Wednesday, November 26, 2025

वृत्त क्रमांक 1242

सायट्रस प्रोसेसिंगसाठी फळ उत्पादन व प्रक्रियाक्षेत्र उपयुक्त-जिल्हाधिकारी

कृष्णूर येथे सह्याद्री फार्म्स सायट्रस प्रोसेसिंग युनिट भेट

नांदेड, दि. 26 नोव्हेंबर :- नांदेडच्या कृष्णूर एमआयडीसी परिसरात सायट्रस प्रोसेसिंगसाठी उपलब्ध असलेली एकात्मीक सुविधा जिल्ह्यातील फळ उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृष्णूर एमआयडीसी येथील सह्याद्री फार्म्स सायट्रस प्रोसेसिंग युनिटला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. सह्याद्री फार्म्सच्या टीमतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. 

सह्याद्री फार्म्सचे कार्य, सायट्रस प्रोसेसिंग युनिटची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती व कृषी मूल्यसाखळीबाबत सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी युनिटमधील विविध विभागांची पाहणी केली. यामध्ये सायट्रस फळांचे इनकमिंग क्षेत्र, गुणवत्ता तपासणी, फळ उतरवणे, जेबीटी मशीनद्वारे प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा तसेच शून्य कचरा धोरणावर आधारित उत्पादन प्रणाली यांचा समावेश होता. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाच्या लगदा (रस), तेल तसेच इतर मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्याची क्षमता पाहून ते विशेष प्रभावित झाले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात लिंबूवर्गीय फळांची लागवड वाढवणे, शेतकऱ्यांसाठी जागरूकता कार्यशाळा आयोजित करणे तसेच केळी, जांभूळ, आंबा इत्यादी फळ पिकांसाठी एंड-टू-एंड इकोसिस्टम विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य देण्याची तयारी दर्शविली. 

00000




 वृत्त क्रमांक 1241

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन साजरा

नांदेड दि. 26 नोव्हेंबर :- भारताचे संविधान अंगिकारण्यात आलेल्या दिवसाच्या  स्मरणार्थ दरवर्षी प्रमाणे आज 26 नोव्हेंबर 2025 रोजी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिन साजरा करण्यामागील उददेश प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सामाजिक व नागरी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, संविधानातील मुल्यांविषयी आदरभाव दृढ करणे आणि लोकशाहीप्रती कर्तव्यभाव जागृत करणे हा आहे. भारतीय संविधानास 75 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान "या कार्यक्रमांतर्गत 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध स्पर्धा/कार्यक्रम/ उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आज संविधान दिनाचे औचित्य साधून सकाळी संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. संविधान दिनाचे महत्व विषद करणेसाठी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य रोजगार, उदयोजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, से.नि. प्राध्यापक डॉ. अनंत राउत, व्यवस्थापक सोल्युशन करीअर अकॅडमीचे प्रा. शंकर पुरी, से.नि. लेखाधिकारी असोरे व्ही.आर, सहा.प्रशिक्षणार्थी सल्लागार  अन्नपूर्णे पी. के. हे उपस्थित होते.  

राज्यातील औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विदयार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देउन उदयोगास आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यात येते.  बदलत्या काळात औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच सामाजिक जबाबदारी त्यांचे अधिकार व कर्तव्य या संदर्भात मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संचालनालयातर्फे राज्यातील सर्व शासकीय / खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये महिन्यातून एकदा एक सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करणेबाबत सुचित केले  आहे.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विश्वंभर कंदलवाड  यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी संविधानाचे महत्व विषद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते  म्हणून डॉ. अनंत राऊत यांनी  मार्गदर्शनपर भाषणात संविधानाचे महत्व, संविधान उददेशिकांचा अर्थ  विषद केला. माणसाची श्रेष्ठता त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये बुध्दीवाद/विज्ञानवादाचा पुरस्कार केला पाहिजे.  आपल्या राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान केला पाहिजे.  सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्ष, बुध्दीवादी, विज्ञानवादी, समृध्द भारत घडवण्यासाठी संविधान अंगीकारणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. 

शंकर पुरी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना करीअर विषयी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी कशाप्रकारे करावी तसेच यशस्वी होणेसाठी संयम, धैर्य, चिकाटी व सातत्य आवश्यक आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे कार्यक्रमाधिकारी पोतदार डी. ए. यांनी तर आभार प्रदर्शन गटनिदेशक कलंबरकर एम. जी. यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.  कार्यक्रम यशस्वीकरणेसाठी संस्थेतील सर्व कर्मचा-यांनी सहकार्य केले.

000000



वृत्त क्रमांक 1240

संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली 

संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन

नांदेड दि. 26 नोव्हेंबर :- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात करण्यात आली.  

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुने, सहाय्यक लेखाधिकारी राहूल शेजुल, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण, संजय कदम तसेच अशोक गोडबोले, गणेश तादलापूरकर, (प्रदेश अध्यक्ष संविधान बचाव समिती),  भगवान ढगे, भिमराव हटकर, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

या संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोलीगेट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत संविधान रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी कार्याक्रमाचे प्रास्तावीकात  भारतीय राज्य घटना ही जगातील सर्व श्रेष्ठ राज्यघटना असून जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा व घटनेने दिलेले अधिकार व कर्तव्य याचे पालन करावे असे मनोगत व्यक्त केले. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे म्हणाले की, समता, न्याय, बंधूता धर्मनिरपेक्षता आणि समानता या संविधान मुल्याची जोपासना प्रत्येक नागरीकांनी केली पाहीजे असे मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनीगीरे यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेचे फ्रेम देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील समाज भुषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेचे फ्रेम देवून गौरव करण्यात आला.

समाज कल्याण कार्यालय, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग तसेच  जिल्ह्यातील विविध महामंडळाचे व्यवस्थापक, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व स्काऊट गाईड व एन.एसी.सी. चे शालेय विद्यार्थी, सामजिक कार्यकर्ते तसेच बार्टीचे समतादूत असे एकूण जवळपास 1200 विद्यार्थी, अधिकारी कर्मचारी, नागरीकांची उपस्थिती होती.

या संविधान रॅलीमध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक, बँड पथक संच यांनी देशभक्ती गिते सादर केले. या संविधान रॅलीमध्ये केंब्रीज ‍विद्यालय, आंध्रा समिती तेलगु विद्यालय, प्रतिभा निकेतन हायस्कुल, गुजराथी हायस्कुल, पंचशिल विद्यालय, गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शांती निकेतन पब्लीक स्कुल, ऑक्सफर्ड इंटरनॅशलन स्कुलचे शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीस सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून पाणी बॉटल, केळी व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. या संविधान रॅलीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

00000





वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...