Friday, August 1, 2025

 वृत्त क्रमांक 798

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू 

नांदेड दि. 1 ऑगस्ट :- इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू झाली आहे. वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते. 

जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी./एम.ए./एम.एस.सी.अशा बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 वर्षांसाठी या योजनेचे अर्ज मागविण्यात आली आहेत. शासकीय वसतिगृह योजनेचे ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 17 ऑगस्ट 2025 पर्यंत विहित वेबसाईटमध्ये भरावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 797

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हा ग्रंथालय कार्यालयात अभिवादन  

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन 

नांदेड दि. 1 ऑगस्ट :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन यावेळी करण्यात आले. त्याचे उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी झाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन  झाडे यांनी विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कैलाशचंद्र गायकवाड, अजय वट्टमवार, उत्तम घोरपडे, निर्मलकुमार सुर्यवंशी, संजय पाटील, शिवाजी हंबिरे, रघु तसेच मोठया सख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. शेवटी कैलाशचंद्र गायकवाड यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.

00000

वृत्त क्रमांक 796

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या 

योजनासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राशी संपर्क साधावा

या योजनांसाठी त्रयस्थ व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करु नये

नांदेड दि. 1  ऑगस्ट : कौशल्य विकास विभागांतर्गत कार्यरत अण्णासाहेब‍ पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तीक  कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे. 

या योजना ऑनलाईन असून याबाबत महामंडळ विनामुल्य सेवा देते. वरील योजना या WWW.UDYOG.MAHASWAYAM.GOV.IN या वेब पोर्टलवर राबविल्या जातात. या योजनेसाठी महामंडळाने कोणत्याही त्रयस्थ, संस्थेची नेमणूक केलेली नाही. तसेच महामंडळाकडे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे उमेदवारानी कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेशी आर्थिक व्यवहार करु नये. अधिक माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र, यांचे कार्यालय शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, पहिला मजला, आनंद नगर रोड, बाबानगर नांदेड येथे संपर्क साधावा. 

0000

 वृत्त क्रमांक 795

अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत रविवारी जनजागृती  रॅलीचे आयोजन 

 नांदेड दि. 1  ऑगस्ट : जागतिक अवयवदान दिनानिमित्त आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येणार आहे. 

त्या अनुषंगाने 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. जिल्हा रुग्णालयाच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  ही रॅली  शहरातील आयटीआय कॉर्नर येथील महात्मा फुले पुतळ्यापासून निघणार असून कलामंदिर, पोलीस मुख्यालय, वजिराबाद मार्ग जाणार असून रॅलीचा समारोप हे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे होणार आहे.  

या रॅलीमध्ये नांदेड शहराअंतर्गत येणारे शासकीय व निमशासकीय  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच शाळा व महाविद्यालय येथील प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी जास्तीत जास्त विध्यार्थ्यांसह सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय परके यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 794

पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 नांदेड दि. 1  ऑगस्ट : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 मध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत होती. परंतु शेतकऱ्यांना पिक विमा भरताना पोर्टलवर येत असलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 14 ऑगस्ट व कर्जदार शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट 2025 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ दिली आहे.

तरी आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही, अशा बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 14 ऑगस्ट  व कर्जदार शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट 2025 पर्यंत पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 793 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पारदर्शक कामे करा -  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

·         महसूल सप्ताहाचे नांदेड तहसील कार्यालयात उद्घाटन

 

नांदेड दि. 1 ऑगस्ट :- बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभागातील कामे अधिकाधिक लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.  महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताहाचे उद्घाटन नांदेड तहसिल कार्यालयात आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड यांच्यासह नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक, तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

महसूल दिन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड तहसील कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. महसूल कायदे, नियम तसेच आधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रत्येक कर्मचाऱ्यांनी अपडेट राहावे असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले. महसूल दिनानिमित्त त्यांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. समाजाचे हित लक्षात घेऊन महसूल कर्मचाऱ्यांनी आपली कामे वेळेत पूर्ण करावी असे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्ला यांनी सांगितले.

 

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते अल्पभूधारक प्रमाणपत्र ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, मिळकत प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात  वितरण करण्यात आले. 27 बिडी कामगारांना राशनकार्डचेही यावेळी वितरण करण्यात आले. शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा अभियानांतर्गत नांदेड तहसीलचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड यांचे अभिनंदन केले.

000













वृत्त क्रमांक 792

 

ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास मुदतवाढ

 

उपविभागीय अधिकारी यांना कार्यवाहीचे अधिकारी प्रदान

 

नांदेड दि. 1  ऑगस्ट : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करुन घेण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार त्या-त्या उपविभागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करुन घेणे व त्यावर कार्यवाही करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिकार प्रदान केले आहेत. महसूल सप्ताहाच्या लोकाभिमूख कार्यक्रमांतर्गत पात्र नागरिकांनी आपले प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे गुंठेवारी कक्षात विहित मुदतीत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड/अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमान्वित करण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल करता येतील. प्रस्ताव दाखल करण्यास 31 डिसेंबर 2025 पर्यत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मुदतीत प्रस्ताव दाखल करण्यासाठी गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  

 

या गुंठेवारीसाठी प्राधिकृत अधिकारी व त्यांच्या कार्यक्षेत्रातील तालुके याप्रमाणे आहेत. नांदेड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात नांदेड अर्धापूर तालुका आहे. भोकर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे भोकर व मुदखेड, हदगाव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हदगाव व हिमायतनगर, किनवट उपविभागीय अधिकारी यांच्याकडे किनवट व माहूर, कंधार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कंधार व लोहा, देगलूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देगलूर व मुखेड तर बिलोली उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बिलोली व नायगाव तर धर्माबाद उपविभागीय अधिकारी यांच्याकडे धर्माबाद व उमरी हे तालुके कार्यक्षेत्रातील आहेत.

00000


वृत्त क्रमांक 791

सहकार पुरस्कार सादर करण्यासाठी 18 ऑगस्टपर्यत मुदतवाढ 

नांदेड दि. 1  ऑगस्ट : जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांनी त्यांचेकडील सहकार पुरस्कार बाबतचे प्रस्ताव तालुक्याचे संबंधीत उपनिबंधक / सहायक निबंधक यांचेकडे सादर करण्यासाठी 18 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र सहकारी संस्थानी कार्यालयीन वेळेत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.

राज्य शासनाकडुन सन 2023- 2024 या आर्थिक वर्षात सहकार विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार महर्षी पुरस्कार, सहकार भुषण तसेच सहकार निष्ठा पुरस्कार देण्यात येणार आहे.

00000

 वृत्त क्रमांक 790

शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा -  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले 

·         जिल्ह्यातील विविध विकास कामे पूर्ण करण्यावर भर द्या

·         न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची केली पाहणी

 

नांदेड दि. 1 ऑगस्ट : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे पूर्णत्वास न्यावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. आज शासकीय विश्रामगृहातील बैठक कक्षात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, मपना आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे, कार्यकारी अभियंता रामकृष्ण गळधर, परभणीचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, हिंगोलीचे कार्यकारी अभियंता दिंगाबर पोत्रे, भोकर कार्यकारी अभियंता विशाल चोपडे, देगलूरचे कार्यकारी अभियंता संदीप कोटलवार आदींची उपस्थिती होती.

 

शहरातील रस्त्यांची कामे करताना नागरिकांना त्रास होता कामा नये, याची दक्षता घेवून मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकमेकात समन्वय ठेवून कामे तात्काळ पूर्ण करण्यावर भर द्यावा तसेच जिल्ह्यात वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष संवर्धनावर भर द्यावा असे निर्देश श्री. भोसले यांनी दिले.

 

काही तालुक्यातील रस्ते खूपच खराब झाले आहेत. वर्दळ, देवस्थान अशा ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देवून ती कामे वेळेत पूर्ण करा. जिल्ह्यातील जे रस्ते दरवर्षी दुरुस्ती करावी लागतात अशा रस्त्यांना दुरुस्त करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, पोलीस वसाहतीच्या इमारतीचे दुरुस्ती व इतर कामे पूर्ण करावेत. किनवट-हदगाव रस्त्यांची कामे, नांदेड शहरातील चौकांचे सुशोभिकरण, शिवाजीनगर भागातील ड्रेनेजची कामे, टोल नाक्यावरील बोगस पावत्या इत्यादी महत्वाचे विषय लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत त्यांनी संबंधिताना सूचना दिल्या.

 

शासनाच्या 100 दिवसांच्या मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले काम केले असून आता 150 दिवसांच्या मोहिमेत विभाग अव्वल राहील यांची दक्षता प्रत्येकांने घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांनी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामांची माहिती व विभागातील मनुष्यबळ, पदभरती याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

 

तख्त सचखंड श्री गुरुद्वाराचे घेतले दर्शन

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

न्यायालय नवीन इमारतीच्या कामाची केली पाहणी 

नांदेड येथे कौठा-असर्जन भागात न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम प्रगतीपथवर असून या इमारतीच्या कामाची पाहणी करुन या इमारतीच्या कामाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

00000









 मुख्यमंत्रीरोजगारनिर्मितीयोजना

साहित्यरत्न लोकशाहीर #अण्णाभाऊसाठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...