Thursday, July 28, 2022

 महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या तलाईगुडा पाड्यावर रामबाई लेता फडकविणार तिरंगा


▪️महामहिम द्रोपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्याबद्दल आनंद उत्सव
▪️प्रत्येक आदिवासी पाड्यावर तिरंगासाठी कटिबद्ध
- सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकीरण एच पुजार

नांदेड (जिमाका) दि. 28 :- अनेक आदिवासी जमातीपैकी अत्यंत आव्हानात्मक स्थितीत असलेली जमात म्हणून कोलाम जमातीकडे पाहिले जाते. तेलंगणाच्या काठावर असलेल्या महाराष्ट्रातील किनवट तालुक्यात कोलाम समाजाची 440 घरे आहेत. याचबरोबर आदिवासी जमातींपैकी गोंड, आंध, पारधी, भिल्ल, कोलाम, कोमा, धोटी, फासेपारधी, यांचे तांडे आणि खेडी मोठ्या प्रमाणात आहेत. एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या किनवट तालुक्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यातील घरांवर घरोघरी तिरंगा अंतर्गत तिरंगा फडकविण्यासाठी आदिवासी आश्रम शाळातील शिकणाऱ्या मुली व महिला पुढे सरसावल्या आहेत. या उपक्रमाला साजरे करतांना देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या आदिवासी समाजातील महामहिम द्रोपदी मुर्मू यांच्या निवडीचा उत्सवही स्वातंत्र्य दिनानिमित्त साजरा करायला ही पाडे पुढे सरसावली आहेत.
किनवट आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी 16 शासकीय, 21 शासकीय अनुदानीत आश्रम शाळा असून आदिवासी मुलामुलींकरिता तालुकास्तर व जिल्हास्तर अशी मिळून 15 वस्तीगृहे कार्यरत आहेत. सदर आश्रम शाळा व वस्तीगृहातील 17 हजार 155 मुला-मुलींच्या मनात नवा आत्मविश्वास अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमातून निर्माण झाला आहे. यातील माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुली प्राधान्याने घरोघरी तिरंगासाठी पुढे सरसावल्या आहेत. बोधडी येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या 600 मुलींपैकी शंभर मुलींचा गट शाळे शेजारी असलेल्या टिंगणवाडी गावातील सर्व सहाशे घरांवर तिरंगा फडकविण्यासाठी तत्पर असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कीर्तिकीरण एच पुजार यांनी दिली. त्यांच्या समवेत प्रत्येक आदिवासी पाड्यातील महिलाही पुढे सरसावल्या आहेत. महामहिम द्रोपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्या बद्दल याचाही आनंद उत्सव साजरा करण्यासाठी ही महिला शक्ती पुढे सरसावली असल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र सरकारने आदिवासी कोलाम जमातीबाबत विशेष निर्देश दिलेले आहेत. किनवट तालुक्यात अवघी 440 एवढी त्यांची घरे आहेत. त्यांच्या पर्यंत सर्व योजना पोहचवून ऱ्हास पावत चाललेल्या या जमातीला अधिक सक्षम करण्यावरही भर दिला जात आहे. त्याचे प्रतीक म्हणून तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या तलाईगुडा पाड्यावर भिमबाई राजाराम मडावी, रामबाई लेता मडावी, कोलामगुडा पाड्यावर रामबाई चिन्नु आत्राम, काजीपोड येथे कमलाबाई आत्राम या तिरंगा फडकविण्यासाठी तत्पर झाल्या आहेत. महानगरपासून आदिवासी पाड्यापर्यंत निर्माण झालेला हा विश्वास भारतीय अमृत महोत्सवी वर्षोत्तर स्वातंत्र्याचे नवे पर्व ठरणार आहे.
00000






No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...