बालकांमधील बहिरेपणा आजारावर वेळेत उपचार घ्यावेत
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
· जिल्हा रुग्णालयात बहिरेपणा तपासणी शिबीरात 65 बालकांची तपासणी
नांदेड, (जिमाका) दि. 10:- बालकांमधील बहिरेपणा या आजाराचे निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर करावे. निदान झाल्यावर बालकांची कॉक्लिअर इम्लांट शस्त्रक्रिया करता येईल, तेवढ्या प्रमाणात त्याचे उत्तम परिणाम दिसून येतील, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा रुग्णालयात बहिरेपणा तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. या शिबिरात जिल्ह्यातील 65 बालकांची तपासणी करण्यात आली. तसेच या तपासणीत यशश्री कान/नाक/घसा रुग्णालय, मिरज जि. सांगली येथे मोफत कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी 25 बालके पात्र असून त्यांना संदर्भित करण्यात येणार आहेत.
राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या शुभहस्ते श्रवण यंत्र व यापूर्वी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या २० बालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या बालकांची (कॉक्लियर इम्प्लांट) शस्त्रक्रियेसाठीची तपासणी करण्यात आली. कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया ही जन्मजात बहिरेपणा असलेल्या बालकांसाठी वरदान असून या शस्त्रक्रियेनंतर विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेतल्यानंतरच या शस्त्रक्रियेचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊन बहिरेपणासह जन्मलेले मूल ऐकू लागते, बोलू लागते आणि सर्वसामान्य मुलांप्रमाणे आत्मविश्वासाने आयुष्य जगू लागते.
जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील व एक वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 0 ते 18 या वयोगटातील बालकांची 4 डी म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात. हृदयरोग तपासणी (टूडी इको), नेत्ररोग, आकडी/ फेफरे यांची मोठ्याप्रमाणावर शिबिर आयोजीत करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलीना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) स्त्री रुग्णालय, श्यामनगर, नांदेड येथे संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजूरीचा लाभ देण्यात येतो. तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळलयास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे.
हे शिबीर सांगली जिल्ह्यातील यशश्री कान/नाक/घसा रुग्णालय, मिरज येथील तज्ञ डॉ. सुधीर कदम (ईएनटी ॲण्ड & कॉक्लियर इम्प्लांट सर्जन आणि रुग्णालयाचे डॉ.गीता कदम, ऑडियोलिस्ट श्रीमती अमृता, स्पीच थेरपिस्ट श्रीमती मधुरा थोरात ह्या विशेषज्ञांच्या उपस्थितीत पार पडले. या शिबिरासाठी आरबीएसके समुपदेशक अनिल कांबळे, व्यवस्थापक विठ्ठल तावडे, श्रीमती अनिता चव्हाण आणि गुनानंद सावंत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment