Monday, November 10, 2025

 वृत्त क्रमांक 1183

भूकरमापक पदांसाठी 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा

 नांदेड, दि. 10 नोव्हेंबर :- भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्राची लिंक विभागाच्या https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

भूमि अभिलेख विभागातील उपरोक्त रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता 1 ऑक्टोबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार विहीत कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी गुरूवार 13 नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात पुणे आणि अमरावती विभागात परीक्षा होणार असून या विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 8 वाजता उपस्थित राहावयाचे आहे. तर दुसऱ्या सत्रात नाशिक आणि नागपूर विभागांमध्ये केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी 12 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात मुंबई (कोकण) विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी सकाळी 8 वाजता तर दुसऱ्या सत्रात छत्रपती संभाजीनगर विभागात केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी 12 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. 

पात्र उमेदवारांने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही. सामान्य प्रशासन विभागाकडील 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाइन पद्धतीने परीक्षेच आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असून शकते. तसेच काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

या परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भूमि अभिलेख कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...