Monday, January 16, 2023

 विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत

उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक

                   औरंगाबाद, दि.16, (विमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुक लढविणाऱ्या उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत आज झाली.

                   औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी रोजी व मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी ही बैठक झाली.

                   उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींसह निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनियार उपस्थित होते.

                   शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम, नियमावली, मतदान, मतमोजणी, तारखा व वेळा, मतदार यादी, प्रचार साहित्य छपाई निर्बंध, मतदान केंद्रे, उमेदवार तसेच प्रतिनिधीचे ओळखपत्र, निवडणूक आयोगाचे निर्देश, आदींबाबत श्री.केंद्रेकर यांनी माहिती दिली. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. माहितीसाठी मार्गदर्शिकेचेही वितरण यावेळी करण्यात आले. 

*****







 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ

एका उमेदवाराची निवडणुकीत माघार, 14 उमेदवार रिंगणात

 

                  औरंगाबाद, दि.16, ( विमाका) :-  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.

 

                  डॉ.गणेश वीरभद्र शेटकर - अपक्ष या एका उमेदवाराने शिक्षक मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे.

                  काळे विक्रम वसंतराव - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रा.पाटील किरण नारायणराव - भारतीय जनता पार्टी, माने कालीदास शामराव - वंचित बहुजन आघाडी, अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील - अपक्ष, प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) - अपक्ष, आशिष (आण्णा) आशोक देशमुख - अपक्ष, कादरी शाहेद अब्दुल गफुर - अपक्ष,नितीन रामराव कुलकर्णी - अपक्ष, प्रदीप दादा सोळुंके - अपक्ष, मनोज शिवाजीराव पाटील - अपक्ष, विशाल (विक्की) उद्धव नांदरकर - अपक्ष, सुर्यकांत संग्राम विश्वासराव - अपक्ष, संजय विठ्ठलराव तायडे - अपक्ष, ज्ञानोबा चिमनाजी डुकरे - अपक्ष असे एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

                  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने (भा.प्र.से.) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक - 8956710497 तर दुरध्वनी क्रमांक - 0240-299801 असा आहे. 

 

*****

वृत्त क्रमांक 29

 उद्योग सुलभता कार्यशाळेचे बुधवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- उद्योग विभाग, मैत्री विभाग व जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने  जिल्ह्यातील उद्योजकांसाठी उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकुल वातावरणात चालना मिळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हा उद्योग केंद्र सभागृह, उद्योग भवन, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड येथे बुधवार 18 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वा. कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  

 

या कार्यशाळेचा उद्देश व्यावसायिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. तंत्रज्ञानाच्या पातळीवर केल्या जाणाऱ्या सुधारणाविषयी आणि वापरकर्त्यांकडून अभिप्राय मागविण्यासाठी मैत्री मुंबई यांची कार्यरत सल्लागार टीम इज ऑफ डुइंग बिजनेस सुधारणेबाबत कार्यशाळेत सादरीकरण करणार आहेत. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, सनदी लेखापाल, सनदी वास्तुरचनाकार, इंजिनिअर्स तसेच उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभागांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000 

वृत्त क्रमांक 28

 राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत

महिला हेल्मेट रॅली संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2023 हे दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची उपस्थिती होती.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयात विविध रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिलांनी दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट वापर करावा यासाठी महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. अपघाताची संख्या कमी करण्याबाबत जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात सर्व नागरिकांनी वाहतूक नियमावलीचे पालन करुन सहकार्यातून अपघात मुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले.

 

ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदीर, शिवाजीनगर, राज कॉर्नर, एस.टी.वर्कशॉप, येथून आयटीआय पर्यंत होता. या रॅलीत  सुमारे 150 महिलांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी सुमारे 60 महिला या पोलीस विभागातील होत्या. रॅलीच्या वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहा,मोटार वाहन निरिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. रॅलीसाठी मोटार वाहन वितरक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यांनी सहकार्य केले.

00000





वृत्त क्रमांक 27

 नागरीकांनी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा

-    जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नागरीकांनी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा व राजगिरा) यांचा समावेश करावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले. मकर संक्रांती-भोगी” पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून मकर संक्रांती-भोगी हा सणाचा दिवस जिल्हयामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आत्मा सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये तृणधान्याचा आरोग्यातील महत्त्व या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्याचे लागवड तंत्रज्ञान याबद्दल माहिती देऊन तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

 

ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा व राजगिरा या तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ-उपपदार्थ आहारासाठी पौष्टीक असल्याने त्याचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या कार्यक्रमास कापुस संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे राठोड, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांची उपस्थिती होती.

 

यावेळी लोहा तालुक्यातील सायाळ येथील रत्नाकर गंगाधर ढगे (राजगिरा उत्पादक शेतकरी) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. आर. प्रकल्प आत्माचे उपसंचालक श्रीमती सोनवणे यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे महिला बचतगट प्रतिनिधी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. शेवटी तालुका कृषि अधिकारी सिध्देश्वर मोकळे  यांनी आभार मानले.

00000



अवयवदान चळवळीत महाराष्ट्राचा पुढाकार... अवयवदान पंधरवडा : दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ मरणोत्तर सेवा ही जीवनोत्तर प्रतिष्ठा आहे! https://notto.abd...