Monday, October 31, 2022

रस्ते अपघाताला रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

रस्ते अपघाताला रोखण्यासाठी कठोर

कायदेशीर कारवाईची आवश्यकता

-         जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

§  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघात स्थळांचा आढावा

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  नांदेड जिल्ह्यातून जात असलेल्या महामार्ग निर्मितीच्या कामामुळे वाहतूकीत निर्माण झालेले अडथळे, वाहन चालकाकडून न पाळले जाणारे नियम, अपघात प्रवण स्थळांबाबत  अपुरी असलेली सांकेतिक सुविधा आदी कारणाने अपघाताचे प्रमाण गंभीर होत चालले आहेत. याला आळा घालण्याच्या उद्देशाने आहे त्या स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, वाहतुक पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाने परस्पर समन्वयातून आप-आपल्या जबाबदाऱ्या व कायदेशीर बाबीचे कठोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.  


 

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत तोंडले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर,  राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 

वाहन चालविताना फोनवर बोलणे कायद्याने गुन्हा आहे. यात होणाऱ्या अपघातात जीवीत हानीचे प्रमाणही  वाढत आहे. वाहन चालकांना यांची माहिती असूनही जर ते फोनवर बोलत वाहने चालवित असतील तर अशा चालकांविरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी वाहतूक पोलीसांना दिले. यासाठी 250 ए कलमानुसार दंडही संबंधिताना लावला पाहिजे. रस्त्यात होणाऱ्या अपघाताला जखमीना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा दुताची संख्या वाढावी व लोकांच्या मनात याबाबत जर काही गैरसमजुती असतील तर त्या पोलीस व आरोग्य विभागानी दूर केल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


 

नांदेड मधील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षात घेता शाळा, महाविद्यालयामध्ये रस्ते सुरक्षिततेवर भर द्यावा लागेल. या जागृतीतून रस्त्यावर जबाबदार वाहतूक होवून अपघाताचे प्रमाण कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत चाकूर ते लोहा, लोहा ते वारंगा, वारंगा ते महागाव, अर्धापूर ते हिमायतनगर व जिल्हा अंतर्गत मार्गावरील ब्लाक स्पॉट अर्थात अती धोक्याच्या अपघात स्थळांची माहिती घेवून त्याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

0000

 

 

 

रदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एकता दौडचा शुभारंभ

 

सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी

 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एकता दौडचा शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम घेण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकता रॅलीचा शुभारंभ खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.


 

यावेळी महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी,  अप्पर पोलीस  अधिक्षक निलेश मोरे, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिका रेखा काळम-पाटील, प्रविण साले आदींची उपस्थिती होती.

 



जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु झालेली रॅली जुना मोंढयातील टॉवर येथील सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या  पुतळयापर्यत आयोजित करण्यात आली होती.  रॅलीच्या निमित्ताने महात्मा गांधी यांच्या पुतळयास आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितांना भ्रष्टाचार निर्मुलन व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवन कार्याची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. याचबरोबर  सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीचे अवलोकन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रलोभ कुलकर्णी यांनी मानले.


0000

 

 

 

जिल्ह्यातील 2427 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा 4 लाख 15 हजार 636 पशुधनाचे लसीकरण

 

जिल्ह्यातील 2427 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 15 हजार 636 पशुधनाचे लसीकरण

 नांदेड (जिमाका) दि. 31 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 872 बाधित गावात 2 हजार 427 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.

आतापर्यत 110 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 1 हजार 471 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 846 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 15 हजार 636 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

 

मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेसाठी संपर्क करण्याचे आवाहन

 

मागासवर्गीय विकास महामंडळाच्या

योजनेसाठी संपर्क करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 31 :-   राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीयाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे बाबतची योजना राबविण्यात येत आहे.

 

इतर मागास वर्गीय प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या दूरध्वनी  02462-220865 क्रमांकावर किंवा अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे.

 

अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्षे असावे. तो इमाव प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे कौटुबिंक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागासाठी 8 लक्ष रुपयापर्यंत असावी. अर्जदार इयता 12 वी मध्ये 60 टक्के गुणांसह उतीर्ण असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणांसह उतीर्ण असावा. पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उतीर्ण असावा. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, अर्जदार कोणत्याही वित्तिय संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा. बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरित केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000 

           

Sunday, October 30, 2022

जिल्ह्यातील 2315 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

 

जिल्ह्यातील 2315 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 179 बाधित गावात 2 हजार 315 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 104 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 1050 गावांवर लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 15 हजार 636 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

000000

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्ह्यात एकता दौडचे आयोजन शाळा, महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्ह्यात एकता दौडचे आयोजन

शाळा, महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार 31 ऑक्टोबर रोजी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 पासून पुढे जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, सेवाभावी संस्था यांनी राष्ट्रीय एकतेसाठी यात पुढाकार घेवून  उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

संपूर्ण जिल्ह्यातून एकात्मतेचा हा संदेश पोहचविण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थानी आपली तयारी पूर्ण केली आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिनांक 28 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयाद्वारे सूचना निर्गमित केल्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातर्गंत 25 ते 31 ऑक्टोबर 2022 हा कालावधी एकतेचा उत्सव साजरा केला जात येत आहे. या अंतर्गत सोमवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा, जुना मोंढा या दरम्यान दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे.  सहभागी होवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी, युवकांनी  सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपस्थित राहावे, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून यात सचित्र माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवराचे हस्ते केले जाणार असून  या समारंभाचा व प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

0000

 

सोमवारी दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ

नांदेड (जिमाका) दि. 30 :- भ्रष्टाचार मुक्त भारत –विकसित भारत  ही संकल्पना घेऊन जिल्ह्यात सोमवार 31 ऑक्टोंबर ते  रविवार 6 नोव्हेंबर 2022 या  कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फतया कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने दिल्या आहेत. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत परिपत्रकान्वये विविध विभागांना निर्देशित करण्यात आले आहे. 

0000

 

Saturday, October 29, 2022

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी रॅलीचे आयोजन

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त

सोमवारी रॅलीचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 29:- नेहरु युवा केंद्राच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, महीला मंडळ, युवा मंडळ, क्रीडा मंडळातील सदस्यांनी या  रॅलीत सहभाग घ्यावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

 

नेहरु युवा केंद्र नांदेड व जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेना, भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशभक्तीचा सन्मान व त्यांच्या विचाराच्या मूल्यांची जपणुक करण्यासाठी तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातर्गंत 25 ते 31 ऑक्टोबर 2022 हा कालावधी एकतेचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोमवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, जुना मोंढा या दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7.30 वाजता उपस्थित राहावे, असे  नेहरु युवा केंद्राच्यावतीने कळविले आहे.

00000

जिल्ह्यातील 2263 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा 4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण

 

  जिल्ह्यातील 2263 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 179 बाधित गावात 2 हजार 263 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 101 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 1050 गावांवर लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार 183 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

000000

Tuesday, October 25, 2022

 जिल्ह्यातील 1982 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 166 बाधित गावात सद्यस्थितीत 1 हजार 982 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 74 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 822 गावांवर विशेष लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार 183 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

000000

Sunday, October 23, 2022

 गोरगरिबांची दिवाळी गोड करता आली याचे समाधान

- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

·       शिधा पोहचविण्यासाठी प्रशासन अहोरात्र घेत आहे परिश्रम - आमदार बालाजी कल्याणकर

·       जिल्ह्यातील 5 लाख 97 हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यातील गोरगरिबांच्या घरीही दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिधा ही विशेष योजना राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहचविण्यात यश मिळविले आहे. स्वस्त धान्य दुकानातून जे लोक धान्य घेतात त्यांना अवघ्या शंभर रुपयात 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ व 1 लिटर पामतेल असे किट शासनाने उपलब्ध करून दिले. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचविले जात आहे. जिल्ह्यातील या आनंदाचा शिधा वाटपाचा प्रातिनिधीक शुभारंभ करतांना आत्मिक समाधान व आनंद आहे. गोरगरीबांच्या घरातही महाराष्ट्र सरकारने दिवाळीची दिलेली ही गोड भेट असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. 

नांदेड येथील आनंदनगर परिसरातील रास्त भाव दुकान क्र. 89 येथे यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार किरण अंबेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना सारख्या आव्हानात्मक काळातही केंद्र सरकारने गोरगरीबांच्या घरी धान्य पोहचेल याची काळजी घेतली. सर्व खासदारांचा निधी हा लोककल्याणासाठी आणि विशेषत: जनतेच्या आरोग्याच्या सुविधेवरच प्राधान्याने खर्च करण्यात आल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. 

आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. या विस्तारात वाड्या-पाड्यांपर्यंत ही आनंदाची शिधा वेळेत पोहचविण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आमच्या सर्व बांधवांच्या घरी ही गोड दिवाळी भेट पोहचविली जात आहे. वाहतुकीच्या अडचणीमुळे जर कुठे अडथळा झाला तर प्रशासनाने त्यावर तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

आनंदाचा शिधा हा अत्यंत महत्वाकांक्षी व लोककल्याणाच्या दृष्टिने आवश्यक असा निर्णय शासनाने घेतला. ऑनलाईन नोंदणीसाठी यात असलेला अडसर लक्षात घेता शासनाने तो दूर केला असून आनंदाचा शिधाचे वाटप आता युद्धपातळीवर पूर्ण होईल यात शंका नाही. अनेक तालुक्यांसाठी सद्यस्थितीत चारही वस्तु प्राप्त असून काही तालुक्यांसाठी एखादी राहिलेली वस्तू तीही तात्काळ पोहचविली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

साखर, रवा, चणाडाळ, पामतेल या वस्तु असलेले आनंदाचा शिधाचे किट खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात द्रोपदाबाई शिवाजी पिंगलवाड, संतोष चांदू साबळे, जयश्री गंगाधर मोकनपिल्ले, पारुबाई गायकवाड, चंद्रकलाबाई सोनसळे यांना देण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे 2 हजार रेशन दुकानांद्वारे 5 लाख 97 हजार 812 शिधापत्रिकाधारकांना ही आनंदाची शिधा वाटप केली जात आहे.

000000









Saturday, October 22, 2022

 शेतकऱ्यांपर्यंत बदलत्या पीक पद्धतीचे नियोजन पोहचणे आवश्यक

 -  जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- पोकरा योजनेअंतर्गत शेती आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विहिरी मिळाल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून केळी, हळद, फळे, भाजीपाला पिकांचे नियोजन करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि अधिकाऱ्यांनी बाजारपेठे संदर्भातही शेतकऱ्यांत जागृती करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

 

कृषि विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी नुकताच आढावा घेतला. या आढावा बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदेजिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचकेश्रीमती माधुरी सोनवणे प्रकल्प उपसंचालकआत्मातसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारीसर्व तालुका कृषि अधिकारीनिवडक शेतकरी गटाचे प्रतिनिधी व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

अलिकडल्या काळात सेंद्रीय व नैसर्गिक शेती करणाऱ्या अनेक शेतकरी आपल्या शेतात उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करून बाजारपेठेशी जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शेतकऱ्यांना बाजारपेठ व त्यांचा व्यवसाय अधिक सुकर व्हावा, ज्या व्यक्तींना असे नैसर्गिक उत्पादन हवे आहे त्या ग्राहकांशी थेट जोडल्या जाता  यावे यादृष्टिने विद्यापीठ स्तरावर (इनक्यूबेशन सेंटर) एक स्वतंत्र केंद्र असून तेही मदतीला तत्पर आहेत. यांच्याशी समन्वय साधणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

 

यावेळी जिल्ह्यातील निवडक सेंद्रीय / नैसर्गिक शेती करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आपल्या उत्पादनांची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांना दिली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रात्यक्षिकात नांदेड तालुक्यातील मौजे पिंपरी महिपाल या गावातील आशाबाई बाबुराव चंदेल, सयाबाई शिवाजीराव सूर्यवंशी यांना  हरभरा प्रकल्प बियाणे किट प्रतिनिधीक स्वरूपात वाटप केले. मौ. खडकुत येथील शहाजी बळीराम कंकाळ व प्रभु जैयवंता कंकाळ यांना करडई मिनिकिट वाटप करण्यात आले.  

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानकृषि यांत्रिकीकरण योजनाराष्ट्रीय शाश्वत शेती योजनाप्रधानमंत्री कृषि सिंचन योजनानानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा)मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पप्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) आदी योजनेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना 100 टक्के अनुदानाच्या ज्या योजना असतील त्यात प्राधान्याने सहभागी करून घ्यावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी दिल्या.

00000



 संयुक्त राष्ट्रसंघ दिन संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वज समवेत उभारावा  

नांदेड (जिमाका) दि. 22 :- संयुक्त राष्ट्रसंघ दिन 24 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजासमवेत उभारण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्देश दिले आहेत. ज्या शासकीय कार्यालयात दररोज राष्ट्रध्वज उभारण्यात येतो त्या कार्यालयावर 24 ऑक्टोंबर या संयुक्त राष्ट्रसंघदिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज भारतीय ध्वज संहिता 2002 च्या परिपत्रकानुसार राष्ट्रध्वजाच्या बरोबर उभारण्यात यावा. 

 

संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही बाजुला फडकविता येतो. सामान्यत: ध्वजस्तंभाच्या समोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्यादृष्टीने त्यांच्या अगदी डावीकडे राष्ट्रध्वज असावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.

00000

Friday, October 21, 2022

 आधारभूत किंमत खरेदी योजनेत नोंदणी

करण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 21 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान/भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी गुरुवार 10 नोव्हेंबर 2022  पर्यन्त मुदतवाढ दिलेली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 

नोंदणीसाठी चालू हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड व शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचा आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...