्यायरथाची सुरवात जिल्हा न्यायालय नांदेड येथे 5 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वा. होणार अस या उद्घाटसोहळयानंतर हे फिरते न्यायालय पुढे मार्गस्थ होणार आहे.
यावेळी आपसातील वाद असलेली दाखल पुर्व प्रकरणे तसेच प्रलंबित असलेली दिवाणी तडजोडपात्र असे फौजदारी प्रकरणांमध्ये आपसात तडजोड करून कायमची निकाली काढणार आहेत. याचा एक मुख्य फायदा म्हणजे निकाली निघालेल्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजुंच्या पक्षकरांना कुठल्याही प्रकारचे अप करता येत नाही. सर्व पक्षकार बांधवांनआपले आपसातील वाद कायमचे मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयामध्ये जावून आपले प्रकरण फिरत्या लोकन्यायालयामध्ये ठेवण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे, सचिव डी. टी. वसावे तसेच सर्व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सर्व न्यायाधीश यांनी केले आहे.
            या फिरत्या न्याय रथामध्ये न्यायाधिश म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. टी. नरवाडे पाटील हे पॅनल प्रमुख म्हणून न्याय निवाडा करणार आहेत. त्यांना पॅनल सदस्य म्हणून अॅड. प्रविण अयाचित संबंधित तालुक्यातील पॅनलवरील  वक काम पाहणार आहेत. या फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन 5 जुलै 2017 पासून होणार असून अनुक्रमे माळेगाव (यात्रा) ता. लोहा, कलंबर ता.लोहा , पानभोसी ता. कंधार, सावरगाव (पीर) ता. मुखेड, बाऱ्हाळी ता. मुखेड, वन्नाळी ता. देगलूर, करडखेड ता. देगलूर, कहाळा ता. नायगाव, होटाळा ता. नायगाव, शंकरनगर ता. बिलोली, कासराळी ता. बिलोली, सिरजखोड ता. धर्माबाद, मौ.थेरबन ता.भोकर, मौ.सावरगाव ता. भोकर, कांडली ता. भोकर, घोटी ता. किनवट, मौ. सिंधी ता.उमरी, गुंडेगाव ता.नांदेड अशाप्रकारे नांदेड जिल्हयातील या गावांमध्ये फिरत्या लोकन्यायालयाचा रथ येणार आहे नांदेड येथील जिल्हा कारागृह वर्ग-2 येथे 30 जुलै 2017 रोजी या फिरत्या रथाची सांगता होणार आहे.
आपसातील वाद कायमचे मिटविण्याची संधी आपल्या दारी आली आहे म्हणून या योजनेला "न्याय आपल्या दारी" असे संबोधले आहे. सर्वांनी या फिरत्या लोकन्यायालयाचा, फिरत्या कायदेविषयक शिबीराचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांनी रु घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. हे फिरते लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी सर्व विधिज्ञ, संबंधित पक्षकार यांचे सहकार्य लाभाणार आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...