Tuesday, February 27, 2018

शाहिरी परंपरेचा लोकशिक्षणात मोलाचा वाटा - यशवंत भंडारे

औरंगाबाद,दि. 27- महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला प्राचीन इतिहास आहे. शाहिरीच्या माध्यमातूनच मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षण आणि समाजाच्या प्रबोधनाचे कार्य झाले आहे. शाहिरीमध्ये इतिहासाला बोलते करण्याची कला आहे, असे प्रतिपादन संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मराठवाडा विभागाचे प्र.संचालक यशवंत भंडारे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या वतीने 20 दिवसीय शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एन-9 सिडको येथील कालकादेवी मंदिराच्या सभागृहात आज करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
या शिबिराचे उदघाटन संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मराठवाडा विभागाचे प्र.संचालक यशवंत भंडारे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ज्येष्ठ शाहिर अंबादास तावरे, माजी नगरसेवक मोतीराम घडामोडे, शाहिर हेमंतराजे मावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. 
श्री. भंडारे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहिर तसेच शाहिरी परंपरेला योग्य तो सन्मान मिळवून देत प्रोत्साहान दिले आहे. तोच सन्मान आजच्या काळात शाहिरी परंपरेला मिळवून देण्याची गरज आहे.  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्यावतीने यासाठी प्रयत्न केले जात असून दरवर्षी 20 दिवस या प्रशिक्षिण शिबिराचे आयोजन करण्यात येते. शाहिरी परंपरेत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान अडळ असून शाहिरी परंपरेतूनच त्यांचा इतिहास आज जगासमोर  आणण्याचे काम होत आहे. अनेक शाहिर, लोककलावंतानी घरावर पंचपात्रे ठेवून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत अण्णा भाऊ साठे, बापू नारायणगावकर, कौशल्या कोरेगावकर, अमर शेख, साबळे, पिराजीराव सरनाईक, बाबासाहेब देशमुख, लिलाधर हेगडे, वामनराव कर्डक, दादू इंदूरीकर यांचा मोलाचा वाटा असून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लोकचळवळीत लोकजागृतीचे कार्य केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण ठरवून सांस्कृतिक कार्यसंचालनालय स्थापन करून साहित्यासह लोककला जिवंत ठेवण्यासाठी साहित्य सांस्कृतिक विभागाची स्थापना केली आहे. स्वातंत्रोत्तर काळानंतर लोककला जिवंत ठेवण्यात यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा असल्याचे श्री.भंडारे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे संचालक हेमंतराजे मावळे यांनी केले.  चांगले शाहिर घडविण्यासाठी शाहिरीत परिवर्तन करायला हवे. पोवडा हा नवीन पध्दतीने मांडण्याची कला ही प्रत्येक शाहिराने आत्मसात करायला पाहिजे. यापुढेही शाहिरी परंपरा आपले स्थान कायम ठेवणार असल्याचा विश्वास श्री. मावळे यांनी यावेळी व्यक्त केला. समाजात जोपर्यंत प्रश्न आहे तोपर्यंत शाहिरीची गरज असल्याचे श्री.मावळे यांनी सांगितले.
ज्येष्ठ शाहिर अंबादास तावरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरची शाहिरी परंपरा आणि विदर्भ, मराठवाड्यातील शाहिरी परंपरेत खूप फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधनाची परंपराही शाहिरांनी खंबीरपणे लोकांपर्यंत पोहचविली असे सांगितले.  माजी नगरसेवक मोतीराम घडामोडे यांनी देखील उपस्थित शाहिरांना यावेळी  मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.दशरथ म्हात्रे, शाहिर रामदास धुमाळ, कृष्णकांत सरोदे, दत्तोपंत तांबट, रमेश गोरे, अजय कुंभकर्ण, निर्माता देवदत्त म्हात्रे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष धुमाळ यांनी तर आभार अजिंक्य लिंगायत यांनी मानले.


********

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...