Thursday, September 14, 2023

लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव प्रतिबंधनियंत्रणासाठी

तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आदेश

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- राज्यामध्ये उद्भवलेल्या गोवर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमीत केले आहेत.  

 

या आदेशात म्हटले आहे कीनांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात लम्‍पी चर्मरोग हा विषाणूजन्य सांसर्गिक रोग प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात गोवंशीय पशुधन बाधित झाल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याने मर्तुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिनियमातील तरतुदी आधारे अधिसूचनेद्वारे संपूर्ण नांदेड जिल्हा हा नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गोवंशीय पशुधनास गोटपॉक्स लसीकरणइनाफटॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील जनावरांचे संपूर्ण आठवडी बाजार व आंतरराज्य सीमा बंद करण्यात आल्या असून वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर गोवंशीय पशुधनास एकत्र येण्यास व सण साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सद्यपरिस्थितीचे अवलोकन करता पशुपालक अथवा स्थानिक प्रशासनामार्फत बाधित अथवा संशयित पशुरुग्नाची माहिती तात्काळ पशुसंवर्धन विभागास देण्यात येत नाही. स्थानिक प्रशासना मार्फत रोग प्रतिबंधासाठी अनुसरावयाची इतर अनुषंगिक प्रतिबंधात्मक कार्यवाही जसे की बाधित पशुचे विलगीकरण देखील पुरेशा गांभीर्याने केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर अधिनियमातील तरतूद क्र. 4 (1) व (2) नुसार संबधित पशुपालकांनीइतर कोणत्याही व्यक्तीशासनेत्तर  संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी माहिती नजीकच्या पशुसंवर्धन विभागास कळविणे बंधनकारक आहे. अधिनियमातील तरतूद 26 नुसार अनुसूचित आजाराने मृत झालेल्या पशूची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे हे पशुपालकांचे कर्तव्य आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने खात्री करावी.

 

महानगरपालिका, सर्व नगरपालिकानगरपंचायत व ग्रामपंचायती यांनी या अधिनियमातील कलम 30 (अ) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित रोगाचा रोग प्रादुर्भाव झाल्याबाबत संबंधित कार्यक्षेत्राच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ अवगत करावे. कलम 30  नुसार कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करणे तसेच कलम क नुसार पशुवैद्यकांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात किंवा या कायद्याखाली त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यात मदत करणे या संपूर्ण जबाबदाऱ्या स्थानिक प्रशासनाच्या आहेत.

 

सर्व खाजगी पदविकाधारक यांनी / पशुपालकांनी लम्पी स्किन रोगांची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी स्किन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांच्या मार्गदर्शना नुसारच करण्यात यावे. खाजगी पदविकाधारक यांनी लम्पी स्किन रोगांचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात  येईल.

 

या सर्व बाबी विचारात घेऊन लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव प्रभावी नियंत्रणासाठी शासन अधिसूचनेनुसार पशुधनाची वाहतूकजनावरांचा बाजार भरवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच बाधित जनावरांच्या हालचालीवर निर्बंध आणणे व पशुवरील बाह्यकीटकाच्या नियंत्रणासाठी तसेच परीसरातील स्वच्छतेबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. रोग प्रादुर्भाव अनुषंगाने आवश्यक जनजागृती तसेच पशुपालकांचे प्रबोधन करण्यासाठी उचित कार्यवाही करावी. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये उपरोक्त कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालकव्यक्तीसंस्था प्रतिनिधी यांच्या विरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत. असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि. 14 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमीत केलेल्या आदेश स्पष्ट केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...