Saturday, August 31, 2024

महत्वाचे वृत्त क्र. 787 

विधानसभेसाठी जिल्हयात 27.51 लक्ष मतदार 

मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणानंतर 30 हजार मतदार वाढले 

नांदेड, दि. 31 ऑगस्ट : 20 ऑगस्टपर्यंतच्या मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 30 हजार 218 मतदारांची वाढ झाली आहे. काल 30 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील आकडेवारी जिल्हा निवडणूक कार्यालयाने जाहीर केली आहे.  

नांदेड जिल्ह्यातील किनवट,हदगाव,भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघासाठी मतदार यादी तयार झाली आहे. जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघात एकूण पुरुष मतदारांची संख्या 14 लक्ष 14 हजार 727 आहे तर महिला मतदारांची संख्या 13 लक्ष 36 हजार 740 आहे तृतीयपंथीयांची संख्या 171 आहे. 

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघाच्या मतदारांची अंतीम यादी ३० ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द झाली आहे. या नऊ मतदार संघातील  मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे. 83 –किनवट मतदार संघ एकूण 2 लाख 74 हजार 638 तर  84- हदगाव मतदारसंघात 2 लाख 95 हजार 083,  85–भोकर मध्ये 2 लाख 99 हजार 228 मतदाराची संख्या आहे,  86 -नांदेड उत्तर मतदार संघात 3 लाख 54 हजार 800 तर 87- नांदेड दक्षिण मतदार संघात 3 लाख 13 हजार 653, 88-लोहा 2 लाख 97 हजार 738 तर  89 –नायगाव मतदार संघात 3 लाख 6 हजार 340, 90- देगलूर मतदार संघात 3 लाख 8 हजार 39091-मुखेड मतदार संघात 3 लाख 01हजार 768 मतदार संख्या आहे. नऊ विधानसभा मतदार संघात एकूण 27 लाख 51 हजार 638 मतदारांची संख्या असून यात 14 लाख 14 हजार 727 पुरुष तर 13 लाख 36 हजार 740 महिलांचा तर 171 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. 6 ऑगस्ट नंतरच्या विशेष नोंदणी अभियानात 30 हजार 218 मतदार संख्या वाढली आहे.

00000

 वृत्त क्र. 786 

विधानसभेसाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार

 

नांदेडदि 31 ऑगस्ट : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यंत्रांची तपासणी करून ते मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत.

 

दिनांक 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 या दरम्यान मतदान यंत्रे तयार करण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम ,MIDC, ढवळे कॉर्नर नांदेड येथील जिल्हा वेअर हाऊस येथे चालू होते. सदरील कामकाज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण पूर्ण करण्यात आले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने BU 7010, CU 3922, VVPAT 4231 इतके मतदान यंत्रे जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात आली आहेत.

 

सदरील कामकाज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने व त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडले.त्यामध्ये नायब तहसीलदार भोसीकर मुखेडनायब तहसीलदार विजयकुमार पोटेभोकर नायब तहसीलदार सतीश कुलकर्णीनायगाव नायब तहसीलदार बोलेलो  त्याचप्रमाणे इतर विभागाचे 20 ते 25 कर्मचारी व बेल कंपनीचे 16 इंजिनिअर आणि दररोज 30 ते 40 हमाल यांच्या सहकार्याने सदर मतदान यंत्रे तयार करण्याचे एफएलसीचे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले आहे. सदरची मतदान यंत्रे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आली आहेत.

0000

 वृत्त क्र. 785 

डाक विभागातर्फे दीनदयाल स्पर्श शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात 

नांदेड दि. 31 ऑगस्ट :- दीनदयाल स्पर्श योजना हा दळणवळण मंत्रालयाने सुरू केलेला देशव्यापी शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. दीनदयाल स्पर्श योजना 2024-25 या वर्षाकरिता 30 सप्टेंबर 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 20 सप्टेंबर 2024 पर्यत जवळच्या पोस्ट ऑफिसला अर्ज सादर करावा, असे आवाहन नांदेडचे अधीक्षक डाकघर मोहमद खदिर यांनी केले आहे. 

दीनदयाल स्पर्श योजना हा दळणवळण मंत्रालयाने सुरू केलेला देशव्यापी शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट शालेय विद्यार्थ्यांमध्ये फिलाटली, टपाल तिकिटांचा अभ्यास आणि संकलनाचे आवाहन व्यापक करणे आहे. स्पर्श योजना, ज्याचा अर्थ स्टॅम्प्समध्ये अभियोग्यता आणि संशोधनाच्या प्रोत्साहनासाठी शिष्यवृत्ती आहे. ज्या सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट आणि फिलाटलीमध्ये स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. या अनोख्या छंदाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना 920 शिष्यवृत्ती देण्याची सरकारची योजना आहे. या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट लहान वयातील मुलांमध्ये फिलाटलीमध्ये स्वारस्य वाढवणे आहे. ही आवड केवळ त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाला पूरकच नाही, तर एक आरामदायी छंद म्हणूनही काम करते जे तणाव व्यवस्थापनात मदत करते. 

निवड निकष

सर्व पोस्टल मंडळांमध्ये स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे निवड केली जाते. सहावी ते नववी पर्यंतच्या प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त 10 निवडक विद्यार्थी असतील. शिष्यवृत्तीची रक्कम 6 रुपये प्रतिवर्ष राहील.निवड फिलाटली क्विझमधील कामगिरी आणि फिलाटली प्रकल्पाच्या मूल्यमापनावर आधारित आहे. पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याने फिलाटली क्लबसह भारतातील मान्यताप्राप्त शाळेचा भाग असणे आवश्यक आहे आणि तो या क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे. शाळेमध्ये फिलाटली क्लब नसल्यास, त्यांचे स्वतःचे फिलाटली डिपॉझिट खाते असलेल्या विद्यार्थ्यांचाही शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाईल. दीनदयाल स्पर्श योजना 2024-25 वर्षाकरिता 30 सप्टेंबर 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विध्यार्थ्यानी 20 सप्टेंबर 2024 पर्यत जवळच्या पोस्ट ऑफिसला अर्ज सादर करावा, असेही आवाहन नांदेडचे अधीक्षक डाकघर मोहमद खदिर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्र. 784 

नांदेड जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ई-मोजणी आज्ञावली कार्यान्वित

 

ई मोजणी बाबत आज अधिकारी  कर्मचारी याना प्रशिक्षण

 

नांदेडदिनांक 31 ऑगस्ट:- नांदेड जिल्ह्यात ई-मोजणी Ver-ll आज्ञावली ही पहिल्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख अर्धापुरदुसऱ्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख हदगाव,मुदखेड व तिसऱ्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख  नांदेडबिलोली व लोहा कार्यालयात कार्यन्वित करण्यात आली आहे . तसेच उर्वरित सर्व तालुक्यात उद्या ०१ सप्टेंबर २०२४ पासून कार्यन्वित करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक भूमि अभिलेख व कर्मचारी यांना आज प्रशिक्षण देण्यात आले आहे.ई-मोजणी Ver-ll आज्ञावली मधे नागरिकाना घरबसल्या ऑनलाइन मोजणी अर्ज करता येतो तसेच अर्जदार यांना अंक्षास व रेखांश आधारे नकाशा पुरविण्यात येणार आहे .त्यामुळे मोजणी कामात पारदर्शकता येणार आहे.

 

सदर प्रशिक्षण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सीमा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  आज नियोजन भवन नांदेड येथे घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणास हजर होते.सदर प्रशिक्षणावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विचारलेल्या शंकेचे निरसन बी. व्ही मस्के उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांनी केले.

00000



Friday, August 30, 2024

 वृत्त क्र. 783

भटक्या व विमुक्तांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

सेवा देताना माणुसकी व कर्तव्याची भावना आवश्यक

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे वाटप

नांदेड दि. 30 ऑगस्ट :- रोजच्या जगण्यासाठी हातावर पोट घेवून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्तांना शासकीय योजनाचा लाभ मिळावा, त्यांना रहिवासी प्रमाणपत्रा सोबतच इतर सर्व प्रमाणपत्र मिळावेत यासाठी शासन- प्रशासन प्रयत्नशिल आहे. तसेच भटक्या विमुक्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग खूप महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

आज महाराजस्व अभियानातर्गंत भटक्या व विमुक्त जातीतील लोकांना जातीचे प्रमाणपत्र, रहीवासी व शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे, पारंपारिक वेशभुषा परिधान केलेले वासुदेव, गारुडी, मसणजोगी, जोशी, गोंधळी, पारधी, भोई समाजातील नागरिक आदीची उपस्थिती होती. 

भटक्या विमुक्त जातीतील लोकाकडे कुठलाच पुरावा नसतो. त्यामुळे त्यांना रहीवासी प्रमाणपत्र मिळत नाही. म्हणून ते योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. यासाठी मागील काळात जिल्ह्यातील बळीरामपूर, चौफाळा, लोहा तालुक्यातील किवळा येथे शिबिराचे आयोजन करुन अनेक लोकांना रहीवासी प्रमाणपत्रासोबत इतर आवश्यक प्रमाणपत्राचे वितरण केले आहे. प्रमाणपत्राच्या उपलब्धीमुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्यांच्यापर्यत पोहोचून ते उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आजच्या कार्यक्रमातही महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही भटक्या विमुक्तांना आवश्यक ते प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तत्परतेने केली याबाबतही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कौतुक केले.  तसेच सेवा देताना अधिकारी कर्मचारी यांनी माणुसकी आणि कर्तव्याच्या भावनेतून नागरिकांची प्राध्यान्याने कामे करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

तसेच भटक्या विमुक्त जातीतील सुशिक्षित तरुणांनी समाजातील इतर लोकांची पुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते 28 शिधापत्रिका, दोन उत्पनाचे प्रमाणपत्र, दोन जणांना रहीवासी प्रमाणपत्र, 9 जणांना जात प्रमाणपत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आहे.    

भटक्या विमुक्त जातीतील लोकांना विविध योजनांचा लाभ मिळावा त्यांना समाजाच्या प्रवाहात येता यावे यासाठी विविध प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे यांनी खूप परिश्रम घेतले. याबाबत प्रशासनाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसिलदार संजय वारकड यांनी मनोगत व्यक्त केली.  

00000














 वृत्त क्र. 782

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड दि. 30 ऑगस्ट :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

 लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे.

00000

 वृत्त क्र. 781

नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह
मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध
 
नांदेड दि. 30 ऑगस्ट :- जिल्ह्यात, शहरात, गुरुद्वारा परिसर व श्री गुरु गोविंदसिंहजी विमानतळाच्या परिसरात 2 सप्टेंबर  रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 4 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1)  नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी अतिमहत्वाच्या व्यक्ती हे नांदेड जिल्हा येथील कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचा आदेश  निर्गमीत केला आहे.
00000

Thursday, August 29, 2024

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024 या चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात 30 31 ऑगस्ट 2024 रोजी तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व दि. 1 2 सप्टेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी जनतेने काळजी घ्यावी.

0000


 वृत्त क्र. 780 

 वृत्त क्र. 779 

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन उत्साहात संपन्न

  

नांदेड दि.29 ऑगस्ट:-  मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा 29 ऑगष्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन देशभरात साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने महाराष्ट्र श|सनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा सप्ताहमध्ये विविध खेळाचे आयोजन  26 ते 29 ऑगष्ट 2024 या कालावधीत करण्यात आले.

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळच्या सत्रात जिल्हास्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अतिथी आमदार मोहणअण्णा हंबर्डे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा हॉकी असो अध्यक्ष महेंद्रसिंघ लांगरी, सचिव हरविंदरसिंघ कपुर, उपाध्यक्ष जितेंद्रसिंह खैरा, खालसा हायस्कुलचे मुख्याध्यापक चाँदसिंघ राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा प्रमुख चंद्रप्रकाश होनवडजकर, हॉकी प्रशिक्षक पुरुषोत्तमसिंघ मनिहास, विजय नंदे आदी उपस्थित होते.

 

यावेळी आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी उपस्थित खेळाडू व प्रशिक्षक यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या  स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी जिल्हातील विविध तालुक्यातुन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय क्रीडा दिननिमीत्त 29 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळच्या सत्रात क्रीडा दिन सप्ताहानिमीत्त विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थींचा व सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात प्रोत्साहनात्मक अनुदान प्राप्त शाळा/ संस्थेचा गौरव, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ मनपाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचे हस्ते देवून करण्यात आला. विशेषत: पॅरा ऑलम्पीकमध्ये नांदेड जिल्हयाचा गौरव श्रीमती भाग्यश्री जाधव व श्रीमती लता उमरेकर यांचा सन्मान  या कार्यक्रम दरम्यान करण्यात आला. श्रीमती भाग्यश्री जाधव व श्रीमती लता उमरेकर यांच्यावतीने सन्मान त्यांचे पालक यांनी स्विकारला.

 

मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विजेत्या खेळाडू, पुरस्कारार्थी यांचा सन्मान करुन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम प्रमुख राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख या होत्या. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडज कर, वरिष्ठ लिपिक संतोष कनकावार, दत्तकुमार धुतडे कार्यालयातील संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे व यश कांबळे आदीनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी कोंडेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण कोंडेकर यांनी मानले .

0000

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडचे दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर आज गुरूवारी चव्हाण परिवाराची नायगांव (बा.) येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.






विशेष वृत्त क्र. 778   

 

चला मुलींनो ! आता वडिलांना सांगू या

उच्च शिक्षणासाठी मुलींना खर्च नाही !

 

मुलींना मोफत उच्च शिक्षण

शासनाच्या निर्णयामुळे दिलासा

 

नांदेड दि. 29 :- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यातही ग्रामीण भागातील मुलींना तर जास्त प्रमाणात अडचणी येतात. त्यांना शहरात शिक्षणासाठी राहणे म्हणजे शैक्षणिक शुल्क सोडून इतर अनेक बाबींसाठी पैसे खर्च होतात. जसे की निवासभोजनशैक्षणिक साहित्य खरेदीप्रवास अशा एक ना अनेक गोष्टीच्या खर्चाच्या बोजा त्यांच्या पालकांना उचलावा लागतो. त्यामुळे मुलींना शिक्षण द्यावे की नाही या संभ्रमात अनेक कुटूंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता होती.

 

कुटूंबातील आर्थिक बाब ही कुटुंबाच्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे. या नव्या योजनेबद्दल बोलताना नांदेड येथे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील मुलींनी आपल्या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. परंतु आता महाराष्ट्र शासनाने मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमात मोफत शिक्षण 8 जुलै 2024 रोजी जो शासन निर्णय निर्गमित केला आहेत्यामुळे अनेक मुलीच्या पालकांना व मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी दिलासा मिळून त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मुलींच्या शिक्षणाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.

 

मुलींच्या शब्दातील भावना 

नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयातील एलएलबी प्रथम व द्वितीय वर्षातील व इतर महाविद्यालयातील ऋतुजा पाटीलउन्नती देशमुखकेसर अग्रवालमृणाली कदमतनया हातनेजान्हवी भूजबळसोनाली आसटकरप्रतिक्षा मोरेगायत्री जोशीज्योति पुंडलिक पसींगरावजानव्ही उदगीरकरविद्या जाधव या साऱ्या जणी या योजनेच्या लाभार्थी आहे त्यांनी या योजनेचे भरभरून कौतुक केले आहे.

 

मुली म्हणतातव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकसामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्कपरीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी आता 100 टक्के लाभ मंजूर  केल्यामुळे मुलीच्या पालकांना व मुलींना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे मुलींना आता अर्धवट शिक्षण सोडावे लागणार नाही. शिक्षण पुर्ण केल्यामुळे त्या आता स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्यास मदत होईल. या निर्णयामुळे मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. याबाबत सर्व विद्यार्थीनीनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत. नांदेड विभागात एकूण 97 अनुदानित महाविद्यालय, 219 विना अनुदानित महाविद्यालय व एक कृषि विद्यापिठ यांचा अंतर्भाव होतो.

 

मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नांदेड विभागातील सर्व शैक्षणिक संस्थाना आदेश दिले आहेत. शैक्षणिक संस्थानी देखील या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या योजनेची माहिती व जागृती विद्यार्थीनीमध्येही झाली आहे.

 

या योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळणार असून या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील मुलीचा टक्का वाढणार आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी निर्णयामुळे मुली व महिला आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

 

यावेळी या सर्व मुलींनी आपल्याच सहकारी व मैत्रिणींना आवाहन केले आहे की उच्च शिक्षण घेताना कोणाला जरी अडचण येत असेल तरी घरीही बाब समजावून सांगा की आता शिक्षणासाठी कोणताही खर्च लागणार नाही त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या पालकांना आमचा हा संदेश हाती पडेल त्यांनी देखील आता आपल्या मुलींना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून दूर ठेऊ नये.

 

मुलींनी यावेळेस हाही संदेश दिला की सध्या मुली शिक्षित होताना दिसत आहेत मात्र जागतिक पातळीवर उच्च शिक्षणामधील मुलींचा टक्का हा भारतासाठी फार आनंददायी बाब नाही यामध्ये भरपूर वाव आहे हा टक्का आम्हाला वाढवायचा आहे शासनाने त्यासाठी या योजनेचे पाठबळ दिले आहे त्यामुळे मुलींनी मुलांच्या तुलनेत शिक्षित होण्यासाठी या योजनेचा फायदा घ्यावा.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणाला अडचण असल्यास त्यांनी शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नांदेडमध्ये हे कार्यालय शासकीय तंत्रनिकेतनच्या पाठीमागे दयानंदनगर याठिकाणी आहे

00000




Wednesday, August 28, 2024

 वृत्त क्र. 777 

येता संकट बालकावरी 1098 मदत करी

चाईल्ड हेल्पलाईनची मदत घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 28 ऑगस्ट : आपल्या आजुबाजुला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैगिंक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत मिळण्यासाठी 1098 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केले आहे.

 

अशा बालकांना कोठून व कशी मिळवून देता येईल, या करीता कोठे संपर्क करावा या बाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. हा संभ्रम न ठेवता 1098 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

अश्या संकटग्रस्त बालकांना त्वरित  मदतीकरिता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत / संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. सदर सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24/7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध्‍ आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वत:घेवू शकतो किंवा इतर कोणतीही सदर सेवेव्दारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. या निवेदनाव्दारे 1098 या टोल फ्रि क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मत करावी असे अवाहन आयुक्त महिला व बाल विकास डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

0000000

 वृत्त क्र.  776 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

 

नांदेड दि. 28 ऑगस्ट : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी चार वाजता श्री गुरुगोविंद सिंगजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. नांदेड व हिंगोली जिल्हयांच्या दोन दिवसीय दौऱ्यावर ते आले आहेत.

 

नांदेड विमानतळावर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी त्यांचे स्वागत केले.

 

उपमुख्यमंत्री श्री. अजीत पवार नांदेडवरून वसमत रोड जिल्हा हिंगोलीकडे प्रयाण करणार आहेत. त्या ठिकाणच्या कार्यक्रमानंतर रात्री उशिरा मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्कामी असणार आहेत. त्यांच्यासोबत खा.सुनील तटकरे, रूपाली चाकणकर यांचेही आगमन झाले आहे.

0000



Tuesday, August 27, 2024

वृत्त क्र.  775

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारसाठी

25 सप्टेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 27 ऑगस्ट :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्गंत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रं‍थालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस.आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक‍ ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.   

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील वर्गातील अ,ब,क,ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रुपये , 75 हजार रुपये, 50 हजार रुपये, 25 हजार रुपये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. 

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तसेच राज्यातील प्रत्येकी महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि  रोख रक्कम, गौरविण्यात येते.

सन 2023-24 वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह 25 सप्टेंबर 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन राज्याचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

000000

वृत्त क्र.  774

खरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 27 ऑगस्ट :- शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणी कालावधी 15 सप्टेंबर 2024 पर्यत आहे. नांदेड तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनाचा लाभ सुलभतेने मिळावा. पिक कर्ज, पिक विमा, नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी यासाठी ई-पिक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे ई-पिक पेऱ्याची नोंद 15 सप्टेंबरपूर्वी करावी असे आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे. 

खरीप हंगाम 2024 साठी क्षेत्रीय क्षेत्रीय स्तरावरुन पिक पाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डाटा/माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पिक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांना सक्रिय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे, पिक विमा पिक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, आपत्ती मुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने  शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट फोन मोबाईल मध्ये प्लेस्टोअर मधून ई-पिक पाहणी ॲप इंन्स्टॉल करुन , सुरु करुन त्यात पिक पाहणी/पेऱ्याची नोंद नोदवावी. काही अडचणी निर्माण झाल्यास आपल्या गावचे मंडळ अधिकारी, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतशिल शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र साक्षर स्वयंसेवक यांनी ई-पिक पेरा पूर्ण करुन घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

शेतकरी ॲपद्वारे पिक पेरा नोंदविण्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्तधान्य दुकानदार, कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतशिल शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र स्वाक्षर स्वयंसेवकांनी ई-पिक पेरा नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही तहसिलदार नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्र.  773 

खा.वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड दि. २७ ऑगस्ट : नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत श्रध्दांजली अर्पण केली.

नायगाव येथील चव्हाण कुटुंबीयांच्या स्मशानभूमीमध्ये या भूमीपूत्राला संपूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

२६ ऑगस्टला हैद्राबाद येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सोमवारी त्यांचे पार्थिव नायगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित वाड्यामध्ये अंत दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांचे मूळ गाव असणाऱ्या नायगाव येथे हजारो  चाहत्यांच्या उपस्थितीत अंतीम संस्कार करण्यात आले.चव्हाण कुटुंबांच्या मंदिर परिसरातील स्मशानभूमीत त्यांचे चिरंजिव रवींद्र चव्हाण व रंजीत चव्हाण यांनी भडाग्नी दिला. तत्पूर्वी, त्यांना पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. यावेळी त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता.

नायगाव येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण राज्यातून तसेच तेलंगाना व कर्नाटक मधील स्नेही मोठ्या संख्येने पोहोचले होते.तर देशातील व राज्यातील राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पालकमंत्री गिरीश महाजन,राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, लातूरचे खासदार डाॅ.शिवाजी काळगे, धुळेच्या खासदार डॉ.शोभा बच्छाव, जालणाचे खासदार कल्याण काळे, परभणीचे खासदार संजय जाधव, खा. रजनीताई पाटील, खा.डॉ.अजित गोपछडे,माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात,आ.अमीत देशमुख,आमदार सर्वश्री शामसुंदर शिंदे, राजेश पवार, माधवराव जवळगावकर, बालाजी कल्याणकर, डॉ. तुषार राठोड,धीरज देशमुख,प्रज्ञा सातव ,विक्रम काळे, जितेश अंतापूरकर, मोहन अण्णा हंबर्डे, मेघणाताई बोर्डीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, सुभाष वानखेडे, माजी केंद्रीय राज्य मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री कमलकिशोर कदम ,यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभा झाली.

वसंतराव चव्हाण यांचा परिचय

खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या वडीलाचे नाव कै. बळवंतराव अमृतराव चव्हाण होते. त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण हे देखील विधानसभा व विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यांचाच राजकीय वारसा वसंतरावांनी पुढे सुरू ठेवला. वसंतरावांचा जन्म दिनांक 15 ऑगस्ट 1954 रोजी झाला होता. त्यांचे जन्मस्थळ नांदेड जिल्हयातील  नायगांव (बा.) आहे.  त्यांचे शिक्षण बीकॉम (दुसरे वर्ष) असे होते.


स्व. वसंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशी केली आहे. सन 1978 ते 2002 पर्यत सलग 24 वर्ष ते नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते. बिलोली सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते. सन 1990-95 या काळात जिल्हा परिषद सदस्य नांदेड. सन 2002 मध्ये जिल्हा परिषदेला  दुसऱ्यांदा निवड झाली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे नांदेड, सन 2002-2008 विधान परिषद सदस्य होते. 2009-2014 या काळात ते राज्याच्या विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य (अपक्ष) होते. त्यांनी  रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य म्हणूनही पद भूषविले. संसदीय कामकाज पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युरोपचा अभ्यास दौरा केला. पुन्हा एकदा 2014-2019 या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते निवडून आले. सदस्य अंदाज समिती महाराष्ट्र राज्य. सन 2016-2022 सभापती कृ.ऊ.बा समिती नायगांव, सन 2021-2023 चेअरमन, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली आणि 29 फेब्रुवारी 2024 पासून मुख्य समन्वयक नांदेड ग्रामीण कॉग्रेसची जबाबदारी त्यांनी घेतली. नायगाव तालुका निर्मितीचे ते शिल्पकार आहेत. 4 जून 2024 पासून ते कॉग्रेस पक्षाकडून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. खासदार म्हणून त्यांचे कामकाज नुकतेच सुरू झाले होते. राजकीय कारकीर्दीसोबतच त्यांचे सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यातही खूप मोठा सहभाग होता.
00000










  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...