Sunday, April 9, 2017

पाणी टंचाई उपाय , स्वच्छता विषयक घटकासाठी
समन्वयाने, सांघिकरित्या प्रयत्न करा - राज्यमंत्री खोत
पाणी टंचाई, स्वच्छता विषयक आढावा बैठक संपन्न

नांदेड, दि. 9  :- जिल्ह्यातील टंचाईवरील उपाय योजना तसेच स्वच्छता अभियानासाठी सांघिकरित्या समन्वयाने प्रयत्न करा. त्यासाठी गाव-तालुकापातळीपर्यंत पोहचा , असे निर्देश कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील पाणी टंचाई व स्वच्छता विभागातील योजनांची आढावा बैठक राज्यमंत्री श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली. बैठकीस आमदार सर्वश्री डी. पी. सावंत, वसंतराव चव्हाण, नागेश पाटील-आष्टीकर, महापौर शैलजा स्वामी, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, कृषी, जलसंपदा, तसेच विविध विभागांचे प्रमुख, जिल्हा परिषद पाणी पुरवठा, ग्रामपंचायत आदी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीत विविध बाबींचा आढावा घेतल्यानंतर बोलताना राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले की, गतवर्षी चांगला पाऊस होऊनही यावर्षी तीव्र उन्हाळ्यामुळे टंचाई लवकरच जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठी जबाबदारी आली आहे. यासाठी या तीन महिन्यात सतर्क राहून , सांघिक प्रयत्न करायला हवेत. टंचाई आराखडा तयार केला गेला असेल , पण तो प्रत्यक्ष राबविण्यापुर्वी विविध घटकांशी संवाद-समन्वय राखणे इष्ट ठरते. त्यासाठी तालुकास्तरावर संबंधित लोकप्रतिनिधी ते सरपंच आणि तलाठी, ग्रामसेवक यांच्या बैठका घेण्यात याव्यात. समन्वय आणि संवादातून पुढे उद्भवणाऱ्या अडचणी यातून टाळता येऊ शकतात. जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या उपाययोजनांबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत अर्धवट राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांचाही आढावा घेण्यात यावा. त्यातील निधी, त्याच्या विनीयोगातील अनियमीतता याबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री. खोत यांनी यावेळी दिले. प्रसंगी यातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
टंचाई काळात पाणी पुरवठा करता यावा यासाठी गावा-गावातील पाणी योजनांच्या थकीत विज बिलांबाबतही राज्यस्तरावरून निश्चित असे धोरण ठरविण्यासाठी प्रयत्न करू, असे श्री. खोत म्हणाले.
ग्रामस्वच्छता अभियानाच्या यशस्वितेसाठी नांदेड जिल्ह्याने समन्वयाने प्रयत्न करावेत, त्यासाठी लोकप्रतिनिधी पासून विविध घटक, सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा, असे निर्देशही राज्यमंत्री श्री. खोत यांनी दिले ते म्हणाले की, नांदेड जिल्ह्याची ओळख पॅटर्न निर्माण करणारा जिल्हा अशी आहे. त्यामुळे स्वच्छता या घटकात मागे राहू नये यासाठी संघटीतपणे प्रयत्न करण्यात यावेत. नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह सर्वच घटकांना या चळवळीत सहभागी करून घेण्यात यावे. यावेळी त्यांनी सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी निधीची उपलब्धता व तरतूद याबाबतही निर्देशही दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री चव्हाण, सावंत तसेच नागेश पाटील-आष्टीकर यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये पाणी पुरवठा, सिंचनासाठीचे पाणी, स्वच्छता विषयक, कृषि, विज आदी बाबींचा समावेश होता. त्याबाबत बैठकीत चर्चाही झाली. प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सुरवातीला टंचाई आराखड्याबाबतची व जिल्ह्यातील पाणीसाठ्याबाबतची स्थिती दर्शविणारे सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे यांनी स्वच्छता विषयक व ग्रामीण पाणी पुरवठ्याविषयी माहिती दिली. शेवटी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. मोटे यांनी आभार मानले.
हंगामाच्या शेवटीपर्यंत शेतकऱ्याच्या तूर खरेदीसाठी नियोजन - कृषी राज्यमंत्री खोत

बैठकीत तूर खरेदीच्या अनुषंगानेही गंभीर चर्चा झाली. यावेळी राज्यमंत्री श्री. खोत यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल घेतला. आमदारांकडून उपस्थित जिल्ह्यातील विविध मुद्यांवरही निर्देशही दिले. ते म्हणाले की, तूर खरेदीबाबत दर आठवड्याला मंत्रालयात केवळ याच विषयावर बैठक घेण्यात येते. आतापर्यंत राज्यात  31 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यापोटी 1 हजार 288 कोटी निधीचेही वितरण करण्यात आले आहे. बाजारात हंगामाच्या शेवटीही तूर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याकडून तूर खरेदी करता यावेत, असे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...