Monday, January 2, 2017

नागरिकांशी सुसंवाद साधा, शेतकरी गटांना
मार्गदर्शन करा, आधार नोंदणीसाठी समन्वय साधा
लोकशाही दिन संपन्न, समन्वय समिती बैठकीत जिल्हाधिकारी काकाणी यांचे निर्देश

नांदेड, दि. 2 :- आपले सरकार या पोर्टलवर सादर होणाऱ्या तक्रारी, सुचनांची गांभीर्याने दखल घ्या. नागरिकांच्या तक्रारी, सुचनांवर कार्यवाहीसाठी तत्पर रहा. लोकशाही दिनात येणाऱ्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करा, नागरिकांना आपले सरकारच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री तसेच मंत्रालयस्तरावर पोहचण्याचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्याअनुषंगाने नागरिकांशी सुसंवाद साधा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या  बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील बचत भवन येथे लोकशाही दिन संपन्न झाला.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपवनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. टी. एस. मोटे, अधीक्षक भुमि अभिलेख वसंत निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलंवडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उ.मु.का. दिपक चाटे, कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, अविनाश शाहू, डॅा. उत्तम इंगळे,  कृषि विकास अधिकारी पंडीतराव मोरे आदींसह महावितरण, बँक, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीत प्रामुख्याने आगामी वृक्षलागवड मोहिम, जिल्ह्यातील आधार नोंदणी, शेतकऱ्यांसाठी शेतकरी गट, शेतकऱ्यांसाठी रुपे कार्डची उपलब्धता यांसह चर्चेत आलेल्या विविध विषयांवर जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देश दिले. वृक्ष लागवडीची मोहिम यंदाही व्यापक राहणार आहे. त्यासाठी कार्यालयांनी गेल्यावर्षीच्या वृक्ष लागवडीचा वस्तुस्थिती अहवाल, लागवड, जगलेल्या रोपट्यांची स्थिती याबाबतचा अहवाल द्यावा. त्याशिवाय यावर्षी लागवड करता येणाऱ्या रोपांची, त्यांच्या प्रजातींची, जागा तसेच पाणी आदी उपलब्ध बाबींचा आढावा घेऊन, माहिती तातडीने द्यावी. जेणेकरून वृक्षलागवडीसाठी वेळेत आणि काटेकोर नियोजन करता येईल.
जिल्ह्यातील बालकांच्या आधार क्रमांक नोंदणीसाठी शिक्षण, महिला व बालविकास आणि आधार नोंदणी यंत्रणा यांनी समन्वयाने नियोजन करावे. बालकांची आधार नोंदणी न झाल्यास, भविष्यात त्यांना देय असलेल्या योजनांतील लाभार्थी अनुदान थेट खात्यांवर जमा करण्यात अडचणी उद्भवू शकतात. याबाबत पालकांनाही जाणीव करून द्यावी. शिधापत्रिकाही आधारशी संलग्न करण्याची मोहिम वेगाने सुरु आहे. त्यासाठीही बालकांची आधार नोंदणी अत्यावश्यक असल्याची माहिती पोहचविण्यात यावी. अंगणवाडी आणि शाळा यांमधील बालकांच्या आधार नोंदणीसाठी संबंधित यंत्रणांनी एकत्रितरित्या समन्वयाने कार्यक्रम आखावा असेही निर्देशित करण्यात आले.
शेतकऱ्यांकडील किसान क्रेडीट कार्डचे रुपांतर रुपेमध्ये करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया वेगाने आणि शेतकऱ्यांत पोहचून पुर्ण होईल, असे नियोजन करावे. शेतकऱ्यांचे शेतकरी गट तयार करावेत. त्यांच्या शेतीमाल कंपन्या तसेच प्रक्रिया उद्योग, खत विक्रीचे परवाने यासाठीही गटांना मार्गदर्शन करावे. प्रत्येक गटाला कृषि पदवीधारकाला संलग्न करण्यात यावे. समन्वय समितीच्या बैठकीपुर्वी जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न झाला. यामध्ये उपस्थित नागरिकांच्या अर्ज, निवेदन यांच्यावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. काही प्रकरणात चर्चाही केली, संबंधित यंत्रणांना कार्यवाहीबाबत सूचनाही केल्या.

*****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...