Thursday, May 15, 2025

 वृत्त क्रमांक 497

डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी 

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार यांचे आवाहन

नांदेड दि. 15 मे :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रूपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्याची करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

 नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यु दिन शुक्रवार 16 मे 2025रोजी साजरा होत आहे. 2025 या वर्षीचे  घोषवाक्य  ‘तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंग्युला हरविण्याचे उपाय करा ’ असे आहे. नागरिकांमध्ये जागरुकता आणून डासांपासून होणाऱ्या डेंग्यू आजारास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. सिंमेट टाक्या, रांजण, प्लास्टिक रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंटया, घरातील शोभेच्या कुंडया, निरउपयोगी वस्तू, टायर्स व कुलर ईत्यादी. जास्त दिवस साठलेल्या ठिकाणी एडिस इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळी दिडशे ते दोनशे अंडी घालते व यातून या डासाचा मोठा फैलाव होतो.

डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्ततपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील तीन वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. ( घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण). सन 2022- (744) 93 (निरंक). सन  2023 -(1490) 292 (निरंक). सन  2024 -(1302) 297 (निरंक)  तर  एप्रिल 2025 अखेर- (72) 6 (निरंक).

भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरुन झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑइल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.

नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 496

मेरा युवा भारत अंतर्गत युवकांना 

नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन

                                                                                                                                                                        नांदेड दि. 15 मे : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाचे देशभरातील युवकांना माय भारत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी सक्रियपणे एकत्रित करत आहे. हे राष्ट्रव्यापी आवाहन युवकांना, नागरिकांना राष्ट्रीय कार्यात, विशेषतः आपत्कालीन परिस्थिती आणि संकटाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम करण्याच्या एकत्रित प्रयत्नांचा एकभाग आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती आणि इतर अनपेक्षित परिस्थितीत नागरी प्रशासनाला पूरक ठरू शकणारी सुप्रशिक्षित, प्रतिसाद देणारी आणि लवचिक स्वयंसेवक दल तयार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

                                                                                                                                                                        सध्याची परिस्थिती आणि उदयोन्मुख सुरक्षा चिंता लक्षात घेता, एक मजबूत, समुदाय-आधारित प्रतिसाद यंत्रणा स्थापन करण्याची तातडीची आणि वाढती गरज आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक विविध सेवांद्वारे स्थानिक अधिकाऱ्यांना पाठिंबा देऊन यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामध्ये बचाव आणि निर्वासन कार्ये, प्रथमोपचार आणि आपत्कालीन काळजी, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती प्रतिसाद आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये मदत करणे समाविष्ट आहे. सज्ज आणि प्रशिक्षित नागरी दलाचे महत्त्व पूर्वी पेक्षा जास्त आहे आणि मायभारत या राष्ट्रीय मोहिमेत योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.

                                                                                                                                                                        म्हणूनच, मायभारत त्यांच्या युवा स्वयंसेवकांच्या गतिमान नेटवर्कला आणि इतर सर्व उत्साही युवकांना, नागरिकांना पुढे येऊन माय भारत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करते. विद्यमान माय भारत स्वयंसेवक आणि या पदावर देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या नवीन व्यक्तींना ही सामील होण्यास स्वागत आहे. हा उपक्रम केवळ तरुणांमध्ये नागरी जबाबदारी आणि शिस्तीची तीव्र भावना निर्माण करत नाही तर त्यांना व्यावहारिक जीवनरक्षक कौशल्ये आणि गंभीर परिस्थितीत जलदगतीने कार्य करण्यासाठी प्रशिक्षण देखील देतो.

                                                                                                                                                                        नोंदणी प्रक्रिया सोपी असून अधिकृत माय भारत पोर्टलद्वारे https://mybharat.gov.in उपलब्ध आहे. या राष्ट्रीय कार्यासाठी सर्व इच्छुक युवकांना/जनतेला एकत्रित करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. तसेच अधिक माहितीसाठी चंदा रावलकर, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत-नांदेड (भ्रमणध्वनी क्र. 9422859073) यावर संपर्क करण्याचे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना

Wednesday, May 14, 2025

वृत्त क्रमांक 495 

महाराष्ट्र विधानपरिषदेचे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा दौरा

 

नांदेड दि. 14 मे :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या शनिवार 17 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 17 मे 2025 रोजी परभणी येथून दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. शिवसेना महिला आघाडी पदाधिकऱ्यांशी संवाद व लाडक्या बहिणींशी संवाद. स्थळ शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद. दुपारी 4.30 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.15 वा. स्टार एअर विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्रमांक 494

दहावी परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती   

नांदेड दि. 14 मे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेली दहावी व बारावी परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.

या परीक्षेचा निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशक सेवा सुरु ठेवण्यात येत आहे.

याबाबत समुपदेशकांची भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहे.

9011302997, 8263876896, 8767753069, 7387400970, 9960644411, 7208775115, 8169202214, 9834084593, 8329230022, 9552982115. हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुक्ल आवश्यक ते समुपदेशन करतील याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 493

कृषि विभाग व पाणी फाऊंडेशन यांच्यामार्फत डिजीटल शेतीशाळेचे आयोजन

नांदेड, दि. 14 मे :- पानी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रामध्ये कृषी वि‌द्यापीठाच्या सहकार्याने डिजिटल शेतीशाळा राबवित असते. सदर डिजिटल शेतीशाळेचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे पानी फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमातून व शेतकऱ्यांच्या अनुभवातून दिसून येत आहे. कृषि विभाग व पानी फाउंडेशन यांचेमार्फत सन 2025-26 करिता डिजिटल शेतीशाळा राबविणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. या डिजिटल शेतीशाळेचे माहे मे 2025 चे वेळापत्रक प्राप्त झाले आहे. 

गुरुवार 15 मे 2025 पासून शेतीशाळा सुरु होत आहेत. 15 मे रोजी आंबा व पेरू, 19 मे रोजी बाजरी व सोयाबीन, 20 मे खरीप ज्वारी व कापुस, 21 मे भात, मका व पशुधन, 22 मे घेवडा (राजमा) व संत्रा, मोसंबी तसेच कागदी लिंबू, 23 मे तुर, मुग व उडीद 24 मे रोजी भाजीपाला या पिकांच्या शेतीशाळाचे आयोजन प्रत्येक गावामध्ये ऑनलाईन करण्यात आले आहे. डिजिटल शेतीशाळा पाहण्यासाठी संगणक, लॅपटॉप, मोबाईल, प्रोजेक्टर इ. साधनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.  या डिजिटल शेतीशाळासाठी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, कृषिताई, ग्राम कृषि विकास समिती यांचे सदस्य,स्वयंसेवक यांची उपस्थिती राहणार आहे.

अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या तांत्रिक शंकांचे निरसन करणार आहेत. डिजिटल शेतीशाळेसाठी शेतकऱ्यांना स्वतः झुम लिंकवर किंवा पानी फाउंडेशन युटयुब चॅनलवर लाईव्ह कार्यक्रमास जॉईन होता येईल. शेतकऱ्यांना येणाऱ्या शंका झुमच्या चॉट बॉक्स किंवा युटयुबच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहावे. या डिजिटल शेतीशाळेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा आधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

Tuesday, May 13, 2025

 मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना





बुद्ध पोर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा… 12.5.2025


Sunday, May 11, 2025

 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!


वृत्त क्रमांक 492

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट
शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही
नांदेड दि.११ मे :- देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
श्री. पवार म्हणाले की, भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल. त्यांच्या पत्नी व भावाला नोकरी दिली जाईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्यासाठी शासनाच्यावतीने तरतूद करण्यात येईल.

त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी सूचना करून श्री. पवार यांनी सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
0000










वृत्त क्रमांक 491

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन

नांदेड दि. ११ मे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी उद्योग,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदींची उपस्थिती होती.
०००००





Saturday, May 10, 2025

वृत्त क्रमांक 490 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा  

नांदेड, दि. 10 मे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार 11 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

रविवार 11 मे 2025 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 9.10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने प्रयाण. सकाळी 9.45 वा. माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या निवासस्थानी इंदिरा निवास काळेश्वर रोड विष्णुपूरी येथे आगमन व राखीव. मोटारीने सकाळी 11.15 वा. कै. मधुकरराव घाटे सहकारी सुतगिरणी मुखेड येथे आगमन व राखीव. मोटारीने दुपारी 12 वा. मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी (बाऱ्हाळी) येथे आगमन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.15 वा. देगलूर येथे शहीद जवान कै. सचिन यादवराव वनंजे यांच्या घरी सात्वंनपर भेट. नंतर व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या निवासस्थानी देगलूर येथे राखीव. सायं मोटारीने नांदेडकडे  प्रयाण. सायं. 5.40 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व सायं. 5.45 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

 "जोडलेले रहा, सुरक्षित रहा !

आपत्कालीन परिस्थितीत विश्वासार्ह संप्रेषण सेवा अत्यंत महत्त्वाची असते. मोबाइल अलर्टपासून सॅटेलाइट फोनपर्यंत, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून चला, आपण प्रतिसाद देऊया आणि समुदायांना सतत माहिती देत राहूया!"

"जुड़े रहें, सुरक्षित रहें! आपातकालीन स्थिति में विश्वसनीय संचार सेवाएं महत्वपूर्ण हैं। मोबाइल अलर्ट से लेकर सैटेलाइट फोन तक, आइए प्रौद्योगिकी का उपयोग करके प्रभावी ढंग से प्रतिक्रिया दें और समुदायों को सूचित रखें! #आपातकालीनसंचार


 महात्मा फुले जनआरोग्य योजना

वृत्त क्रमांक 489

विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महावितरणच्या कामांचा आढावा

मान्सूनपुर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश

नांदेड, दि. 10 मे :- सध्या नांदेड जिल्ह्याचा पारा 43 अंशाच्या जवळपास असून हवेत प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांची विजेची मागणी वाढली असून पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे वारंवार विज पुरवठा बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत महावितरण विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करुन विद्युत पुरवठा सुरळीत राहील यांची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण विभागाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता विनय बहादूर, रुमदेव चव्हाण, मंगेश बोरगावकर तसेच महावितरण विभागाच्या अधिकारी कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

यावेळी मान्सूमपुर्व कामे प्राधान्याने करा, विजेच्या समस्याबाबत ग्राहकांशी, नागरिकांशी सुसंवाद ठेवा.  उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढविण्याचे व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 तसेच इतर योजनेअंतर्गत उपकेंद्र रोहित्र वाढविण्याचे कामे प्राधान्याने पूर्ण करा. यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा, ग्राहकांचे मोबाईल क्रमांक अपडेट करुन घ्या. उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढविण्याचे कामे 10 दिवसांत पूर्ण होतील यांची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.  

तसेच दुरुस्तीचे कामे करताना महावितरणने ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी  मॅसेज पाठवून पुर्वसूचना द्यावी. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढणार नाहीत. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी अद्ययावत यंत्राचा वापर वाढवावा. यासाठी आवश्यक त्या साहित्यांची खरेदी करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.   

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 725 गावे व 720 वाडीपाडे असून या गावामध्ये महावितरणद्वारे विद्युतीकरण झालेले आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 6 लाख 29 हजार 147 विज ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर विज पुरवठा करताना विजेच्या मागणीनुसार पुरवठा कमी पडत आहे. त्यानुसार महावितरण विभागाकडून उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, नवीन उपकेंद्रे मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना प्रणाली सुधारणा, नवीन अतिरिक्त उपकेंद्र रोहित्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 प्रणाली सुधारणा , एबीडी योजनेअंतर्गत्तच्या प्रस्तावित कामांची माहिती, नवीन उपकेंद्रे, सुधारित वितरण क्षेत्र योजना, वाहिनी विलगीकरण उपाययोजना, सोलार प्रकल्प यातील प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.  

00000







9.5.2025

वृत्त क्रमांक 488

मान्सूम पूर्व कामे यंत्रणांनी वेळेच्या आत पूर्ण करावी

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड दि. 9 मे :- मान्सूम काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूम पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता जवळपास 337 गावांना पुरांचा धोका उद्भवू शकतो. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या-त्या भागातून सुरक्षिततेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने जिल्हा प्रशासनाला हाताळता याव्यात यादृष्टिने सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. 

मान्सून 2025  च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कुऱ्हे यांच्यासह परिवहन,  सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे,  महानगरपालिका, आरोग्य,  कृषि,  महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी,  तहसीलदार, मृद व जलसंधारण, विद्युत, पोलीस, अग्निशमन, शिक्षण, पशुसंवर्धन, रेल्वे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, जिल्ह्यात 337 गावे पूरग्रस्त आहेत. या गावात रंगीत तालीम घ्याव्यात. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणाची आवश्यक साहित्यांची खरेदी करावी. 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन कक्षातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करावेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहतील यांचे नियोजन करावे. आदिवासी व ग्रामीण भागात सर्पदंशासह इतर आजारांवरील उपचार स्थानिक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातच करावेत. रुग्णाला औषध उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासू नये. आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी, रक्तसाठा इतर अनुषंगिक साहित्य उपलब्ध करावीत. ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आरोग्य विभागाला दिले.

शहरातील नाल्याची स्वच्छता करुन घ्यावी. गावांना धोका होऊ नये यादृष्टीने पाझर तलावाची दुरुस्ती करुन गाळ काढावा. शहरातील धोकादायक इमारतीची पाहणी करुन नोटीस देवून नियमानुसार कारवाई करावी. पुर परिस्थितीत नदी काठच्या लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. सुरक्षित स्थळे निश्चित करावीत. तसेच महावितरण, जिल्हा पुरवठा कार्यालय, शिक्षण विभाग, पशुसंवर्धण विभाग, कृषि विभाग यांनाही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. 

सर्व प्रमुख यंत्रणांनी  या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदीच्या पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व विभागांशी समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.  उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तालुकास्त्रावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक घेवून पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी करावीत. आपत्कालिन नियंत्रण कक्षातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल संपर्क अद्यावत करावीत. वाहन व्यवस्था सुस्थितीत ठेवावी. विजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील नाली साफसफाईचे कामकाज युध्द् पातळीवर करावेत. आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.  

00000













Friday, May 9, 2025

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना




 

 विद्यानिकेतन चालवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान

  वृत्त क्रमांक   497 डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार यांचे आवाहन नांदेड दि...