Friday, October 18, 2024

 वृत्त क्र. 957

रब्बी हंगामासाठी पाणीपाळी सोडण्याचे नियोजन  


नांदेड दि. 18 ऑक्टोबर :- नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प, करडखेड मध्यम प्रकल्प, कुंद्राळा मध्यम प्रकल्प, पेठवडज मध्यम प्रकल्प, महालिंगी मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्प, 1 कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा व 50 लघु प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना कळविण्यात आले आहे की, सदर नमूद प्रकल्पांवर रब्बी हंगाम सन 2024-2025 राबविण्याचे  नियोजित आहे.

सर्व धरणांत 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या स्थितीनुसार पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून, उपलब्ध पाणी साठ्याच्या अनुषंगाने प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगाम पूर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजित आहे. सदर नियोजनास आवश्यकतेनुरुप कालवा सल्लागार समितीची मंजूरी मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पाणीपाळी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यानुषंगाने सर्व संबंधित लाभधारकांना आवाहन करण्यात येते की, हंगाम सुरू होण्यापूर्वी खालील अटी व शर्तींची पूर्तता करावी.

रब्बी हंगामी, दुहंगामी  व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/ मंजूर उपसा/ मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात (नमुना नबंर 7) दि.31 ऑक्टोबर 2024 पूर्वी संबंधित  शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी नभरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जाऊन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. दि. 29 मार्च 2022 च्या शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरुन सहकार्य करावे.

शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणीपाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा केल्यास अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी  मागणी, वसूली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे. अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (द) चे कार्यकारी अभियंता आ. शि. चौगले यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...