Monday, December 23, 2024

 वृत्त क्र. 1226

माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी

 २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक  

नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी उद्या नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण व लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे माळेगाव तीर्थक्षेत्राला २५ डिसेंबरला दुपारी 2 वा. आढावा बैठक घेणार आहेत. सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माळेगाव येथे बोलवण्यात आले आहे. 

दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव येथील यात्रेला 29 तारखेपासून सुरूवात होणार आहे. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत विविध आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या परंपरेनुसार व निर्धारीत हे कार्यक्रम होणार आहेत. तथापि या ठिकाणी येणाऱ्या लाखोच्या संख्येतील श्रद्धाळू भाविक व यात्रेकरूंचा ओघ बघता प्राथमिक सुविधा चौख असाव्यात यासाठी हे आयोजन असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी यासंदर्भात संबंधित सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

0000

 वृत्त क्र. 1225

अडचणीतील महिलांनी निवाऱ्यासाठी

महिला राज्यगृहाशी संपर्क साधावा  

नांदेड दि. 23 डिसेंबर :- निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा व पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेत आहे. अशा महिलांनी न बिचकता शासनाच्या सुविधांचा वापर करावा व निवाऱ्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्य गृह नांदेड येथील अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे.  

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रित व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. 18 ते 60 वर्षापर्यंतच्या निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिला यांना याठिकाणी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते. संबंधित महिलांनी किंवा अशा पद्धतीच्या गरजू महिला लक्षात आलेल्या कोणत्याही नागरिकांनी यासाठी अशा महिलांना मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता आपल्या या हक्काच्या शासकीय निवाऱ्याची सोय स्वत:साठी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह हॉटेल भाईजी पॅलेजच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डानपूल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 02462-233044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे. 

0000

 वृत्त क्र. 1224

सुशासन सप्ताह अंतर्गत रोजगार हमी 

लसंधारणाच्या कामाचा आढावा 

 नांदेड दि. 23 डिसेंबर :-  19 ते 25 डिसेंबर सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सुशासन सप्ताहमध्ये दिर्घकालीन व शाश्वत विकासाच्या अनेक उपक्रमांना स्थानिक प्रशासनाने गती देण्याला प्राधान्य दिले आहे. आज या सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनामध्ये आज या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रामुख्याने यावेळी रोजगार हमी व जलसंधारणाच्या संदर्भातील आढावा घेतला. यात जलयुक्त शिवार, नरेगा, पांदण रस्ते, विहिर बांधकाम, गाळमुक्त तलाव, शेततळे, शोषखड्डे, घरकुल, चारा लागवड, बांबुलागवड तसेच जलसंधारणांतर्गत शेततळे, तुषारसिंचन, सुक्ष्मसिंचन, मृदजलसंधारण आदी संदर्भात आढावा घेण्यात आला. 

पावसाळा लागण्यापूर्वी यासंदर्भातील कामांचे नियोजन आवश्यक आहे. तसेच या आर्थीक वर्षातील पुढील तीन महिने बाकी असून यामध्ये खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने संपूर्ण यंत्रणेने याबाबत काम करावे, असे आवाहनही करण्यात आले. बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी रोहयो ललीतकुमार वऱ्हाडे यांच्या विभाग प्रमुख उपस्थित होते. 

0000








 वृत्त क्र. 1223

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी 

नांदेड दि. 23 डिसेंबर :- राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन राजस्थान राज्यात जयपूर येथे 7 ते 13 जानेवारी 2025 पर्यंत केले आहे. या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी खुल्या गटाची राज्य निवड चाचणी घेतली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याचे प्रयोजन आहे. या निवड चाचणीसाठी क्रीडापटूंनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

इंडियन असोसिएशनद्वारा ऑलिम्पिक अॅडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅडहॉक समिती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. महिला व पुरुष गटासाठी पुणे येथील आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. चाचणी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी पुणे येथील जिल्हा क्रीडा अधिकारी श्री कसगावडे मो.नं. 9422518422  यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड कार्यालयाने केले आहे.

0000

 दि. 22 डिसेंबर, 2024

                                                                                  वृत्त क्र. 304

राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

 

मुंबई, दि.22 : - राज्य  मंत्रिमंडळांचे खातेवाटप  21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे-

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क. 

 

मंत्री 

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : महसूल

श्री. राधाकृष्ण विखे - पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

श्री. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण 

श्री. चंद्रकांत(दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य 

श्री. गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.

श्री. गणेश नाईक : वने

श्री. गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता. 

श्री. दादाजी भुसे: शालेय शिक्षण.

श्री.  संजय राठोड : मृद व जलसंधारण.

श्री. धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण. 

श्री. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता. 

श्री. उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा 

श्री. जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार. 

श्रीमती पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन. 

श्री. अतुल सावे : इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा 

श्री.  अशोक उईके : आदिवासी विकास. 

श्री. शंभूराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.

अॅड.आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य. 

श्री. दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 

कु. आदिती तटकरे : महिला व बालविकास. 

श्री. शिवेंद्रसिंह  भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).

अॅड. माणिकराव कोकाटे : कृषी. 

श्री. जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायतराज. 

श्री. नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य. 

श्री. संजय सावकारे : वस्त्रोद्योग. 

श्री.  संजय शिरसाट : सामाजिक न्याय. 

श्री. प्रताप सरनाईक : परिवहन 

श्री. भरत गोगावले : रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास. 

श्री. मकरंद जाधव-(पाटील): मदत व पुनर्वसन.

श्री. नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे. 

श्री. आकाश फुंडकर : कामगार. 

श्री. बाबासाहेब पाटील : सहकार. 

श्री. प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. 

 

राज्यमंत्री

अॅड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार, 

श्रीमती माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 

डॉ पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म. 

श्रीमती मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम). 

श्री. इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण. 

श्री. योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन. 

0000

Friday, December 20, 2024

वृत्त क्र. 1222

विमुक्त जातीभटक्या जमातीविशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी विविध योजना 

नांदेड दि. 20 डिसेंबर :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या दोन महामंडळाची स्थापना केलेली आहे. ही महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत कार्यरत असुन त्यांना स्वतंत्र उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. 

या तिन्ही महामंडळांअंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजना, रुपये एक लाख थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना राबविल्या जात आहेतजिल्ह्यायातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ ( मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड. फोन क्र. 02462-220244 येथे संपर्क साधावाअसे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना  

या योजनेची मर्यादा 10 लाख रु. र्यंत असुन अर्जदार हा विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावाअर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. योजना ही ऑनलाईन असून याकरिता जातीचा दाखलाउत्पन्नाचा दाखलारेशनकार्डआधारकार्डवयाचा पुरावा संबंधित व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

या योजनेची मर्यादा 10 लाख ते 50 लाख रुपयापर्यत असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यत असावे. गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉनक्रिमिलिअरआधारकार्डवयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मुळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे. 

रुपये एक लाख थेट कर्ज योजना

या योजनेमध्ये महामंडळाकडुन 1 लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत तसेच बोझा नोंद करुन देणे आवश्यक आहे. या योजनेकरिता जातीचा दाखलाउत्पन्नाचा दाखला ( रु.1 लाखापर्यत)रेशनकार्डआधार कार्डवयाचा पुरावाव्यवसायाचा परवाना आदी कागदपत्रांसह संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयातुन जातीचा मुळ दाखला व आधार कार्ड दाखवुन रितसर नोंद करुन अर्जदारास मिळतील.

बीज भांडवल योजना

ही योजना बँकेमार्फत राबविली जात असुन अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखलाउत्पन्नाचा दाखला (एक लाख रुपयापर्यंत)रेशनकार्डआधार कार्डवयाचा पुरावारहिवासी प्रमाणपत्रसंबंधित व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन कार्यालयात दाखल करावी लागतील. यापुर्वी लाभार्थ्याने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही. 

या योजनेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे-100,05,05. गट कर्ज व्याज परतावा योजना योजनेचे- 01,01,01. बीज भांडवल कर्ज योजना-01,01,01. रुपये 1 लाख थेट कर्ज योजना-100,30,30 असे उदिष्ट प्राप्त झाले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी नमूद केले आहे.  

0000

 वृत्त क्र. 1221

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी  

शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 20 डिसेंबर :- अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून 16 डिसेंबर पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात आली आहेत.

 

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर याबाबत ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत मंगळवार 31 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय 3 चर्च पथ पुणे या कार्यालयात मुदतीत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी दिली आहेअसेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.  

00000

  वृत्त क्र. 1220

नांदेड निर्यातदार जिल्हा म्हणून नावलौकिकाला आणू या ! 

 जिल्हा उद्योग केंद्र नांदेड निर्यात प्रचालन कार्यशाळा 

नांदेड दि. २० डिसेंबर : नांदेड मध्ये केळी, हळद व अन्य अनेक क्षेत्रात अव्वल पद्धतीचे निर्यातदार होण्याची ताकद आहे. इथल्या शेतकऱ्यांनी,व्यापाऱ्यांनी,प्रशासनाने जोर लावल्यास ही बाब सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे नांदेड निर्यातदार जिल्हा म्हणून नावलौकिकाला आणण्यासाठी आपापल्या भूमिका नुसार प्रयत्न करूया, असे प्रतिपादन विदेश व्यापार महानिदेशालयाचे अधिकारी जयंतकुमार रावल यांनी केले आहे.

जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्या पुढाकारात उद्योग संचालनालय मुंबई मार्फत निर्यात प्रचालन कार्यशाळा ( एक्सपोर्ट प्रमोशन वर्कशॉप ) आयोजित करण्यात आली होती. 16 डिसेंबर रोजी झालेल्या या उद्योग भवनातील कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी या संदर्भात विचार मंथन केले.

या कार्यशाळेत विदेश व्यापार महानिदेशालयाचे जयंतकुमार रावल,  मुख्य डाक कार्यालयाचे अधीक्षक कुलकर्णी, TJSB बँकेचे निखील गोसावी, अग्रणी बँक अधिकारी अनिल गचके,तसेच उद्योग आघाडीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक हर्षद शहा, जिल्हयातील केळी निर्यातदार श्री. देशमुख आणि निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, कृषी उत्पादक, प्रक्रिया उत्पादक इत्यादी उद्योगाशी संबंधीत उपक्रमाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सदर कार्यशाळेचा उद्देश हा राज्यामध्ये निर्यात क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्हयाला उत्तरदायी बनविण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र (District as Export Hub) उपक्रमाला प्रोत्साहन देणे हा आहे, असे जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले.

 कार्यशाळेत विदेश व्यापार महानिदेशालय (DGFT) पुणे येथील जयंतकुमार रावल यांनी मार्गदर्शन करतांना,निर्यात बाबत महत्व व प्रक्रिया विषद केली. अनिल मोहिते यांनी कोरोनानंतर निर्यातीमध्ये झालेल्या वाढीचे प्रमाण हे सन 2029-2030 पर्यंत दुपटीने होईल असे सांगितले. देशात महाराष्ट्र राज्याचा निर्यातीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये संभाजीनगर जिल्हयाचा इंजिनिअरिंग क्षेत्रात तर नांदेड जिल्ह्याचा फार्मास्युटीकल क्षेत्रात अग्रेसर आहे.तसेच जेम्स व ज्वेलरी, कृषी, वैद्यकीय आणि सेवाक्षेत्र आयटी, बँक क्षेत्रांमध्ये निर्यात होत असल्याचे कथन केले. 

 ग्रामीण भागातील उद्योजकांच्या उत्पादित वस्तूंच्या निर्यातीसाठी डाक निर्यात केंद्राची उपयुक्तता  मुख्य डाक कार्यालयाचे अधीक्षक श्री.कुलकर्णी यांनी सांगितली. ई-कॉमर्सद्वारा उत्पादित वस्तूची ऑर्डर आल्यास, पोस्टाद्वारे करण्यात येणारी कस्टम क्लीअरन्सची प्रक्रिया विषद केली.

निखील गोसावी यांनी निर्यातीबाबत TJSB ही कॉपरेटीव्ह बँक कमी दराने अर्थसहाय्य  करत असल्याचे सांगितले. SWIFT (Society For Worldwide Interbank Financial Telecommunication) द्वारा होत असलेल्या आयात-निर्यातीबाबत प्रक्रिया विषद केली. 

देशातंर्गत व जागतिक पातळीवर बाजारपेठ मिळविण्यासाठी निर्यातीबाबत केलेली कार्यवाही, प्रयत्नांची माहिती व जिल्हयांमधील उद्योजकांमध्ये जागरुकता निर्माण करुन निर्यात वाढीसाठी प्रेरीत माहिती केळी, हळद निर्यातदार श्री.देशमुख यांनी कार्यशाळेत दिली. त्यांनी कृषी आधारीत केलेल्या उत्पादित वस्तू निर्यातबाबत संभाव्य अडचणी व त्यावरील करण्यात येणारी उपाययोजना आदी बाबत सविस्तर सांगितले.  

सुरूवातीला या एक दिवसीय कार्यशाळेची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलाने सुरुवात करुन पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेचा समारोप उद्योग निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या आभार प्रदर्शनानंतर करण्यात आला.

0000

Thursday, December 19, 2024

 वृत्त क्र. 1219

शासकीय निवासी शाळा हदगाव येथे 

जिल्हास्तरीय क्रीडा व कलाविष्कार स्पर्धा संपन्न 

नांदेड दि. 19 डिसेंबर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय निवासी शाळांचे जिल्हास्तरीय क्रीडा व कलाविष्कार स्पर्धा-2024 समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाल्या. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. निर्णयक्षमता, सहानुभुती, शिस्त व सहकार्याची भावना निर्माण होते. या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो, असे मत सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी व्यक्त केले. 

या स्पर्धेचे उदघाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हदगावचे शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य फारुकी ए.डब्ल्यु, तालुका क्रीडा संयोजक प्रा.अजय चौधरी, स.क.निरीक्षक पी. जी.खानसोळे, आर.डी.सुर्यवंशी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, वसतिगृहाचे गृहपाल, इतर कर्मचारी उपस्थीत होते. जिल्हास्तरीय क्रिडा व कलाविष्कार स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

000

 वृत्त क्र. 1218 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 144 

नांदेड, दि. 19 डिसेंबर :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2025 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 वृत्त क्र. 1217 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड, दि. 19 डिसेंबर :- नांदेड जिल्ह्यात 18 डिसेंबर 2024 रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 1 जानेवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 18 डिसेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 1 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...