Wednesday, November 30, 2022

 संविधान विषयावर स्पर्धा संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- संविधान दिन ‍26 नोव्हेंबर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर या कालावधीत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने संविधान विषयावर जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात आज भित्तीपत्रक, पोस्टर्स, बॅनर, चित्रकला स्पर्धा तर अधिनस्त मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह निवासी शाळा येथे भित्तीपत्रक, पोस्टर्स, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवा कार्यकर्ते प्रतिनीधी, कर्मचारी वर्गांची कार्यशाळा घेण्यात आली, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

 जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन

व वाटप शिबिराचे शनिवारी आयोजन  

 

नांदेड (जिमाका) दि 30 :- नांदेड जिल्हयात तालुकानिहाय महाविद्यालयस्तरावर शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी एक दिवसीय जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांनी सन 2022-23 या वर्षातील प्रवेशीत इयत्ता 11 वी व 12 विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत आयोजित तालुकानिहाय शिबिराच्या ठिकाणी संबंधित तालुक्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रतिनिधी तसेच महाविद्यालयात स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राचे नियुक्त प्रमुख प्रतिनिधींनी मंडणगड पॅटर्न प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी माहितीसह उपस्थित रहावे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले, उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार 26 नोव्हेंबर संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2022 पर्यंत 'समता पर्व' साजरे केले जात आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने सन 2022-23 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे समितीकडे दाखल केलेल्या जाती दावा पडताळणी प्रस्तावांमध्ये समितीने दिनांक 28 नोव्हेंबर पासून ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत वैध केलेल्या प्रकरणात संबंधित अर्जदार यांना समक्ष जात वैधता प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. तसेच सर्व महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राचे नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधींना मंडणगड पॅटर्न प्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

तालुकानिहाय शिबिराचे आयोजन

नांदेड जिल्ह्यात शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत धर्माबाद व बिलोली तालुक्यासाठी लाल बहादूरशास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच बरोबर भोकर, हिमायतनगर, किनवट तालुक्यासाठी श्री शाहू महाराज महाविद्यालय बोरगाव रोड भोकर येथे, देगलूर तालुक्यासाठी देगलूर महाविद्यालय देगलूर, नायगाव तालुक्यासाठी जनता हायस्कुल नायगाव येथे, लोहा व कंधार तालुक्यासाठी श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथे, हदगाव व माहूर तालुक्यासाठी पंचशिल महाविद्यालय हदगाव येथे, मुखेड तालुक्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे. नांदेड, अर्धापूर, व मुदखेड तालुक्यासाठी यशवंत महाविद्यालय नांदेड येथे तर उमरी तालुक्यासाठी कै. बाबासाहेब देशमुख बोरटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमरी येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अनिल शेंदारकर उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.   

00000

 नेहरू युवा केंद्राच्यावतीने जिल्हा युवा मंडळ

पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि 30 :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने दरवर्षी युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संलग्नित युवा मंडळासाठी पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुक मंडळानी 15 डिसेंबर 2022 पर्यंत विहित नमून्यात  नेहरू युवा केंद्र] राज निवास घर नं.21 मालेगाव रोड जैन मंदिर समोर, शिवराय नगर तरोडा (खु ) नांदेड येथे अर्ज सादर करावेत.

 

दिनांक 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षात युवा मंडळाने केलेल्या युवा विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्र नांदेड कार्यालयातर्फे आरोग्य शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, विविध शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन, सामाजिक कार्यक्रम इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या संलग्नित युवा मंडळाना हा पुरस्कार देण्यात येतो.

 

पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्रक असे आहे. जिल्ह्यातील संलग्नित ग्रामीण भागातील युवा मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ, सेवाभावी संस्था, व्यायामशाळांनी अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र, घटना, आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा अहवाल, लेखा परीक्षणाचा अहवाल व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिफारशीसह सर्व मंडळानी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे. अर्जाचा नमुना नेहरू युवा केंद्र या कार्यालयात उपलब्ध आहे. या योजनचा लाभ जास्तीतजास्त युवा मंडळानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी युवा केंद्र अधिकारी चंदा रावळकर  यांनी केले आहे.

0000000

Tuesday, November 29, 2022

 सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी

कटिबद्ध होऊन अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे

-         खासदार प्रताप पाटील चिखलीकर  

 

·         दिशा  समितीमध्ये विविध विकास कामांचा आढावा

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी केंद्र सरकारने ज्या योजना हाती घेतल्या आहेत त्यात अंत्योदयाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. महानगरपासून ते खेड्यापर्यंत निराधारांना आवास योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, ग्रामीण पेयजल, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, एकात्मिक बालविकास योजना, मध्यान भोजन योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास आदी योजना या भारतातल्या प्रत्येक घटकांप्रती कटिबद्ध होऊन हाती घेतलेल्या आहेत. सर्व सामान्यांच्या विकासाचा मार्ग यातून समृद्ध होणार असून संबंधित यंत्रणांनी या योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिक कटिबद्ध व निस्वार्थ भावनेने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.   

 

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)  समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्याात आलेल्या या बैठकीस या बैठकीस आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले तसेच अशासकीय सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

शेती, शेतकरी, कष्टकरी यांना सावरण्यासाठी शासनाने महत् प्रयासाने योजना हाती घेतल्या आहेत. मागील अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना हातचे पीक गमवावे लागले. अशाप्रसंगी शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पीक विमा योजना देण्यात आली. या विमानुसार संबंधित शेतकऱ्यांना बँकेच्या आयएफसीकोड व इतर तांत्रिक चुकामुळे वेळेवर मदत मिळण्यास जर अडचण निर्माण होत असेल तर योजनेचा उद्देश सफल होणार नाही. अशा तांत्रिक चुका ज्या-ज्या विभागासंदर्भात असतील त्यांनी तात्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विभाग प्रमुखांना केले.

 

या बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना, प्रधानमंत्री उज्जवला योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्वशिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनांचा आढावा घेतला.

 

मराठवाडा मुक्तीचा अमृत महोत्सव

अधिक व्यापक करू या

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापाठोपाठ आपण मराठवाड्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या 13 महिन्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा मुक्तीची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचावी, मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव अधिक व्यापक व लोकोत्सवात साजरा व्हावा यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेऊन व्यापक नियोजन केले आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्ह्याचे जे अनन्यसाधारण महत्व आहे ते लक्षात घेऊन प्रत्येक तालुका पातळीवर विविध उपक्रमाचे प्रत्येक विभागाने आयोजन करण्याचे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत व्यापक बैठक झालेली आहे. हा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यादृष्टिने कोणाच्या सूचना असतील, उपक्रमात सहभाग घ्यायचा असेल अशांनी पुढे येऊन आपल्या कल्पना-उपक्रम सूचवावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. अमृत महोत्सवासमवेत चला जाणु या नदीला हे विशेष अभियान नदी आणि पर्यावरणाच्यादृष्टिने शासनाने हाती घेतले असून यातही सेवाभावी संस्था, स्वयंसेवक यांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.  

00000 








 फेसलेस सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 29 :- केंद्र शासनाच्या 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार 58 सेवा आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस पध्दतीने देण्याचे सूचित केले आहे. यामध्ये सारथी संबंधी अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल क्रमांक अद्यावत करणे, अनुज्ञप्ती ची माहिती मिळविणे, अनुज्ञप्ती विवरणपत्र, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती व कंडक्टर अनुज्ञप्ती नुतनीकरण या सेवा फेसलेस स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार आधार क्रमांकाचा वापर करुन नागरिकांना सारथी 4.0 या प्रणालीवर अर्ज करता येतील. यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे केलेला ऑनलाईन अर्ज कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर वैध असलेल्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील

नवउद्योजकांसाठी गुरुवारी कार्यशाळा

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांसाठी गुरुवार 1 डिसेंबर 2022 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावाअसे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर 2020, 16 मार्च 2020 व 26 मार्च 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत असेही प्रसिद्धीपत्रकान्वये समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी कळविले आहे.

0000

वृत्त

शिपाई पदासाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयातील वर्ग 4 शिपाई या एका रिक्त पदासाठी इच्छुक व्यक्तींनी आपले दरपत्रक विहित नमुन्यात सहपत्रासह शुक्रवार 2 डिसेंबर 2022 पर्यत सर्व तपशीलासह कार्यालयास सादर करावेत. याबाबत अटी व शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेल्या आहेत. संबंधितांनी सहायक संचालक, नगररचना, नांदेड शाखा कार्यालय, नांदेड श्री घोडजकर इमारत, दुसरा मजला, महाराणा प्रताप चौक, गांधी नगर, हिंगोली नाका नांदेड -431605 या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन नगररचना विभागाचे सहायक संचालक प. ला. आलूरकर यांनी केले आहे.

 

सहाय्यक संचालक, नगररचना कार्यालयात वर्ग-4 शिपाई या रिक्त पदाचे कामकाज बाह्य यंत्रणेद्वारे मान्यता प्राप्त संस्था / कंपनी यांच्याकडून कंत्राटी तत्वावर उमेदवारांची सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी मान्यता आहे.  मान्यताप्राप्त संस्था / कंपनीकडून यापूर्वी दरपत्रके मागविण्यात आले होते परंतु प्राप्त दरपत्रकात सुसूत्रता व आवश्यक माहिती नमुद नसल्यामुळे प्राप्त दरपत्रके विभागीय कार्यालयाकडून नामंजूर करण्यात आली, अशी माहिती नगर रचना विभागाचे सहायक संचालक प. ला. आलूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 00000

Monday, November 28, 2022

 जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध सभांचे गुरुवारी आयोजन

नांदेड (जिमाका) दि.  28 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समितीची सभा गुरुवार 1 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वा. नांदेड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.  

000000

विशेष वृत्त

 जिल्ह्यातील 5 लाख 61 हजार 582 लाभधारकांना

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेल्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांना विविध गंभीर आजारांवर उपचार करता यावेत या उद्देशाने राज्य व केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केलेली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गंभीर आजारांवर पात्र लाभार्थ्यांना सुमारे 5 लाख रुपये प्रती कुटूंब प्रती वर्षे मर्यादेत मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 61 हजार 582 लाभधारकांना या योजनेच्या कक्षेत घेण्यात आले आहे.

 

ही योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी आरोग्य विभागासह राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे संपूर्ण जिल्हाभर जागृती करण्यात येत आहे. प्रत्येक गावातील आशावर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्यामार्फत ही योजना पोहचविली जात असल्याची माहिती सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. दिपेश कुमार शर्मा यांनी दिली.

 

सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारानुसार 34 विशेष तज्ज्ञांकडे शासकीय अथवा खाजगी दवाखाण्यात उपचार घेता येतात. याचबरोबर सुमारे 1 हजार 38 उपचार खाजगी रुग्णालयात तसेच 171 उपचार पद्धती या शासकीय रुग्णालयाअंतर्गत योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ज्ञांकडे मोफत घेता येतील. यात प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजारावरील उपचार यांचा समावेश आहे. यासाठी आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे.

 

इथे मिळतील आयुष्यमान कार्ड

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्याकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबाची नावे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारीत विशिष्ट निकषानुसार निवडलेले आहेत त्या कुटुंबातील सदस्यांना हे कार्ड खालील ठिकाणी मोफत मिळेल. यात संलग्नीकृत रुग्णालय असलेले आधार हॉस्पिटल, अपेक्षा हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, श्री गुरूजी रुग्णालय, श्री सिद्धी विनायक हॉस्पिटल, विनायक हॉस्पिटल, लव्हेकर हॉस्पिटल, आढाव हॉस्पिटल, अष्टविनायक हॉस्पिटल, गायकवाड हॉस्पिटल, तुकामाई हॉस्पिटल, चिंतामणी हॉस्पिटल, गोदावरी हॉस्पिटल, उमरेकर हॉस्पिटल, नांदेड क्रिटीकल केअर हॉस्पिटल, भक्ती हॉस्पिटल, आशीर्वाद हॉस्पिटल, सहयोग हॉस्पिटल, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, श्री गुरूगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मुखेड, देगलूर, गोकुंदा किनवट, कंधार, भोकर, नायगाव, स्त्री रुग्णालय नांदेड आदी ठिकाणी रुग्णालयात आरोग्य मित्रामार्फत हे कार्ड मोफत काढून दिले जातात. याचबरोबर आपल्या जवळील कॉमन सर्व्हीस सेंटर, ग्रामपंचायत अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र, यु.टी.आय. आय.टी.एस.एल. केंद्र येथे कार्ड बनून दिले जाते.

 

आयुष्यमान कार्डासाठी ही लागतात कागदपत्रे

पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी मुळ शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. याचबरोबर आधार कार्ड आणि ओटीपीसाठी मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामस्तरीय सुविधा केंद्र व वर नमूद करण्यात आलेल्या संलग्न रुग्णालयाच्या ठिकाणी उपलब्ध असलेले आरोग्य मित्र हे कार्ड मोफत काढून देतील.

कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही यासाठी  https://mera.pmjay.gov.in या संकेतस्थळावर किंवा 14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास खात्री करून घेता येते. गावनिहाय, वार्ड निहाय यादी पाहण्यासाठी https://aapkedwarayushman.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन पाहणी करता येईल. यात अडचण भासत असेल तर संलग्नीत रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधता येईल.

00000

 जिल्ह्यातील 4663 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 26 हजार 31 पशुधनाचे लसीकरण 

 

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 220 बाधित गावात 4 हजार 663 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. 

आतापर्यंत 269 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 3 हजार 96 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 1304 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 26 हजार 31 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 140 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

 पाचवी ते आठवीमध्ये नव्याने प्रविष्ठ

होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ 

 

नांदेड (जिमाका) दि.  28 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी मध्ये नव्याने प्रविष्ठ  होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेशाकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करण्यासाठी http:/msbosmh-sscacin  या संकेतस्थळाचा वापर करावा.

 

नोंदणी अर्ज ऑनलाईन  स्विकारण्याची मुदत शुक्रवार 2 डिसेंबर 2022 आहे. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज विहित शुल्क व मूळ कागदपत्रासह अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावा. सोमवार 5 डिसेंबर 2022 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क कागदपत्रे व यादीसह विभागीय मंडळात जमा करावी, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयाचे प्र. सचिव माणिक बांगर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

 स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग

योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

 

नांदेड (जिमाका) दि.  28 :- स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2022-23 मध्ये शासनाने मान्यता दिली आहे. इच्छुक पात्र लाभार्थ्यंनी या योजनेअंतर्गत फळबाग लागवडी करीता किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर क्षेत्र अनुज्ञेय आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिक लागवड करता येईल. लाभार्थ्यांनी यापूर्वी फळबाग लागवड करण्यासाठी इतर योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित  मर्यादित लाभार्थी  पात्र राहील. या योजनेअंतर्गत पुढील बहुवार्षिक फळपिकांचा आंबा, पेरू, डाळींब, लिंबू, मोसंबी, संत्रा, सीताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर व चिकु यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रता

मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेतून अपात्र असणारे शेतकरी यांना वैयक्तिक शेतकऱ्यांच लाभ घेता येईल . शेतकऱ्यांच्या  स्वत च्या नावे सात बारा व आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे. सात बारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्रक राहील. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास सातबारा उताराऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर कुळाचा नावे संमती पत्र आवश्यक राहील.

 

अर्ज नोंदणी प्रक्रिया

सर्व इच्छुक शेतऱ्यांनी महाडीबीटी http:/mahadbtmahait.gov.in   या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि आपल्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण त्याचवेळी करणे बंधनकारक राहील.या योजने अंतर्गत अनुदान मंजुर मापदंडाप्रमाणे देय असल्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांनी सात बारा आठ अ नुसार क्षेत्र सर्वे नंबर फळपिकांचे नाव, प्रकार, कलमे, रोपे, लागवड अंतराचे परिणाम ( मीटरमध्ये ) इत्यादी माहिती  शेतकऱ्यांनी अचूक भरावी.महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्यापासून योजने अंतर्गत मागील प्राप्त अर्ज बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्राप्त होणारे अर्ज आर्थिक लक्षांकाच्या अधिन राहुन संगणकीय सोडतीव्दारे लाभार्थ्यांची  निवड करण्यात येणार आहे. अर्जासंबंधीच्या माहिती http:/mahadbtmahait.gov.in   या वेबसाईटवर उपलब्ध आहे.तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी  कार्यालयाशी संपर्क साधावा . या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी आर.बी.चलवदे  यांनी केले आहे.

00000

Saturday, November 26, 2022

 संविधान जनजागृती अभियान चित्ररथाचे

जिल्हाधिकारी राऊत याच्या हस्ते उदघाटन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात आले, असून या अभियान चित्ररथ वाहनास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून हे अभियान अंमलात आले, असून समाज कल्याण विभागाच्या 20 टक्के उपकर योजनेतून संविधान जनजागृती अभियान राबविले जात आहे. यातून संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने हे अभियानाची सुरवात जिल्हा परिषदकडून केली आहे.

 

या अभियानाचे उदघाटन शनिवार दि.26 नोव्हेंबर रोजी अर्थात संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी आयटीआय परीसरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले येथील पूर्णाकृती पुतळा येऊन चित्रवाहनास हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीस सुरुवात करण्यात आली. या अभियानास अभिजित राऊत व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी शुभेच्छा दिल्या. चित्रवाहनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 275 गावांमध्ये जाऊन संविधानाचा प्रचार व प्रसार केला जाणार असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सांगितले.

00000



 भारतीय संविधान दिनानिमित्त

जिल्हा माहिती कार्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- भारतीय संविधान दिनानिमित्त नांदेड जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी विनोद रापतवार यांनी संविधानातील कलमाचे महत्व सांगितले. याप्रसंगी माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, उपसंपादक अलका पाटील, लिपीक टंकलेखक अनिल चव्हाण, काशिनाथ आरेवार, शिपाई गंगाधर निरडे, गंगा देशमुख उपस्थित होते.   

00000

Friday, November 25, 2022

 जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधारस्तंभ

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार यादीची नोंदणी परिपुर्ण असणे हे अत्यावश्यक असते. जागरूक मतदार हा लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ असतो. प्रत्येक नागरिकांनी आपली लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी मतदार यादीत आपले नाव आहे किंवा कसे हे तपासून त्याबाबत जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. मतदान यादीत आपले नाव तपासून घेऊन मतदान करणे हे आपले अद्यकर्तव्य आहे व जबाबदारीही आहे हे मतदारांनी विसरता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.  

 

संविधान दिनाचे औचित्य साधून  व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालयामार्फत बेघर, भटके विमुक्त जमातीतील व्यक्ती या दूर्लक्षित घटकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. भावेश्वरनगर, चौफाळा ब्रम्हपूरी भागात आयोजित या शिबिरास उपविभागीय अधिकारी विकास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचा उद्देश हा कोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी शासन आपले दारी आल्याचे सांगत मतदार नोंदणी सोबत आधार लिंक करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. विविध अर्ज भरण्याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी सविस्तर माहिती देऊन नाव नोंदणी, दुरूस्ती, वगळणी व आधार लिंकबाबत मार्गदर्शन केले.

 

या विशेष शिबिरात एकुण 47  नाव नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले तर 59 लाभार्थ्यांची आधार जोडणी करण्यात आली. तर मतदार यादीतील दुरूस्तीसाठी एकुण 8 अर्ज प्राप्त झाले एकुण 114 अर्ज या एकाच विशेष शिबिरात भरून घेण्यात आले. आभार तहसीलदार किरण अंबेकर यांनी केले  तर 8 डिसेंबर पर्यंतही आपणास नाव नोंदणी दुरूस्ती, वगळणी करता येईल. यासाठी आपल्या भागातील बिएलओ यांना संपर्क करून नोंदणी करण्याबाबत त्यांनी आवाहन केले.

 

कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी केले तर सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मंडळ अधिकारी जोंधळे, तलाठी भांगे, पर्यवेक्षक नबी, बुरसपट्टे, महसूल सहायक अनुसया नरवाडे सह बिएलओ सुफळे, मोतेवार, सोनी, गोत्राम, मठपती, शिपाई  जोंधळे, यूसूफ यांनी परिश्रम घेतले.

000000





 संविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे नांदेड येथे महात्मा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार माळोदे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, अशोक गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीला अधिकार बहाल करणाऱ्या राज्यघटनेचा 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण स्विकार केला. भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगिकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रतीही अर्पण केलेली आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचे व त्याचबरोबर सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय घटनेमुळे प्रत्येकाला मिळाले आहे. याचबरोबर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जा व संधीची समानता आपल्या संविधानाने दिलेली आहे. संविधानातील या मानवी मूल्यांचा जागर प्रत्येक व्यक्ती पर्यंत व्हावा या उद्देशाने आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या रॅलीसाठी विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

00000






  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...