Sunday, April 9, 2017

शेतीतील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर - सदाभाऊ खोत
उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानास प्रारंभ

नांदेड, दि. 9 :- शेती उत्पन्न, साठवणूक, पणन या सर्व टप्प्यांवरच पायाभूत सुविधांच्या विकासांवर भर देण्याचा प्रयत्न राहील. त्यादृष्टीने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान महत्त्वपुर्ण आहे , असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले. ते नायगाव तालुक्यातील गडगा- नावंदी शिवारातील अर्जुन कोनोले यांच्या विकास नर्सरीत आयोजित उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी एम. पी. गोंडेस्वार, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. बी. भरगंडे, कृषि विकास अधिकारी पंडितराव मोरे, प्रकल्प संचालक एस. व्ही. लाडके तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा. प्रकाश पोकळे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, विकास नर्सरीचे अर्जून कोनोले, सतिश कोनोले आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री श्री. खोत पुढे म्हणाले की , उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान हे महत्त्वाकांक्षी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्याची पद्धत सुरु केली. यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील नव-नवीन गोष्टी जाणून घेण्याचाही प्रयत्न आहे. शेतीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास व्हायलाच पाहिजे असे प्रयत्न आहेत. त्यासाठी सुक्ष्म सिंचनाचे गेले कित्येक वर्षे रखडलेले अनुदानही वितरीत करण्यात आले आहे. कांदा चाळ उभारणीसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना नेहमीच पाठींबा राहीला आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणासाठी प्रयत्नशील शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची खरेदी, शेती अवजारांची, निविष्ठांची खरेदी खुल्या बाजारातूनही करण्याची मुभा दिली आहे. खरेदीची पावती कृषी विभागाकडे जमा करताच, अनुदान थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सुरवातीला भाजीपाला नियमनमुक्तीलाही मोठा विरोध झाल्याचे नमूद करून श्री. खोत म्हणाले की, नव्या गोष्टीला सुरवातीला विरोध होतोच पण त्यावर ठाम राहिल्याने, यशही मिळते. हे यातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठीही शेतकरी कंपन्यांना परवागनी दिली आहे. यापुढे या शेतकरी कंपन्यांना सोयाबीन खरेदीची परवानगी दिली जाईल. राज्यातला शेतकरी कर्जमुक्त व्हावा पण तो पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकू नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचसाठी शेतीमालाच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज, गोदामांची उभारणी, त्यावर मालतारण कर्ज योजना राबविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. शेती हा आता व्यवसाय म्हणून करावा लागेल. त्यासाठी सरकारची योजना, शेतकऱ्यांची कष्ट आणि बँकाची मदत अशी सांगड घालावी लागेल. याचसाठी गावा-गावात पोहचून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न असेल. शेतीवर आणि पर्यायाने शेतीवर होणाऱ्या लहरी हवामानाचा परिणाम टाळता यावा यासाठी राज्यात 2 हजार 65 ठिकाणी स्वयंचलित हवामान अंदाजाची यंत्रणा कार्यान्वीत केल्याचेही त्यांनी सांगितले. जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार अभियान आणि स्वर्णजयंती राजस्व अभियानातून पाणंदमुक्ती हे अभियानही प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाणंद मुक्तीसाठी गावा-गावांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने झाली. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी अभियानाचे उद्घाटन प्रगतीशील शेतकरी प्रल्हाद पाटील-होटाळकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. मोटे यांनी प्रास्ताविकात उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाविषयी माहिती दिली.  कार्यक्रमात राज्यमंत्री श्री. खोत यांनी शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी उमाकांत देशपांडे, शेषराव वडजे, के. एफ. पठाण, शंकरराव राजेगोरे, शंकर जाधव, दत्ता गिरे या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्याविषयी चर्चाही केली. कृषी विभागाच्या विविध माहितीपुस्तिका व घडीपत्रिकांचेही राज्यमंत्री श्री. खोत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच काही प्रगतीशील शेतकऱ्यांचाही राज्यमंत्री श्री. खोत यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. गोंडस्वार यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांशी हितगूज , अगंत-पंगतीत जेवण
तत्पुर्वी, राज्यमंत्री श्री. खोत यांनी कोनोले यांच्या विकास नर्सरीची पाहणी केली. यात त्यांनी शेततळे, आंबा, अंजीर  यांच्यासह विविध फळपिकांची पाहणी केली. श्री. कोनोले यांच्याकडून विविध बाबींची माहिती घेऊन त्यांचे कौतूकही केले. कार्यक्रमापुर्वीच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी आस्थेवाईक संवाद साधला, विविध विषयांवर माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करतच जमिनीवर बसूनच अंगत-पंगतीत दुपारचे जेवणही घेतले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...